हवामान बदलाचे संकट हे आता केवळ शैक्षणिक आणि बौद्धिक सेमिनार्समध्ये चर्चिले जाणारे प्रेझेंटेशन राहिलेले नाही. त्याचा प्रत्यय आपण सर्वजण आता नियमितपणे घेत आहोत. त्यामुळे विविध अहवाल प्रकाशित होतात आणि मागे पडतात. यात आश्चर्य वाटण्याजोग काही नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एखाद्या एजन्सीने याबाबत एखादा अहवाल प्रकाशित केला, तरी त्याविषयी फारशी चर्चा होत नाही, परंतु नोकऱ्या आणि रोजगार संधीवर त्याचा परिणाम होणार, असे म्हटल्याबरोबर सर्वांना अगदी खडबडून जाग येते. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताजा अहवाल ‘वर्किं ग ऑन ए वॉर्मर प्लॅनेट : द इम्पॅक्ट ऑफ हिट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिव्हीटी अॅन्ड डिसेंट वर्क’ अशा लांबलचक शीर्षकामुळे वेगळा ठरतोय़, पण त्यात जे चित्र रेखाटलंय, त्यामुळे अधिकच महत्त्वाचा ठरतोय. त्यानुसार, कृषी आणि बांधकाम या सर्वाधिक रोजगार पुरविणाºया क्षेत्रावर या तापमान वाढीचा मोठा घाला येणार आहे.
२०३० पर्यंत जगभरातील एकूण कामाच्या तासांपैकी सुमारे दोन टक्के कामाच्या तासाइतका काळ व्यर्थ जाणार असल्याचे या अहवालात सुचविण्यात आले आहे. कारण इतकी प्रचंड उष्णता असल्यामुळे एक तर कामच होणार नाही वा इतक्या धिम्या गतीने होईल की, त्यामुळे उत्पादकता घटले. भारताचा विचार करता, २०३० पर्यंत एकूण कामाच्या तासांपैकी (वर्किंग अवर्स) सुमारे ५.८ टक्के तास व्यर्थ जाऊन एकूण पूर्णवेळ कामाच्या ३.४ कोटी रोजगार संधीची हानी या जागतिक तापमानवाढीमुळे होणार आहे. हे सर्व प्रोजेक्शन्स २१व्या शतकाच्या अखेरीस जगाला तापमान वाढ सरासरीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअस राखण्यात यश येईल. या भाकितावर आणि भविष्यातील कार्यबलाच्या (लेबर फोर्स) ट्रेंड्सवर अवलंबून असून, त्यामुळे संपूर्ण जगातील उत्पादकता दरवर्षी ८० कोटी पूर्णवेळ नोकरी (कुल टाइम जॉब)च्या इतकी कमी होईल. या उष्णतेच्या तणावामुळे (हिट स्ट्रेस) एकूण जागतिक वित्तीय नुकसान २०३० पर्यंत २,४०० अब्ज डॉलर्स इतकं प्रचंड असणार आहे.
उष्णतेच्या ताणाचा सर्वाधिक प्रभाव आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात जाणवत असून, २०३० पर्यंत कामगारांच्या उत्पादकतेवरील त्याचा प्रभाव अधिकच जाणवेल. भारताला सर्वाधिक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलंय. उष्णतेच्या ताणामुळे भारतामध्ये १९९५ सालीच सुमारे ४.३ टक्के कामाचे तास वाया जात होते, ते प्रमाण २०३० मध्ये ५.८ टक्क्यांवर पोहोचणार आहे, शिवाय प्रचंड लोकसंख्यावाढीमुळे उष्णता ताणाचे परिणाम अधिकच होणार असले, तरी बांधकाम क्षेत्रामध्ये जास्तीतजास्त कामाचे तास वाया जाणार आहेत. जेव्हा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा वर जातं आणि दमटपणा वाढतो, त्यावेळी उष्णता ताण मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतो. अतिरेकी उष्णता कामाच्या वेळी आरोग्याला हानिकारक ठरून कामगारांच्या शारीरिक क्रियांमध्ये अडथळे आणते. ज्यावेळी शरीराचं तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं, तेव्हा ‘हिट एक्झॉशन’ घडतं आणि काम करण्याची क्षमता कमी होते.
जगात ९४ कोटी लोक कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यावर तर वाईट प्रभाव पडणारच आहे, पण या क्षेत्रावर ६० टक्के जागतिक कामाचे तास नष्ट होण्याची वेळ येणार आहे. उष्णता ताणांमुळे कृषी क्षेत्रातील मजुरांचे शहराकडे होणारं स्थलांतर वाढणार आहे, परंतु तिथे बांधकामासारख्या क्षेत्रातही तेच घडणार आहे. नाशिकमध्ये उष्णता ताणामुळे खान्देश आणि विदर्भातूून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन आता नाशिकला त्यांच्याच पंक्तीत बसविण्याचं म्हणजे ‘उष्ण शहर’ बनविण्याचं कामदेखील जवळपास पूर्णत्वास आलंय.उष्णतेच्या ताणामुळे कामाच्या ठिकाणी असलेली लिंगभेदाधारीत दरी (जेंडर गॅप) वाढण्याची शक्यतादेखील अहवालात सूचित करण्यात आली आहे. गरोदर स्त्रियांच्या दृष्टीने तर अधिक उष्णतेमुळे आरोग्य आणि उत्पादकता जोखिमा खूपच मोठ्या प्रमाणात वाढतील.
त्याचबरोबर, वयस्कर कामगारांना त्यांच्यामधील उष्णतेशी लढा देण्याच्या कमी पातळीमुळे खूपच त्रास होणार आहे. देशांमधील वयस्कर लोकांचं कामगार क्षेत्रातील प्रमाण लोकसंख्येच्या ‘एजिंग’मुळे वाढतंय, तेव्हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगार असलेल्या भारत, बांगलादेश, कंबोडिया आणि नेपाळसारख्या देशातही वयस्कर कामगार वाढताना दिसत आहेत. तेव्हा उष्णतेच्या ताणाचे संकट खूपच गांभीर्याने घेऊन पावलं उचलावी लागणार आहेत, हे निश्चित.- शैलेश माळोदे। हवामान बदलाचे अभ्यासक