प्रगती जाधव-पाटील उपसंपादक, सातारा
कार्टून पाहून वाढलेल्या तरुणाईच्या एका गड्याला ‘इल्युमनाटी’ या प्रकाराचा भयानक नाद आहे. त्याचे व्हिडिओ सामान्यांनाही घाबरवून सोडतात. अतिशय उत्तमरीत्या खोट्याचं खरं करून सांगण्याची आणि पुराव्यांदाखल एडिट केलेले व्हिडिओ तरुणाईला एलियन्सच्या विश्वात नेऊ पाहत आहेत. विशेष म्हणजे कोणतंही लॉजिक न लावता, केवळ व्हिडिओच्या आवाजावर विश्वास ठेवून आपल्यावर हल्ला होणार आणि हे विश्व नष्ट होणार, या भीतीने घाबरलेले आणि भेदरलेले तरुणही या सेंटरचा भाग आहेत. त्यांना एलियन्सच्या यानाचे, त्यांच्या संवादाचे आणि आक्रमण करण्यासाठी आणलेल्या आधुनिक शस्त्रांचे भास होतात. कित्येकदा अख्खी रात्र जागून ही मुलं स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करत असल्याचं अनेकांना सांगतात. या भ्रामक व्हिडिओमुळे डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी आहे.
शेकडो वर्षांपासून जगावर राज्य करणाऱ्या तथाकथित सिक्रेट ग्रुपबद्दल लहानपणी रामायण, महाभारत या गोष्टी मोठ्यांकडून ऐकताना शाळेत पाठ्यपुस्तकांमधून शिकताना मनावर बिंबविलेला एक मूलभूत विचार म्हणजे या जगात दोन शक्ती नांदतात. साध्या भाषेत सांगायचं तर चांगली शक्ती असलेले देव आणि वाईट शक्ती असलेले दानव! सुर-असुर (देव-दानव) यांच्यातील युद्धाच्या कथा काल्पनिक म्हणून याकडे पाहिले गेले पण कोणी यातील सत्यता पटवण्याचा प्रयत्न करत पुरावे दिले तर? जगात घडलेल्या भीषण दुर्घटना, कोरोना महामारी, त्यात झालेला मानव संहार, एखाद्या गेममध्ये तरुणांना गुंतवून आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणे हे दुर्दैव नसून वाईट शक्तींनी एकत्र येऊन घडविलेला हा उत्पात होता, असे म्हटले तर विश्वास बसेल? यावर कोणाचा विश्वास बसो अथवा नाही, पण असे आहे हे मानणाऱ्यांचा एक मोठा समूह आहे, त्याला ‘इल्युमनाटी’ म्हणून संबोधले जाते. याची माहिती मिळविण्यासाठी सध्या तरुणाई रात्रीचा दिवस करू लागली आहे.
मेंदूचा ताबा घेऊन विचारशक्ती संपविण्याचा प्रयत्न अस्थिरता, क्रौर्य, हिंसा, मृत्यू, रक्तपात, अशांती, घातपात, अपघात यांनी रोगाच्या साथीप्रमाणे थैमान घातले आहे. इंटरनेटसारख्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सूत्रबद्ध योजना आखत माणसाच्या मन, मेंदूचा ताबा घेऊन त्याची विचार शक्ती संपवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणूस त्याच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे आणि याही परिस्थितीत, सगळे वाईट घडत आहे हे आपल्याला सांगत आहेत. तेच आपल्याला कुठे कुठे काही चांगले घडत असल्याचे देखील सांगते. पण चांगल्याचा प्रकाश बघण्यापेक्षाही वाईटाचा काळोख पाहण्याची वृत्ती तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढलेली दिसते. त्रिकोण आणि डोळ्यांचे गूढ त्रिकोण आणि त्यात एक डोळा हे इल्युमनाटी संघटनेचे चिन्ह आहे. अनेक लोकप्रिय मालिका, चित्रपट निर्माते त्रिकोणात डोळा या चिन्हाला त्यांच्या व्यवसायात स्थान देतात. हे चिन्ह अमेरिकन डॉलरवर देखील छापले आहे. वीस डॉलर्सची नोट त्रिकोणी घडी करून पाहिली असता, हल्ला करून उद्ध्वस्त केलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींचे चित्र दिसते. कमी वेळात प्रचंड प्रसिद्धी पावलेले नि अमाप पैसा कमावलेले अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्स या संघटनेचे सभासद असल्याचेही सांगण्यात येते.
समाजमाध्यमांवर इल्युमनाटी माहितीचे भांडार!मित्रांबरोबरच्या गप्पांमध्ये इल्युमनाटीचा विषय निघाला की, त्याची माहिती समाजमाध्यमांवर बघण्याची तरुणाईमध्ये चुरस लागली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तयार केलेला मजकूर, गूढ आवाजात तयार केलेला संवाद आणि एकापाठोपाठ एक व्हिडिओ येऊन पडत असल्याने तरुणाई याकडे आकर्षित होत आहे. अचानक श्रीमंत होण्यासाठी ही ताकद सर्वाधिक प्रभावी असल्याचा प्रचार केल्यानंतर तर तरुणाई करिअरचे मार्ग म्हणूनही इल्युमनाटी सर्च करतात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
इंटरनेटच्या मायाजालात अडकलेल्या सध्याच्या तरुणाईला आणखी एका भ्रामक विश्वाने भुरळ घातली आहे. हे विश्व आहे इल्युमनाटीचं... याची माहिती मिळविण्यासाठी तरुणाई रात्रीचा दिवस करू लागली आहे.