- दिल्ली दरबार
- रघुनाथ पांडे
पत्थरों कि इस नगरी में, पत्थर चेहरे, पत्थर दिल
पत्थर है मन मेरा, क्यू राहों मे तू आवारा
यहाँ न होगा कुछ हासिल, कोई रहे ना जब अपना,
जग सुना सुना लागे.
गीतकार जावेद अख्तर यांच्या शब्दांनी रेखाटलेलं राजधानीतील महाराष्ट्र सदन या नेत्रसुखद वास्तुतील आजचं हे राजकीय वास्तव.! ही वास्तू अनेक कारणांनी वादग्रस्त असली तरी राज्यातील मंडळींचे हक्काचे आश्रयस्थान आहे. मागील अवघ्या अडीच महिन्यांत तिने अनेक चढउतार अनुभविले. रमजानच्या रोजा चपाती प्रकरणाने तर ती जगभर पोहोचली. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सदनाचे उद्घाटन झाले तेव्हा काही मिनिटे वीज गुल झाली होऊ न झगमगत्या सदनात काळोख पसरला होता. या प्रकाराची चौकशी झाली. सरकारची दाणादाण उडाली होती; पण उद्घाटन जेवढे चर्चेचे ठरले त्यापेक्षा अधिक गाजले ते चपाती प्रकरण!! दिल्लीतील पर्यटकांच्या यादीत यामुळे सदन आपोआपच गेले. दिल्लीत कोठेही फिरा, बोलीवरून तुम्ही मराठी असल्याचे ध्यानात आले, की समोरची व्यक्ती सदनाचा विषय हमखास काढायची. दोन महिने हा मामला गरम होता. महाराष्ट्राची ही बदनामी मनावर घाव घालायची. त्यानंतर सदनात कडक पोलीस बंदोबस्त, येणार्या व्यक्तीची नोंद, सोबतच्या साहित्याची झडती सारे सोपस्कार पार पडू लागले. मुनष्याभोवती राजकारणाचे कुंपण घालणार्या या शहरात या प्रसंगाने शहकाटशहाचे राजकारण रंगू लागले. यामागे मूळ कारण होते ते सदनातील बेचव भोजन! पण ते आता बर्यापैकी चवदार झाले आहे. दीड महिना संसदेचे अधिवेशन होते व नव्या खासदारांना बंगले मिळाले. तरीही त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, मित्र सारे इथेच मुक्कामी होते. सदनाच्या विस्तीर्ण लॉबीत त्यामुळे मराठीच्या विविध बोली एकाच वेळी ऐकायला मिळायच्या, तर भोजनालयात विदर्भाची पाटोडी, जळगावची शेवेची भाजी, कोल्हापूरचा झणझणीत पांढरा-तांबडा नि मुंबईचा वडापाव. अधूनमधून हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत शेंगदाणा भुरक्याची लय. खासकरून खासदारांसोबतचे नातेवाईक हे अस्सल पदार्थ सोबत आणायचे आणि आग्रह करून सोबतच्यांना खाऊ घालायचे. गणरायांच्या मुक्कामाने तर जुने-नवे सदन तेजोमय झाले होते. वीस दिवस इथे जत्राच भरली होती. नसानसांत राजकारणच भिनलेले, राज्याच्या सर्व इलक्यांतील नेते, कार्यकर्ते येथे येत होते. कोण कितीने पडला, कसा जिंकला व त्याची आत्ताची समीकरणे अशा गप्पांचा फड पडला होता. सोबत एक फाईल, त्यामध्ये बायोडाटा, फोटोचा अल्बम, वर्तमानपत्रांची कात्रणे, मान्यवर समाजसेवकांची शिफारस पत्रे, दिल्ली, मुंबईतील मान्यवर नेत्यांशी किती सलगी आहे ते दाखविणारी नावांची यादी, दिल्लीच्या नेत्यांशी ओळख असणारे मध्यस्थ इच्छुकांना जनपथ, अकबर रोड, अशोका रोड. येथल्या पक्षांच्या कार्यालयांकडे नेत होते. पक्षाचे कोणी मोठे नेते सदनात आल्याची कुणकुण लागताच लॉबित जत्रा भरायची. खासकरून सायंकाळी हा नजारा कमालीचा गुंतागुंतीचा असायचा. एकाच मतदारसंघातील दोन-तीन इच्छुक स्वत:ची माहिती सांगायचे तेव्हा नेत्यांच्या चेहर्यावर मिस्कील हास्य असायचे. आता उमेदवार्यांच्या याद्या झळकल्यात, गर्दीतील अनेकांचे नशीब फळफळलंय.
गर्दीने फुलणारी लॉबी, माणसांच्या थव्यांनी गजबजलेले सदन आता मात्र ओस पडलंय.
टिळक पुतळ्याचे काय?
सध्या महाराष्ट्र सदन सुनंसुनं असलं तरी लवकरच ते नव्या असंतोषाला सामोरं जाणार आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचा पुतळा सदनात असावा, अशी मागणी पुण्याच्या ‘लोकमान्य टिळक प्रतिमा संकल्प समिती’ने गणेशोत्सवात केली. राज्य सरकारला दीड महिनाभरापूर्वी समितीने दिलेले पत्र अजून दिल्लीपर्यंत काही पोहोचले नाही; पण पुतळ्यासाठी पुणे, नगर, कोल्हापूर, नागपुरात लोकवर्गणी गोळा होत आहे. महाराष्ट्र दिनाला सदनाच्या आवारात पुतळा बसविण्याचा निर्धार लोकमान्यांच्या पणत सून व पुण्याच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांनी केला आणि तोंड पोळलेल्या सदनाच्या व्यवस्थापनाने नवी भानगड नको म्हणून सरकारपर्यंत या मागणीचा पाठपुरावा केला. पण काहीच झाले नाही! सदनाच्या आवारात छत्रपती शिवाजीमहाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रशस्त लॉबीत शाहूमहाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर व यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे आहेत. पण, लोकमान्यांचा पुतळा सदनाच्या आवारात नाही. शरद पवार हे सदनाच्या पायाभरणीला होते आणि उद्घाटनालाही. त्यांच्याही नजरेतून टिळक सुटले, याचे आश्चर्य आहे. उद्घाटनानंतर चौदा महिन्यांत अनेकदा सदनातच मुक्काम ठोकलेल्या विरोधकांनी सरकारला एकदाही जाब विचारला नाही, हेही एक कोडेच आहे. सर्वोच्च न्यायालयात टिळकांचा पुतळा आहे, त्यांच्या नावे एक रस्ता, एक पूल, एक रेल्वे स्थानक आहे. दिल्लीकरांनी टिळक विहार व टिळकनगर या नावांच्या वसाहतीही स्थापन केल्या आहेत. एकूणच दिल्लीकरांचे प्रेम लोकमान्यांच्या कर्तबगारीवर निर्विवादपणे आहेच; पण अस्सल मराठी राजकारण्यांनाच मात्र त्यांचा विसर पडला. मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत हा विषय मागे पडेलही; पण तो जाहीरनाम्यात असावा, यासाठी सार्याच पक्षांना समिती पत्र देणार आहे.’ रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, सदानंद मोरे, उल्हास पवार या बड्या लोकांनी या विषयाचा पाठपुरावा सुरू केल्याने योग्य मार्ग गवसेलही; परंतु ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं शतकाआधी ब्रिटिशांना ठणकावणारे टिळकवाक्य आजही तंतोतंत लागू होत असल्याने निर्ढावले कोण, हे शोधायची गरजच उरत नाही.
(लेखक लोकमत समूहाचे नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी आहेत.)