- डॉ. अन्वय मुळेजोपर्यंत हृदयाची धडधड सुरू असते, तोपर्यंत माणूस जिवंत असतो, पण एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेला, तर त्याचे हृदय बंद करून चार तासांच्या आत दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते व त्या हृदयाचे ठोके सुरू करून व्यक्तीला जीवनदान देता येऊ शकते. ही किमया तब्बल ४२ वर्षांनंतर कार्डिएक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी साध्य करून दाखविली. त्यामुळे ते आता खरेखुरे ‘हृदयनाथ’ बनले आहेत. अवघ्या ११ महिन्यांत २० यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून, राज्यात एक वेगळाच विक्रम डॉ. अन्वय मुळे यांनी प्रस्थापित केला आहे. हृदय प्रत्यारोपणाविषयी एकूणच त्यांनी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल या उपक्रमांतर्गत संवाद साधला...हृदयविकारावर प्रभावी औषधे आहेत का? हृदयविकार झाल्यावर तो पूर्णपणे बरा करण्यासाठी कोणतेही औषध अस्तित्वात नाही. औषधे घेतल्यावर रुग्णांमध्ये काही दिवस फरक पडतो, पण काही दिवसांनी पुन्हा त्रास होण्याचा संभव असतो. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होत गेल्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे म्हणजे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यावर औषधे देताना चौफेर विचार करावा लागतो. जास्त काळ औषधे घेतल्याने त्याचा मूत्रपिंड, यकृत अशा अन्य अवयवांवर परिणाम होतो. हृदयविकार असलेल्या रुग्णांना आम्ही ‘फ्रिक्वेंट फ्लार्इंग पेशंट’ असे संबोधतो. कारण त्रास जाणवू लागला की, ते रुग्णालयात येतात, उपचार घेतात, थोडे बरे वाटू लागले की, ते पुन्हा घरी जातात. त्यानंतर, दोन ते तीन महिन्यांत ते परत रुग्णालयात येतात. कारण त्यांची प्रकृती ढासळते, अशा रुग्णांसाठी हृदयप्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असतो. हृदयप्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण किती आहे? शरीरात कोणतीही शरीराबाहेरील गोष्ट (फॉरेन बॉडी) आल्यास शरीर त्याचा स्वीकार करेलच असे नसते. कोणतेही प्रत्यारोपण केल्यास शरीर ते नवीन अवयव नाकारण्याचा धोका असतोच. त्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर विशिष्ट औषधे दिली जातात. शस्त्रक्रिया करतानाही औषधे दिली जातात. त्यामुळे शरीर तो अवयव नाकारण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर पहिल्या वर्षात शरीर हृदय नाकारण्याचे धोका अधिक असतो. त्यामुळे पहिल्या वर्षी औषधांचे प्रमाण अधिक असते. एक वर्ष उलटल्यावर हृदय नाकारण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे औषधांचा डोस कमी केला जातो. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती या १० वर्षे चांगले आयुष्य जगू शकतात. हृदयविकार झालेल्या व्यक्तीवर औषधोपचार सुरू असल्यास, त्यांचे आर्युमान हे कमी होते आणि आयुष्याचा दर्जा ही घसरतो. या प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी कोणत्या?हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिकांची आवश्यकता भासते. हृदय हे शरीरातून सर्वांत शेवटी काढून घेतले जाते. त्या आधी मूत्रपिंड, यकृत काढण्यासाठी आलेला डॉक्टरांचा चमू काम करतो. हृदय सर्वांत शेवटी बंद केले जाते. अवघ्या १५ मिनिटांत हृदय काढण्याची प्रक्रिया पूर्ण होते. हृदय प्रत्यारोपणासाठी हृदय काढल्यापासून अवघ्या चार तासांचा कालावधी हातात असतो. मेंदू मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीच्या अन्य अवयवांचे कार्य सुरू असते, अशी व्यक्ती अवयव दान, हृदयदान करू शकते. चार तासांत हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरूकेली नाही, तर हृदय वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, ही वेळेशी केलेली स्पर्धा असते. काही वेळा तर वेळेविरुद्ध केलेली ही स्पर्धा ठरते. त्यामुळे प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. आपल्याकडे अशा शस्त्रक्रिया सुरू होण्यास एवढा कालावधी का जावा लागला?हृदयविकाराचे अनेक रुग्ण मी पाहिले होते. त्यांना औषधे देऊन तात्पुरते बरे वाटते, पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय दिसत होता. आपल्या राज्यात हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतच नव्हत्या. मी गेल्या १० वर्षांपासून हृदयप्रत्यारोपणाविषयी अभ्यास करत आहे. मला आधीपासूनच या विषयात रस होता. त्यामुळे जिथे हृदय प्रत्यारोपण परिषद असायची, तिथे मी जायचो. अनेक तज्ज्ञांकडून त्या परिषदेत बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. या शस्त्रक्रियांमध्ये आपण ५० वर्षे मागे आहोत. परदेशात प्रत्यारोपण खूप आधीपासून केले जाते. सध्या आपण प्राथमिक पातळीवर आहोत. त्यामुळे अजून बऱ्याच गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. जसजशी जनजागृती वाढत जाईल, तसे अनेक प्रश्न सुटत जातील. हृदय प्रत्यारोपणासाठी महत्त्वाची असलेली ग्रीन कॉरिडोरसाठीची पायाभूत तयारी मुंबईत झालेली आहे. हृदयप्रत्यारोपण करणे आपण कसे सुरू केले?खरे सांगायचे तर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्या रुग्णांनीच मला शिकवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, दात्यांची कुटुंबीय. अनेक कुटुंबीयांनी अवयवदानाला, हृदयदानाला संमती दिली, म्हणून मी हे करूशकलो. डॉ. नीतू मांडके सरांबरोबर मला कधी काम करायची संधी मिळाली नाही, पण मी त्यांना अमेरिकेत एका परिषदेत भेटलो होतो. हृदयप्रत्यारोपण विषयात मला रस असल्याचे ते जाणून होते. तेव्हा मी सुरतच्या महावीर रुग्णालयात कार्यरत होतो. ‘तू राज्यात ये. तू आलास म्हणजे आपण हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू करू,’ असे ते मला म्हणाले होते, पण त्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. ते असते, तर त्या वेळीच हृदयप्रत्यारोपण राज्यात सुरू झाले असते, पण त्यानंतर पुढे एवढा काळ जावा लागला. म्हणूनच गेल्या वर्षी मी केलेले पहिले हृदयप्रत्यारोपण मी त्यांना समर्पित केले. ब्रेनडेड रुग्णांविषयी पुरेशी जनजागृती आहे का? अतिदक्षता विभागातील एखादा रुग्ण ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण तो काय आता मरणारच आहे, मग औषधे कशाला द्यायची, अशी सर्वसाधारण डॉक्टर, परिचारिकांची भूमिका असते, पण हे अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीसाठी घ्यायचे असल्यास, त्याची शारीरिक स्थिती उत्तम राखणे गरजेचे ठरते. त्याचा रक्तदाब, अन्य अवयवांचे कार्य सामान्यपणे चालू राहण्यासाठी त्याला औषधे देणे. ज्या रुग्णाचे अवयवदान करायचे आहेत, त्याची रक्ततपासणी करणे, ईसीजी काढणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आवश्यक असते, पण शेवटच्या टप्प्यात अशा तपासण्या अनेकदा केल्या जात नाहीत. त्यातच प्रत्येक रुग्णालयाला अवयव काढून घेण्यासाठी परवानगी नसते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीला न्यावे लागते. या काळात अनेकदा अवयवांचे कार्य थांबते. त्यामुळे ज्या रुग्णालयात योग्य सुविधा आहेत, हृदय, मेंदूच्या शस्त्रक्रिया होतात, तिथे नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायव्हल सेंटर सुरू करणे आवश्यक आहे. असे झाल्यास प्रत्यारोपणासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. अवयवदानाचा टक्का कसा वाढू शकतो? अवयवदान ही भावना मनातून निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कोणालाही सांगून ती गोष्ट साध्य होईलच अथवा ती व्यक्ती करेलच, असे नाही. इंदूरपासून १०० किमी आत एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याने त्याच्या २१ वर्षांच्या मुलीच्या अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. तिथल्या डॉक्टरांनाही याबाबत पुरेशी माहिती नव्हती. त्याने मुलीचे हृदयदान केले. त्याला कुठून मिळाली असेल अवयवदानाविषयी माहिती? त्याच्याशी मी बोललो, तेव्हा मला कळले, त्याच्या मुलीला लहानपणापासून फिट येत होत्या. एकदा तिला रुग्णालयात नेत असताना फिट आली आणि ती एका खांबावर आपटली. त्यानंतर डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. त्यावर त्याने सांगितले, तिचे अवयवदान करा. ती कोणाच्या उपयोगी आल्यास मला आनंदच आहे. त्यामुळे ही बाब स्वत: स्वीकारणे सर्वांत महत्त्वाचे आहे. याचा खर्च सामान्यांना परवडण्यासारखा आहे का?या शस्त्रक्रियेचा सध्याचा खर्च सुमारे १० लाखांच्या घरात आहे, पण हा खर्च कमी होण्यासाठी प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढले पाहिजे. त्याचबरोबर, सरकारने सबसिडीज द्यायल्या हव्यात. केंद्र सरकारकडून सहकार्य मिळणार आहे, त्याचा फायदा खर्च कमी होण्यास नक्कीच होईल. तामिळनाडू आणि केरळमध्ये सरकार एका ठिकाणाहून दुसरीकडे अवयव नेण्यासाठी पैसे घेत नाही. त्यासाठी मोफत दळणवळण सेवा आहे. आपल्या राज्यात अवयव आणण्यासाठी येणारा खर्च खूपच जास्त आहे. अनेकदा तीन ते चार लाख रुपये विमान सेवेसाठी द्यावे लागतात. त्यामुळे हा खर्च वाढतो. प्रत्यक्षात प्रत्यारोपणानंतर औषधांसाठी प्रत्येक महिन्याला सुमारे १३ ते १४ हजार रुपयांचा खर्च आहे. तो खर्च करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे असल्यासच मी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतो. कारण प्रत्यारोपणानंतर औषधे घेतली नाहीत, तर शरीर हृदय नाकारण्याचा धोका अधिक असतो. ड्रोनने मुंबईत अवयवाची ने-आण करणे शक्य आहे का?मुंबईतल्या मुंबईत अवयवाची ने-आण करण्यासाठी सध्या रस्ते मार्गाचा वापर केला जातो, पण पुढच्या काळात ड्रोनचा वापर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आयआयटीशी सध्या बोलणे सुरू आहे. हृदय आणताना सर्व वजन १० किलो इतके होते. त्यामुळे ड्रोन तितके वजन पेलू शकेल का, त्याचा वेग किती राहील, याविषयी चर्चा सुरू आहे. ड्रोन आणल्यास मुंबई पोलीस आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत ड्रोनला परवानगी मिळत नाही, पण आमच्यासाठी पोलीसच ड्रोनचा वापर करतील, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. जनजागृती झाली आहे का?डॉक्टरांमध्येही जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. गेल्या आॅगस्टपासून जनजागृती व्हायला लागली आहे. डॉक्टरांना हृदय प्रत्यारोपण, ब्रेनडेडरुग्ण याविषयी माहिती व्हावी,म्हणून जनजागृती व्याख्याने घेतलीजात आहेत. मी जेव्हा एमबीबीएसचे शिक्षण घेतले, तेव्हा ब्रेनडेड ही संकल्पना आमच्या अभ्यासात नव्हती. आता ब्रेनडेडविषयी धडा आहे. तामिळनाडूमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ब्रेनडेड घोषित करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे तिथल्या महाविद्यालयातून बाहेर पडणारे डॉक्टर हे शिकून बाहेर पडतात. त्यामुळे खासगी रुग्णालयात गेल्यावरही ब्रेनडेड रुग्णाचे निदान करणे ते सुरू करतात. अवयवदान करायचे असल्यास काय करावे? आपल्याकडे कोणाला अवयवदान करायचे असल्यास उत्तम उपाय म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावे. कारण अवयवदानाचे कार्ड असले, तरीही कायद्याप्रमाणे जवळच्या नातेवाईकांची संमती घेणे आवश्यक असते. परदेशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. कॅनडा, इटली, स्पेन या देशांत अवयवदानाविषयी चांगल्याप्रकारे जनजागृती झाली आहे. इटलीमध्ये जिवंत माणसांना अवयवदान करण्याची आवश्यकता भासत नाही. कारण तिथे मृत व्यक्ती आणि ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान केले जाते.परदेशात व्यक्ती १८ वर्षांची झाली की तिला प्रतिज्ञा करावी लागते. ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदान करणार की नाही? हे लिहिलेलेअसते. ज्या व्यक्तीला अवयवदान करायचे नसते, ती तसे जाहीर करते. आपण शरीर घेऊन आलेलो नाही किंवा सोबत घेऊन जाणार नाही. मृत्यूनंतर शरीर जाळणार आहोत किंवा पुरणार आहेत. त्यामुळे त्या अवयवांचा काहीच उपयोग नाही. दुसऱ्याला उपयोगी पडणे महत्त्वाचे आहे.कृत्रिम हृदयाविषयी तुमचे मत...कृत्रिम हृदय हा एक उत्तम पर्याय आहे. कारण ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदानाचा टक्का आणि रुग्णांची गरज यात मोठी तफावत आहे. त्यामुळे रुग्णांना हृदय मिळण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. हे टाळण्यासाठी कृत्रिम हृदय हा उत्तम पर्याय आहे, पण त्याचा खर्च जास्त आहे. सध्या परदेशातून कृत्रिम हृदय आणण्याचा खर्च हा सुमारे १ कोटी आहे, पण देशात संशोधन सुरू आहे. कमी खर्चात हृदय तयार झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. हृदयाचे कार्य म्हणजे रक्त पंप करणे. हृदयविकारात हृदय फक्त १० टक्के कार्यरत असते, तर उर्वरित हृदयाचे कार्य कृत्रिम हृदय म्हणजे पंपद्वारे होते. समुपदेशकांची आवश्यकता आहे का?एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या जवळच्या व्यक्तीला अवयवदानासाठी विचारणे हे सोपे काम नसते. डॉक्टर म्हणून मी स्वत: त्यांना विचारू शकत नाही. अशा वेळी स्वयंसेवी संस्थांतील समुपदेशक हे काम करू शकतात. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधल्यास, हे अवयवदान करण्यास कुटुंब तयार होऊ शकते. कार्डिओमयोपॅथी आजाराविषयी सांगा...कार्डिओमयोपॅथी हा अनुवांशिक आजार असून, संसर्गामुळेही या आजाराची लागण होऊ शकते, तर महिलांना प्रसूतीनंतर हा आजार जडू शकतो. आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला येणे, अशक्तपणा वाटणे. आतापर्यंत झालेल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियांत बहुतांश रुग्णांना हा आजार होता. ग्रीन कॉरिडोरचा फायदा कसा होतो?हृदय कमीत कमी वेळात आणणे आवश्यक असते. तेव्हा ग्रीन कॉरिडोर खूपच उपयुक्त ठरतो. ग्रीन कॉरिडोर करण्यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि सर्व ठिकाणच्या पोलिसांची खूपच मदत होते. ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था आता मुंबईत प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे हृदय आणताना तितक्याशा अडचणी येत नाहीत, पण विमानाने अथवा चार्टड प्लेनने हृदय आणताना अजूनही अडचणी येतात. त्या कमी झाल्यास बराच फायदा होऊ शकतो.(मुलाखत : पूजा दामले)
हृदय प्रत्यारोपण खर्च आवाक्यात येणे शक्य
By admin | Published: June 26, 2016 3:42 AM