देशातील समस्त विरोधी पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांचा कोणा जाणकाराने अभ्यासवर्ग घेण्याची नितांत गरज आहे. केवळ राजकीय लढाईतच नव्हे तर कोणत्याही आणि विशेषत: वाकयुद्धात उपेक्षून मारणे हे हत्त्यारदेखील अनेकदा अन्य कोणत्याही हत्त्यारापेक्षा प्रभावी ठरत असते. कारण आपल्याला शाब्दिक (आणि अलीकडच्या काळात शारीरिकदेखील) ठोकून काढण्यापेक्षा आपली उपेक्षा केली जाणे अधिक जिव्हारी लागणारे असते. पण या हत्त्याराचा सहसा कोणी वापरच करीत नाही. तो करता यावा किंवा केला जावा याकरिता अभ्यासवर्ग! त्याचा अभाव असल्यानेच विरोधी पक्षातील काही लोक मनसेनायक राज ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करुन मोकळे झाले. का तर म्हणे त्यांनी नव्या रिक्षा जाळून टाकण्याचे ‘ज्वालाग्राही’ आवाहन करतानाच न्यायाधीशांना सक्तीने ‘सॉलिटरी कन्फाईनमेन्ट’ म्हणजे एकांतवासाची सजा फर्मावली आहे. त्याची कारणे दोन. एक म्हणजे अमराठी भाषिकांना रिक्षांचे परवाने दिले गेल्याने ते आपल्या रिक्षा घेऊन रस्त्यावर उतरतील आणि अत्यंत ‘कामातुर’ मराठी रिक्षावाल्यांच्या पोटावर पाय येईल. सबब अमराठी रिक्षा जाळा! दुसरे म्हणजे न्यायालयाने म्हणे रिक्षाच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या शर्तीला दिलेली स्थगिती. देशाच्या राज्यघटनेने सर्व नागरिकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. राज ठाकरे त्याला अपवाद नाहीत. त्याचबरोबर रिक्षा जाळा म्हणणे आणि प्रत्यक्षात जाळणे यात फरक असल्याने नुसत्या म्हणण्याने कोणताही गुन्हा होत नाही असे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच म्हणून ठेवले आहे. राज ठाकरे यांना न्यायालये भले आवडत नसली तरी या निकालाचे ते लाभार्थी ठरतात. पण त्याहून महत्वाचे म्हणजे सध्या ते खूप परेशान आहेत. आपला बॅड पॅच सुरु असल्याचे त्यांनीदेखील मान्य केले आहे. पाहाता पाहाता त्यांचे अनेक चेले नवा घरोबा करुन मोकळे झाले आहेत. फासे टाकावेत आणि ते पालथेच पडावेत असे सतत सुरु आहे. इतके दिवस निभावले. पण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतलबी वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी बॅड पॅचमधून बाहेर पडणे व त्यासाठी लोकांचे लक्ष वेधून घेणे क्रमप्राप्त. आगखाऊ बोलणे त्यासाठीच. तेव्हां त्यांना ते बोलू द्यावे. उगा अडवायचा प्रयत्न करुन त्यांचा हेतू कशाला सफल करायचा, हा साधा विचार विरोधकांना सुचावा म्हणूनही अभ्यासवर्ग!
परेशान है वह!
By admin | Published: March 11, 2016 3:35 AM