‘मला अटक होतेय, त्याला जबाबदार ट्रम्प आणि मोदी यांची ‘गहरी दोस्ती’ आहे.’ असा ‘मेसेज’ हाफीज सईदने आपल्या पाठीराख्यांना दिला. आणि आपल्याकडे समाजमाध्यमातल्या भक्तगणांनी भारतासह मोदींच्या कर्तबगारीचे कौतुकपोवाडे गायला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींच्या कूटनीतीचे यश, भारत-अमेरिका संबंधातले नवे आशादायी ट्रम्प-मोदीपर्व असे शिक्कामोर्तबही या घटनेवर काही उतावीळ समाजमाध्यमींनी करून टाकले. मात्र हाफीज सईदला सहा महिने नजरकैदेत ठेवण्याच्या पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचे सारे श्रेय असे मोदी आणि ट्रम्प दोस्तीला देऊन टाकणे म्हणजे या घटनेकडे हाफीज आणि पाकिस्तानने दाखवलेल्या चष्म्यातूनच पाहण्यासारखे आहे. वॉशिंग्टनचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे ओळखून त्या दिशेनेच पाठ फिरवणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या मुरब्बी राजकारणाची ही एक खेळी आहे. ट्रम्प यांनी सात मुस्लीमबहुल देशातल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली. त्याचवेळी पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देशही केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालते, आपल्याला साथ देत नाही असे ट्रम्पना वाटू नये म्हणून घाईने दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांच्या मुसक्या आवळत असल्याचा आव पाकिस्तानने आणला आहे. स्वत:हून एक पाऊल पुढे टाकत वॉशिंग्टनला सकारात्मक संदेश पाठवला आहे. म्हणूनच या घटनेने भारताला फायदा होईल किंवा तो भारतीय कूटनीतीचा विजय आहे असे मानणे भोळसटपणाचे ठरावे. उलट नजरकैदेत असल्याने हाफीज सईद कसा कशातच सहभागी (असू शकत) नाही असे म्हणत पाकिस्तान त्याला आणि त्याच्या संघटनेच्या कृत्यांना एक सुरक्षाकवचच पुरवणार आहे. म्हणून तर ५ फेब्रुवारीला पाकिस्तानसह काश्मीरमध्ये ‘काश्मीर एकता दिवस’ अधिक जल्लोषात साजरा करण्याचा नारा हाफीज सईदने आपल्या संघटनांना दिला आहे. तेव्हा या नजरकैदेच्या पाकिस्तानी पवित्र्याकडे डोळसपणे पहायला हवे; नजरबंदी होण्याचा धोका कमी झालेला नाही, तर वाढला आहे.
नजरकैदेचा छुपा डाव
By admin | Published: February 01, 2017 5:37 AM