कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले, तर इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींवर टोमणे मारण्याची संधी साधली. हे चांगले लक्षण नव्हे.
अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच, भारताच्या पश्चिम सीमेवरील कर्तारपूरची मार्गिकाही खुली झाली. कर्तारपूर येथील दरबार साहिबमध्ये गुरू नानकदेव यांचे सन १५३९ पूर्वी आयुष्याची अखेरची १८ वर्षे वास्तव्य होते. शीख संप्रदाय घडविण्याचे काम मुख्यत: दरबार साहिब येथून झाले. फाळणीनंतर कर्तारपूर पाकिस्तानात गेल्याने दरबार साहिबचे दर्शन दुरापास्त झाले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांत रावी नदीवरील पूल ओलांडून तेथे जाता येई. मात्र, १९६५च्या युद्धात हा पूल उद्ध्वस्त झाला. या युद्धानंतर भारत व पाकिस्तान यांच्या संबंधात कटुता आली आणि दरबार साहिबला जाणे जवळपास अशक्य झाले. भारतीय सीमेपासून हे ठिकाण अवघे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे. सीमेवरून दुर्बिर्णीच्या साहाय्याने दरबार साहिबचे दर्शन घेतले जाई. तेथे विनासायास जाता यावे, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. दरबार साहिबचा भाग भारताकडे देऊन, त्या बदल्यात अन्य भूभाग पाकिस्तानला देण्याची तयारी इंदिरा गांधी यांनी दाखविली होती. पाकिस्तानमधून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. काही निवडक लोकांना दरबार साहिबच्या दर्शनाची परवानगी पाकिस्तानकडून मिळत होती. मात्र, त्यासाठी लाहोरमार्गे १५० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असे.कर्तारपूरला थेट जाण्याचा मार्ग खुला करावा, ही कल्पना अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या लाहोर भेटीत मांडली. मनमोहन सिंग यांनीही त्याचा पाठपुरावा केला आणि जवळपास २० वर्षांनंतर ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या लष्कराने त्यामध्ये आडकाठी आणली नाही हे विशेष. दरबार साहिबची देखभाल फारशी केली जात नव्हती, परंतु गेल्या वर्षभरात पाकिस्तान सरकारने बराच पैसा खर्च करून तो परिसर अत्यंत सुशोभित आणि अद्ययावत सुखसोईंनी युक्त असा केला आहे. पाकिस्तानी हुकुमतने हे काम इतके झपाट्याने केल्याबद्दल खुद्द इम्रान खान यांनीही आश्चर्य व्यक्त केले. कर्तारपूरला जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका खुली होणे आणि व्हिसा न घेता शिखांना तेथे जाण्याची अनुमती मिळणे, हे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा अनेकांना वाटते. मोदी आणि इम्रान खान यांनी आपल्या भाषणात ही भावना व्यक्त केली. कर्तारपूरला भेट देणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याचा उच्चार केला. बर्लिनची भिंत पाडली जाण्याच्या ऐतिहासिक घटनेशी मोदींनी रविवारच्या समारंभाचा संबंध जोडला, तर इम्रान खान यांनी फ्रान्स व जर्मनी एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही, असा प्रश्न केला. भारत व पाकिस्तान यांच्या सामाईक बाजारपेठेचा उल्लेखही या भाषणांत झाला. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यात कर्तारपूरची मार्गिका हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी दोन्ही देशांकडून प्रामाणिक व अथक प्रयत्न झाले पाहिजेत. पाकिस्तानकडून अशा प्रयत्नांची विशेष अपेक्षा आहे. कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी आपल्या भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले.मात्र इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. दरबार साहिबसाठी लष्कराने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांकडे यासाठीच भारताला सावधानतेने पाहावे लागते. १९६० व १९८०च्या दशकात पाकिस्तानने पोसलेले खलिस्तानचे भूत भारताला विसरता येत नाही. पुन्हा पंजाब पेटविण्याचे प्रयत्न पाककडून होत नाहीत ना, याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. भारताशी संबंध सुधारण्याची प्रामाणिक इच्छा असती, तर भिंद्रनवालेंसारख्या खलिस्तानी समर्थकांची भित्तीपत्रके कर्तारपूरमध्ये पाकिस्तानने लावू दिली नसती. इन्सानियतच्या नावाखाली खलिस्तान्यांना वाट मोकळी करून देण्याचा छुपा उद्देश नाही ना, असा संशय यामुळे येतो आणि कर्तारपूरच्या मार्गिकेवरून सावध पावले टाकावी लागतात.