- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
शरद पवार आणि कुख्यात दाऊद इब्राहिम याचे घनिष्ट संबंध असल्याचा सनसनाटी आरोप करणारे मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्याकडे पत्रकारांनी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आणि दुसरे दिवशी ती बातमी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्यावेळी खैरनार जे बोलत ते छापून येत होते. कारण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्धच्या लढ्याचे ते आयकॉन बनले होते. गँगवॉर त्याच काळातले. जे जे हॉस्पिटलमधील गोळीबार त्याच जवळपास झालेला. ‘‘तुमचा दाऊद तर, आमचा गवळी’’ ही गर्जना त्याच दरम्यानची !, या व अशा घटनांच्या मालिकांमुळे लोकांना राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होत असल्याचे दिसत होते. त्या दरम्यान खैरनार यांच्या रुपाने त्यांना जणू ‘मसिहा’च सापडला. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचे नाते घट्ट सुशांतसिंग राजपूत या तरुण, उमद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले आणि पाहता पाहता वेगवेगळ्या सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईमुळे समीर वानखेडे या आयआरएस सेवेतील अधिकाऱ्याला वलय प्राप्त झाले. वानखेडे जेव्हा कस्टम्स विभागात होते तेव्हा ड्यूटी भरली नाही म्हणून भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला सुवर्ण चषक त्यांनी अडवून ठेवला होता. वानखेडे यांच्या धडाकेबाज कारवाईची ही पहिली ओळख. पुढे विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा वगैरे सेलिब्रिटींना वानखेडे यांनी विमानतळावर रोखल्याचा इतिहास आहे. विदेशी चलन, सोनेनाणे, महागडी घड्याळे वगैरे घेऊन येणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांना वानखेडे या नावाचा धाक वाटत राहिला. वानखेडे मुंबईतील केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकात दाखल झाल्यावर आतापर्यंत होणाऱ्या कारवायांचे प्रमाण दुप्पट झाले. सुशांतसिंग प्रकरणानंतर वानखेडे यांचा स्वत:च एक सेलिब्रिटी होण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल अशा बड्या धेंडांना तासन् तास बसवून त्यांनी त्यांची चौकशी केली आहे. भारती सिंग, तिचा पती हर्ष आणि आता तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा सुपुत्र आर्यन यांना त्यांनी जेलची हवा खायला लावली आहे. त्यामुळे आता वानखेडेंच्या मागे कॅमेऱ्यांचा, पत्रकारांचा ससेमिरा, मुलाखतींचा सिलसिला सुरु होईल. त्यांना पुरस्कार दिले जातील, भाषणांची निमंत्रणे येतील. ‘अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या बॉलिवूडची नशा-नक्षा उतरवणारा अधिकारी’, अशी त्यांची प्रतिमा निर्माण करुन मीडिया आत्ताच मोकळा झाला आहे. हळूहळू वानखेडे यांनाही हे सारे आवडू लागेल. प्रसिद्धीच्या लाटेवरील आपले अढळपद टिकवण्याकरिता मग तेही जोमाने अधिक कारवाया करतील. वानखेडे प्रसिद्ध पावले म्हटल्यावर लागलीच त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे व त्यांच्या पथकाची क्रूझवरील कारवाई ही कशी पक्षपाती आहे, याबाबत आरोप केले. जोपर्यंत वानखेडे करतायत ते योग्य आहे, असे बहुतांश जनतेचे पर्सेप्शन आहे तोपर्यंत कुणी कितीही आरोप केले तरी त्यामुळे वानखेडे यांचे काही बिघडणार नाही. एकेकाळी ठाण्यात टी. चंद्रशेखर नावाचे महापालिका आयुक्त होते. त्यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या जमीनदोस्त केल्या आणि रस्ते रुंदीकरण केले. स्थानिक शिवसेना नेतृत्वाशी त्यांचा वाद झाला. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर हेच चंद्रशेखर एमएमआरडीएत गेले. तेथे त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांशी वाद झाला आणि त्यांनी सनदी सेवेला रामराम ठोकला. अर्थात तोपर्यंत चंद्रशेखर यांचे आधीचे वलय ओसरले होते.- खैरनार असो की, चंद्रशेखर यांना प्रसिद्धीचे शिखर गाठता आले पण, कालौघात त्यांच्यावर राजकीय शिक्का मारला गेला. खैरनार हे भाजपचे हस्तक म्हणून ओळखले गेले तर, चंद्रशेखर यांना शिवसेनेचे निकटवर्तीय मानले गेले. वानखेडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी ओढवून घेतली आहेच. ‘अर्धसत्य’मधील ओम पुरीचा अनंत वेलणकर असो की, अजय देवगण यांनी साकारलेला बाजीराव सिंघम असो ; आजूबाजूच्या भ्रष्ट व्यवस्थेला विटलेले लोक सतत व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या सिंघमच्या शोधात असतातच. लोकांनी निवडलेला सिंघम हा शंभर टक्के निष्पक्ष, प्रामाणिक असतोच असेही नाही. पण, लोकांना तो सिंघम वाटतो व काही काळ तरी लोक त्याची पूजा करतात. सामान्य नागरिकांना सतत व्यवस्थेशी दोन हात करणारे ‘सिंघम’ सतत शोधत राहावे लागणे, हाच खरेतर आपल्या भ्रष्ट व्यवस्थेचा सज्जड पुरावा आहे !