मुंबईतील आरे कॉलनी असो वा नाशिक, नगर... आपल्या भागात आढळणाऱ्या बिबट्याचे आपल्याला फारसे कौतुक नाही. ते असेल तरी कसे? एकतर तो आपली पाळीव जनावरे पळवितो किंवा माणसालाच मारतो. हिमालयात आढळणारा बिबट्या म्हणजेच हिमबिबट्याचे तसे नसते. तो मुळातच लाजाळू प्राणी. पर्वताच्या रांगांमध्ये आणि तेही बर्फात तब्बल ५ हजार मीटर उंचीवर तो राहतो. त्यामुळे माणसांच्या हस्तक्षेपाचा फारसा प्रश्नच येत नाही.
लेह-लडाखमध्ये जाऊन हा हिमबिबट्या पाहायचा बेत अनेक वर्षांपासून होता. हिवाळ्यात तो तसा नक्की दिसतो. पण उणे ३० अंश डिग्री सेल्सिअस तापमान कसे सहन होणार? म्हणून सप्टेंबरचा पहिला आठवडा निवडला. बिबट्या दिसणे तसे कठीणच होते. पण तो राहतो कुठे, त्याचे खाद्य काय, त्याचा आणि गावखेड्यांचा संबंध कसा येतो, माणसांशी संघर्ष नसला तरी तो संकटात कसा आला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेह गाठले. मराठवाड्यातील साधारण ३५पेक्षा जास्त अंश सेल्सिअस तापमान डोक्यावर घेण्याची सवय. लेहमधील हेमिस नॅशनल पार्क हे या बिबट्याच्या दर्शनासाठी जगातील सर्वाधिक भरवशाचे ठिकाण समजले जाते. सप्टेंबर असला तरी विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पर्वतरांगा तेथील थंडीची चाहूल देत होत्याच. लेह विमान तळावर लँड होण्याआधीच बाहेर १२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची सूचना हवाईसुंदरीने दिली आणि थंडीआधीच जणू हुडहुडी भरली.
जिथे सतत बर्फ पडतो, अशा पर्वताच्या रांगांमध्ये हिमबिबट्या राहतो. त्याला शोधून कसे काढणार? आपल्याकडच्या जंगलात एखाद्या बिबट्या वा वाघाला शोधून काढावे, इतके सोपे हे नक्कीच नव्हते. या बिबट्यावर फिल्म करण्यासाठी सोनी बीबीसी अर्थ या वाहिनीने २०१३-१५ असे तब्बल तीन वर्षे हेमिस नॅशनल पार्कमध्ये काम केले. ही फिल्म १८ सप्टेंबरपासून या चॅनलवर दाखविली जाणार आहे. या बिबट्याच्या शोधात दुसऱ्या दिवशी सकाळीच ठरल्याप्रमाणे ‘हेमिस’चा रस्ता धरला. लेहच्या शहरी झगमगाटातून वाट काढत आमची कार हेमिसच्या दिशेने निघाली. नागमोडी रस्त्यावरून वाट काढत ती पाच हजार मीटर उंच टोकाच्या दिशेने जात होती. पर्वतरांगा पांढरी शाल पांघरूण निवांत क्षण घालवीत असाव्यात, असाच भास होत होता. साधारण दोन तासांच्या प्रवासानंतर एका पर्वताच्या पायथ्याशीच कार रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. सात घोडे आणि पाच माणसे आमची वाट पाहत आधीपासूनच उभी होती. पुढचा प्रवास पायी चालण्याचा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही चौघांनी आपापली ट्रेकिंग बॅग पाठीवर घेतली. मोठ्या ट्रॉली घोड्याच्या पाठीवर लादण्यात आल्या. तंबूत मुक्काम असल्याने खाणपाणाची व्यवस्था असलेली पोतीही घोड्यावर लादण्यात आली. सूर्य डोक्यावर चढू लागल्याने आता चांगलीच उष्णता जाणवत होती. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री तेवढीच थंडी, असे हे टोकाचे वातावरण. या नॅशनल पार्कमध्ये एकूण १७ गावे येतात. यातील रुम्बक गावाजवळ तंबूमध्ये आमचा मुक्काम ठरला होता. सोनी बीबीसीच्या टीमसोबत ९० दिवस या पार्कमध्ये घालविलेले ऑपरेटर स्टॅनझीन गुरमीत आणि ‘वाईल्डलाईफ’चे खेनराब फुंटरोग हे दोघेही सोबत होते. त्यामुळे कुठला प्राणी कुठे आढळू शकतो, त्याचे कॉलिंग कसे असते, शूटिंगदरम्यान काय-काय घडले, बिबट्याला शोधण्याची कसरत कशी केली ही सर्व माहिती या दोघांकडून ट्रेकदरम्यान मिळत गेली. पांढºयाशुभ्र बर्फात किंवा खडकांच्या रंगात मिसळून जावा असा या बिबट्याचा रंग. त्यामुळे तो समोर आला तरी कळणे कठीण. जंगलात कुठल्याही प्राण्याचे दर्शन होण्यासाठी नशीब लागते. हिमबिबट्याच्या बाबतीत तर हे नशीब कितीतरी पट जास्त असावे लागते. संयमाची परीक्षाच असते ती.
खेनराब म्हणाला, ‘आमच्यासाठी ही परीक्षा तब्बल ९० दिवसांची होती. एकतर बिबट्याचे कॉलिंग फार अपवादाने लक्षात यायचे. जेव्हा यायचे त्यावेळी नेमकी कॅमेऱ्यांची बॅटरी संपत आलेली असायची. रक्त गोठविणाऱ्या थंडीत आम्ही साधारण ३ हजार मीटरवरून परत खाली येऊन बॅटऱ्या चार्ज करून परतायचो. तोपर्यंत बिबट्या नजरेआड झालेला असायचा. या पर्वतांवरून खाली-वर करताना कधी-कधी नकोसे वाटायचे. पण अखेर तो दिवस उजाडला. मादी बिबट्याचे कॉलिंग (इशारे) सुरू झाल्याचे लक्षात आले. आता नर बिबट्या मेटिंग (समागम)साठी तिच्याकडे येणार हे निश्चित होते. मध्येच डिस्टर्बन्स आल्याने तसे घडले नाही. संधी गेली असे वाटत असतानाच पुन्हा कॉलिंग सुरू झाले. पुन्हा तेच घडले. नशीब साथ देत नव्हते. तिसºया वेळी पुन्हा कॉल सुरू झाला. कॅमेरे रोखलेलेच होते. कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या तपासून घेतल्या. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नर बिबट्या कॅमेºयासमोर आला. एवढेच नव्हे तर मेटिंगचे शूटिंगही मिळाले. एखाद्या वन्यजीवप्रेमीचा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण यापेक्षा दुसरा असूच शकत नाही...’ शूटिंग झालेले हे ठिकाण स्पॉटिंगमधून स्कोपमधून आम्ही पाहिले. त्यावेळी आम्ही साधारण ३ हजार मीटर उंचीवर होतो आणि तेथून हे ठिकाण पुढे दोन हजार मीटर उंचीवर होते. वर पाहिले तर डोक्यावर टोपी नाही राहणार. आजूबाजूला आधार घ्यावा असेही काही नाही. केवळ प्राणीप्रेमाने झपाटलेला माणूसच हे करू शकतो. या झपाटलेल्या प्राणीवेड्यांचा थ्रील ‘फिल्म’मध्ये पाहायला मिळणार होताच. प्रत्यक्ष साइटवर त्याचा अंदाज आला. हिमबिबट्याच्या शूटिंगचे पहिल्या वर्षी ४० दिवस काम चालले. बिबट्याचे मेटिंग याचवर्षी कॅमेराबद्ध करता आले. दुसºया वर्षी २५ दिवस बर्फात काढूनही हाती काहीच लागले नाही. तिसऱ्या वर्षी पुन्हा २५ दिवस या थंडीत काढण्यात आले. या काळात मेटिंगसह बिबट्याचे अनेक बारकावे टिपता आले. यासाठी चार कॅमेरामन आणि प्रत्येक कॅमेरामनसोबत तीन-तीन जणांची टीम कार्यरत होती. सकाळी ८ पासून ते रात्री १० वाजेपर्यंत असे एकूण ९० दिवस या टीमने रक्त गोठविणाºया थंडीत अक्षरश: घाम गाळला. हे सांगत असतानाच खेनराब ‘हेमिस’ पार्कमधील छोटे-छोटे बारकावे, तेथील प्राणी-पक्ष्यांची माहिती आम्हाला सांगत होता. स्पॉटिंग स्कोपमधून यातील काही दिसते का याची चाचपणीही करीत होता. या स्कोपमधूनच आम्हाला ब्ल्यू शीपचे दर्शन झाले. एक-दोन नव्हे तीन ठिकाणी पर्वताच्या अगदी टोकावर या मेंढ्यांनी आम्हाला दर्शन दिले. याच स्कोपने आम्हाला गोल्डन इगल (सुवर्ण गरूड) चेही जवळून दर्शन घडविले. ६०० चौरस कि.मी.वर पसरलेल्या या नॅशनल पार्कमध्ये २०० च्या आसपास हिमबिबटे असल्याचे आकडेवारी सांगते. अर्गली म्हणजे तिबेटियन मेंढी, भराई म्हणजे निळी मेंढी, शापू म्हणजे जंगली मेंढी आणि एशियाटिक बोकडही याच नॅशनल पार्कमध्ये आढळतो. जवळपास १६ प्रजातींचे प्राणी येथे आढळतात. आम्हाला यातील भराईचेच दर्शन झाले. हा पार्क म्हणजे हिमालयीन पक्ष्यांचे माहेर समजले जाते. पक्ष्यांच्या जवळपास ७३ प्रजाती येथे आढळतात. आम्हाला यातल्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रजातींचे दर्शन झाले. जवळपास चार तासांच्या ट्रेकनंतर आम्ही तंबूच्या ठिकाणी पोहोचलो. आमच्यासोबतचे इतर पाच जण आणि पाच घोडे आधीच पोहोचले होते. चार जणांसाठी चार तंबू, एक कीचनसाठी तंबू, एक डिनरसाठी आणि एक त्या सर्वांसाठी, असे सात तंबू उभारून झाले होते. तंबूच्या बाजूनेच नदी वाहत होती. याच नदीत हात-पाय धुऊन तोंडावर थोडे पाणी मारले. स्वत:ला तोंड, हात आणि पाय आहेत की नाही याचा शोध नंतर कितीतरी वेळ घ्यावा लागला. ‘ब्लॅक टी’ने ही थंडी काहीशी कमी केली. रात्री जेवण आटोपले. तापमान सहा अंशांपर्यंत गेले होते. तंबूत एकावर एक दोन स्लीपिंग बॅग, आत जर्कीन, कानटोपी आणि हातमोजे... झोप कधी लागली ते कळलेही नाही.
हिमबिबट्याच्या जगात...हा हिमबिबट्या समुद्रसपाटीपासून ३३५० ते ६७०० मीटर उंचीवर दिसतो. ७५ ते १३० सेंटीमीटर लांबी असलेल्या या बिबट्याची मादी यापेक्षा थोडीशी लहान असते. २७ ते ५५ किलोदरम्यान त्याचे वजन असते. सहा हजार मीटर उंचीवर पर्वतरांगांमध्ये तो राहत असला तरी अन्नाच्या शोधात तो १२०० ते २००० मीटरपर्यंत खाली येत असतो. मोठमोठाले दगड आणि त्याच वेळी ८५ सेंटीमीटर बर्फातही तो अगदी सहजपणे राहू शकतो. जगभरात या हिमबिबट्याची संख्या ४५१० ते ७३५० इतकी सांगितले जाते.