भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्याची बातमी ऐकली, तेव्हा मनात उमटलेली पहिली प्रतिक्रिया अर्थातच अभिमानाची होती. खास करून ज्या वैमानिकांनी या आॅपरेशनमध्ये भाग घेतला, त्यांचा मला हेवा वाटतो. प्रत्येक वैमानिकाचे लॉग-बुक असते. आम्ही त्यात लिहितो की, आज ४० मिनिटे इकडे उड्डाण केले, ५० मिनिटे तिकडे केले वगैरे. हे लेकाचे त्यांच्या लॉग-बुकमध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिणार की, ‘आज मैने पाकिस्तान टेरिरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर को चेप दिया आॅर व्हॉटएव्हर.’ या सर्व वैमानिकांसाठी मी खूप आनंदी आहे. त्यानंतर, वायुसेनेतले सर्व अधिकारी ज्यांनी या हवाई हल्ल्याचे नियोजन केले, त्यांचा खूप अभिमान वाटतो. सगळ्यात महत्त्वाचे असते राजकीय नेतृत्त्व. प्रत्येक हवाई हल्ल्याला कणखर नेतृत्त्वाचा पाठिंबा लागतो. त्याच्याशिवाय हे घडलेच नसते.
पुलवामा घटनेनंतर या हल्ल्याची तयारी लगेच सुरू झाली असणार. कारण पाकिस्तानातली जी-जी टार्गेट्स आहेत, त्यांची सगळी माहिती आपल्याकडे आहे. अनेक वर्षांपासून दरवर्षी ती अपडेट केली जाते. दहशतवादी तळ कोठे आहेत, त्यांचे बांधकाम-सुरक्षा व्यवस्था काय आहे, किती दहशतवादी तळावर आहेत, ही माहिती मानवी इंटेलिजन्समधून मिळवावी लागते. ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते बॉम्ब वापरावे लागतील, हवाई संरक्षणाची पाकची व्यवस्था काय, त्यांची हवाई शस्त्रास्त्रे कोणती, ही सगळी माहिती जमविली जाते. हल्ला अंधारातला होता. लक्ष्यभेद जिथे करायचा होता, तो भाग टेकड्यांचा आहे. त्या भागातले रात्रीचे हवामान काय, ढग असतील का, हल्ल्याच्या वेळचे हवामान कसे, हा अंदाज घ्यावा लागतो. शत्रूचे रडार कुठे आहेत, टेहळणीच्या वेळा कोणत्या, त्या कधी चालू-बंद होतात, या सारख्या अनेक मुद्द्यांचा विचार करून टार्गेट मॉडेल तयार केले जाते. हल्ल्यासाठी निवडलेल्या वैमानिकांना लक्ष्यभेदापूर्वी टार्गेटची कोपरान् कोपरा माहिती डोक्यात साठवावी लागते. त्यानंतर, टार्गेट मॉडेलवर हल्ल्याचा सराव केला जातो.
प्रिसिजन अँटकमध्ये कसल्याही प्रकारची हानी अपेक्षित नसते. नेमका लक्ष्यभेद करून सुरक्षित परतायचे असते. त्यासाठी योग्य शस्त्रास्त्रे आणि लढाऊ विमानांची निवड केली जाते. मिराज आणि सुखोई-30 हे आपले सर्वोत्कृष्ट पर्याय आहेत. कारगील युद्धात वापरलेल्या मिराजचा वापर याही वेळी केला गेला. मिराजच्या संरक्षणासाठी सुखोई-30 तयार ठेवली गेली. हल्ल्यासाठी उड्डाण केलेल्या विमानांच्या संरक्षणासाठी आणि संपूर्ण कारवाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी एवॅक्स यंत्रणा वापरली जाते. या सगळ्याला स्ट्राइक पॅकेज म्हटले जाते. स्ट्राइक पॅकेजमध्ये चार लढाऊ विमानांनी हजार किलोची शस्त्रास्त्रे घेऊन उड्डाण केले असेल, तर आणखी दोन-तीन विमाने इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्ससाठी सोबतीनेच उड्डाण करतात. देशातल्या इतर विमानतळांवरून आणखी लढाऊ विमाने एकाच वेळी उड्डाण करतात. यामागचा उद्देश शत्रूची दिशाभूल करणे आणि शत्रूची रडार यंत्रणा जॅम करण्याचा असतो. कोणते विमान कोणत्या दिशेला जाणार, हे शत्रूला कळू दिले जात नाही.
अर्थात, पुलवामाच्या घटनेनंतर पाकिस्तान गाफील राहिले असेल, असे मला अजिबात वाटत नाही. आपले नियोजन आणि वैमानिक-तंत्रज्ञांची अंमलबजावणी अत्युच्च दर्जाची ठरली. महत्त्वाचे म्हणजे, आपण हल्ला कशावर केला, तर दहशतवादी तळावर. पाकिस्तानच्या नागरी वस्तीवर किंवा सैन्यावर नाही. जैश-ए-मोहम्मदला प्रतिबंध घालण्याचे वचन पाकिस्ताननेच दिले होते. त्यात ते अयशस्वी ठरले. उलट आपण या कामी त्यांना मदत केली, असेच म्हणावे लागेल. शिवाय, पुलवामाला आपण दिलेले हे प्रत्युत्तर होते. पुलवामा घडले नसते, तर हा हल्ला झालाच नसता. आता पाकिस्तान फार मोठ्या कोड्यात असेल की, आपण काय करायचे. कारण भारतात दहशतवादी तळ नाहीत. ते हल्ला करणार कोठे? तरीही खूपच धाडस दाखवून त्यांनी एखादा हल्ला केलाच, तर त्याला उत्तर देण्यासाठी आपण सुसज्ज आहोत. पाकिस्तानला कसलेही यश मिळणार नाही, पण दहशतवादी हल्ले ते चालूच ठेवतील. त्याला तोंड देण्यासाठी आपल्याला इंटेलिजन्स गोळा करण्याची प्रक्रिया अधिक बिनचूक आणि अखंड ठेवायला लागेल.युद्ध हे कोणत्याही देशाला दहा-पंधरा वर्षे मागे घेऊन जाणारे असते. त्यामुळे युद्ध हे उत्तर नसून, अंतिम पर्याय असतो. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानसुद्धा युद्धाला तयार नसणार. चीनचा पाठिंबा पाकिस्तानला आहे की नाही, याची फिकीर आपण करण्याची गरज नाही. चीनसुद्धा दहशतवादाला थारा देणार नाही.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचे चटके चीनलाही बसू लागले आहेत. पाक-चीनचा व्यापारीदृष्ट्या भागीदार असल्याचे दु:ख आपण करण्याचे कारण नाही. हाफीज सईद, मसूद अझहर यांना दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी आपण चीनच्या किंवा इतर देशांच्या पाठिंब्याची प्रतीक्षा करण्याचे कारणच काय, या दहशतवाद्यांना संपविण्यासाठी आपण आपल्या ताकदीवर प्रयत्न केले पाहिजेत. काहीही केले तरी पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपटी आहे. ती वाकडी ती वाकडीच राहणार. आपण दोनशे टक्के सावध राहण्याची गरज आहे.- पी. व्ही. नाईक, माजी एअर चीफ मार्शल