- राजू नायक
हिंदू दहशतवाद हा इस्लामी भयाएवढाच गंभीर धोका असल्याचे आता हळूहळू सामोरे येऊ लागलेय. कर्नाटक व महाराष्ट्रातून जो तपास झालाय, त्यातून या धोक्याचा केवळ काही अंश समोर आलाय. पाण्यावर तरंगणारा हिमनगाचा एक छोटासा तुकडा. दुर्दैवाने तपास वेगाने पुढे जात नाहीए. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्राने आता आरोपपत्र सादर केलेय. त्यात सनातनी प्रवृत्तीकडे मुख्यत्वे अंगुलीनिर्देश आहे. परंतु या प्रवृत्तीला दणका बसेल?
देशातील प्रमुख विचारवंतांच्या झालेल्या हत्यांमध्ये हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे कर्नाटकातील विशेष तपास पथकाने हुडकून काढले होतेच. नालासोपारा येथे १० ऑगस्टला मोठा शस्त्रसाठा सापडला, त्यातही हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या समविचारी दहशतवादी टोळ्या गुंतल्याचे महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने आपल्या दोषारोपपत्रत बुधवारी म्हटले आहे. त्यातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात या गटांनी कसा सूत्रबद्ध धुडगूस घातला होता, ती बाब सामोरे आलीय. दुर्दैवाने हा जर एका विस्तृत कटाचा भाग असला तर त्याचे मुख्यालय गोव्यात आहे. हा कोन शोधून काढण्याचे आव्हान गोव्यासमोर आहे. दुर्दैवाने त्यासाठी गोव्यात एखादी हत्या होण्याची वाट पोलीस पाहात असावेत.
कर्नाटकात २०० लोकांची धरपकड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने हिंदुत्वाच्या विचाराने देशात अतिरेकी कारवाया करणा-या कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील युवकांचा समावेश आहे. कर्नाटकाच्या एसआयटीने दावा केलाय की गौरी लंकेश हत्या प्रकरणात हे लोक गुंतले आहेतच; परंतु कलबुर्गीसह महाराष्ट्रात इतर ज्या दोन हत्या झाल्यात- नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे- यातही त्यांचा संबंध आहे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या दोन्ही आरोपपत्रांमध्ये सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती गुंतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या दोन्ही संस्था जरी वेगवेगळ्या नावांनी कार्यरत असल्या तरी त्यांचा कर्ताकरविता एकच आहे. मी तसा संशय १० वर्षापूर्वी व्यक्त केला होता, त्या वेळी गोव्यात देवळ्या, घुमटय़ा फोडल्या जात होत्या. पहिल्या रात्री घुमटय़ा फोडण्याचा अवकाश दुस-या दिवशी हिंदू जागृतीवाले आंदोलन करीत रस्त्यावर! म्हणजे हिंदूंमध्ये कलह, संताप निर्माण करणे व दंगली घडविणे. मी त्यांच्यात संबंध जोडला होता. मी जे लिहीत होतो, आणि मी जो संशय व्यक्त करीत होतो, तो गोवा पोलिसांना दिसत नव्हता. पोलीस दलात अर्धे हिंदू धार्जिणेच घुसले आहेत. किंवा मला काय त्याचे, ही प्रवृत्ती! वास्तविक दोन बॉम्बस्फोटांनंतर २००८ किंवा २००९ मध्येच जर महाराष्ट्र व गोवा पोलिसांनी सनातन्यांची गठडी वळली असती तर या प्रवृत्ती आताच्या सारख्या शिरजोर झाल्या नसत्या. मडगाव बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मलगोंडा पाटील व योगेश नाईक यांची भुतेसुद्धा त्याच दृष्टीने साक्ष देतील. २००९मध्ये गोव्यात हा प्रकार घडण्यापूर्वी २००८ मध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये या सनातन्यांचे भीषण रूप प्रगट झाले होते. ठाणे आणि वाशी येथे बॉम्ब पेरल्याच्या आरोपावरून रमेश गडकरी व विक्रम भावे या दोघा सनातन्यांना पोलिसांनी अटक केली, ठाण्याच्या थिएटरच्या वाहनतळामध्ये बॉम्बचा स्फोट होऊन सात जण जखमी झाले होते. ‘आम्ही पाचपुते’ नाटक सादर करण्याला त्यांचा विरोध होता. त्यात म्हणे हिंदू देवदेवतांची विटंबना करण्यात येते. या घटनांमुळे महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये सनातन संस्थेवर बंदी लागू करावी अशी विनंती करणारा प्रस्ताव केंद्राला पाठविला. परंतु त्यावर केंद्र सरकारने काही हालचाल करायच्या आतच २०१३ मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली व त्यानंतर २०१५ मध्ये कोल्हापुरात गोविंद पानसरे यांचा बळी घेण्यात आला. २०१५ मध्येच धारवाड येथे एम. एम. कलबुर्गी तर २०१७ मध्ये बंगळुरूत गौरी लंकेश या हिंदू दहशतवाद्यांच्या गोळीच्या शिकार बनल्या. २०१५ मध्ये सांगलीतून सनातनचे साधक समीर गायकवाड व २०१६मध्ये दाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेला अटक झाली. हिंदू जनजागृती समितीचा तो पश्चिम भागातला कमांडर होता. कलबुर्गीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला रुद्रा पाटील हा तर गोव्याच्या सनातन संस्थेशी प्रत्यक्ष निगडित असल्याचा आरोप आहे. लंकेश हत्या प्रकरणाची ज्याने आखणी केली तो हिंदू जनजागृती समितीचा पुण्याचा माजी निमंत्रक होता. त्याच्यामार्फत पोलिसांना खुनी आणि उजव्या शक्तींचे कारनामे यांचे धागेदोरे जुळविता आले. त्यात पिस्तुले पैदा करण्याची पद्धत, कट शिजविणे, मारेकरी पाठविणे आदी गोष्टींचा पडताळा झाला. वैभव राऊत याच्या घरात जी स्फोटके सापडली त्यातील काही मराठा मोर्चा व बकरी ईदच्या दिवशी वापरून धार्मिक दंगली घडवून आणण्याचे कारस्थान होते.
सनातन संस्थेच्या ‘क्षात्र धर्म साधना’ या पुस्तकानुसार कट रचला असे कर्नाटक एटीएसने नोंदविले आहे. या प्रकरणात सनातनी प्रवृत्तींबरोबरच श्रीराम सेना, हिंदू युवा सेनेसारख्या संघटनाही गुंतल्याचा संशय कर्नाटकातील पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता संस्था प्रत्यक्षात किती प्रमाणात गुंतल्या आहेत आणि ज्या व्यक्ती पकडल्यात त्यांनी स्वत: होऊनच ही कृत्ये केली याचा पत्ता लावणे व एका मोठय़ा कटाचा तो भाग असल्याचेही हुडकून काढणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तसे घडले तर अजूनपर्यंत आपण ‘हिंदू दहशतवाद’ ही संज्ञा वापरायला बिचकत होतो, ती अत्यंत भयांकृतरीतीने सामोरे येणार आहे. हिंदुत्वाचा तो महाभयंकर चेहरा असेल. अजूनपर्यंत गायींना मारल्याच्या केवळ संशयावरून दंगली घडविणारी, आतंक निर्माण करणारी प्रवृत्ती आता आपल्याच समाजाविरुद्ध निर्घृणपणे हिंसाचार घडवून आणण्यास कचरत नाही असा दहशतवाद! ज्यांना भारत देश ‘तालिबानी’ अफगाणिस्तान बनवायचा आहे!
कर्नाटकाच्या आरोपपत्रात यासंबंधीचा एक धागा सापडतो तो म्हणजे, या संस्था अक्कलहुशारीने म्हणजे कावेबाजपणे काम करतात. युवकांच्या मेळाव्यांमध्ये भडक डोक्याच्या हिंदुत्ववादी तरुणांना हेरायचे. त्यांना आपल्यात सामील करून घ्यायचे. त्यांच्या डोक्यात हिंदुत्ववाद किंवा राष्ट्रवाद भिनविला की पुढचे काम सोपे व्हायचे. त्यांना कोण तरी नेऊन बंगळुरूला ठेवायचा. एक जण पिस्तूल आणून द्यायचा, दुसरा मोटरसायकलवरून न्यायचा.. तिसरा घर दाखवायचा. या मारेक-याचे काम, नि:शस्त्र विचारवंतावर गोळ्या झाडायच्या.
नालासोपा-यात जो शस्त्रसाठा सापडला, तो पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडविण्याच्या हेतूने ठेवला होता. लक्षात घेतले पाहिजे की या लोकांनी मारलेले कोणी परधर्मीय, धर्माच्या विचाराने पिसाटलेले दहशतवादी नाहीत, ते साधेसुधे खादीधारी विचारवंत आहेत. त्यांचा दोष काय असेल तर ते आपल्याच धर्मातील बुरसटलेल्या रूढी, प्रथांवर प्रहार करायचे, लोकांना विवेकबुद्धी बाणवण्यास सांगायचे. सनबर्नमध्ये त्यांनी जर स्फोट घडविला असता तर निष्पाप हिंदू तरुण-तरुणींचेच बळी गेले असते. सनबर्नमध्ये असे काय हिंदूविरोधी होते! कदाचित सनबर्नमधील संगीत आणि आधुनिक युवकांचा व्यवहार हा हिंदू संस्कृतीला बाधा आणतो. म्हणजे मुस्लीमधार्जिण्या कट्टरवाद्यांप्रमाणे यांचाही संगीत, नाच, आनंद-जोश यांना विरोध. याबाबत मुस्लीम कट्टरपंथीय व हिंदू कट्टरपंथीयांमध्ये साम्य आहे. दोघेही तालिबानचे पुरस्कर्ते. म्हणजे धर्म हा नियंत्रित असावा, मुस्लिमांच्या पवित्र पुस्तकापेक्षा अतिरेकी जे अर्थ लावतील तो खरा धर्म! तसा सनातन हिंदू धर्माचा अर्थ हे तालिबान्यांचे गोमंतकीय वंशज आम्हाला सांगणार!
म्हणजे तालिबानी मिशी छाटून टाकायला सांगतील; परंतु मुस्लिमाने दाढी राखलीच पाहिजे. त्याने कोणता पेहराव करावा, महिलांचे व्यवहार काय असावेत, त्यांनी घराबाहेर पडावे का आणि पडल्या तर त्यांचे वर्तन कसे असावे? त्यांनी शाळेत जावे, काय शिक्षण घ्यावे आणि नोकरी तर अजिबात करू नये! सनातनी हिंदू धर्मातही महिलेला डोक्यावरून पदर घ्यायला शिकविले होते, लिपस्टिक वर्ज्य, संगीत-नृत्य म्हणजे धर्मविरोधी कारस्थान! या लोकांचे उद्या ‘राज्य’ आले तर सनातन हिंदू कायदाच ते बनवतील! भाजपाच्या एका आमदाराने उत्तर प्रदेशमध्ये नुकते म्हटलेच आहे की बालविवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याच्या बाजूने ते आहेत! त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काही वर्षापूर्वी ढवळीकरांनी बीचवर कमी कपडय़ांत जाणा-या तरुणींना ‘धर्मरक्षणा’च्या चार गोष्टी सांगितल्या होत्याच की!
हिंदू दहशतवादाचा हा उग्र, भीषण चेहरा आणखीही ब-याच प्रकरणांत दिसतो आहे आणि त्याचे धागेदोरे जुळविण्याचे आव्हान आहे. त्यात अभिनव भारत आणि बजरंग दलाशी संबंधित इतर संघटना आहेत. मालेगावमध्ये २००६ व २००९मध्ये त्यांनी बॉम्बस्फोट घडविले. त्यात पकडले गेले मुस्लीम तरुण व संशय घेतला होता बंदी घातलेल्या सीमीवर! संयुक्त एक्स्प्रेसमधील स्फोट, हैदराबादेतील मक्का मशिदीतील बॉम्बस्फोट व अजमेर शरीफ दर्ग्यातील स्फोटही या कटाचा भाग आहे.
यात प्रकर्षाने चिंता करायला लावते ती आपले नेतेगण तसेच प्रशासन व पोलीस दलाची मानसिकता. हिंदू दहशतीने सूत्रबद्धरीतीने हातपाय पसरायला सुरुवात करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्या दैनिकात किंवा पुस्तकात दहशतवादाचे खुले समर्थन करूनही पोलिसांची बेफिकिरी, दुर्लक्ष दिसते. त्याउलट सरहद्दीपलीकडून कारवाया करणा-या इस्लामी गटांवर ताबडतोब बंदी लागू करण्यात आली, त्यांच्याविरोधात दहशतवादी कायदे लागू करून त्यांचा छळही करण्यात कोणतीही कसर सोडण्यात आली नाही.
२००८च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये करकरे यांची हत्या झाल्यानंतर अभिनव भारत विरोधात पुरावे गोळा करण्याचे थांबले. सनातनी किंवा हिंदू जनजागृती समितीविरोधात दोन्ही राज्य सरकारे अत्यंत निष्काळजी होती. मडगाव बॉम्बस्फोटाकडे कोणत्याही गांभीर्याने पाहण्यात आले नाही. मला तर असा संशय आहे की हा तपास मुद्दामच सौम्य करण्यात आला. मालेगाव स्फोट प्रकरणात सर्रास बोलले जाते की तपास व खटला मुद्दामच रेंगाळत ठेवण्यात आला; परंतु एटीएस अजूनही म्हणते आहे की हिंदू दहशतवाद्यांचेच हे कारस्थान होते. या स्फोटाच्या १० वर्षानंतर- ज्यात सहा जण ठार व १०० जखमी झाले- गेल्या सोमवारीच सात जणांविरुद्ध- ज्यात लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित व प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा समावेश आहे- मुंबईच्या खास न्यायालयात सुनावणीस सुरुवात झाली आहे. या काळात अनेक प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार उलटले व सरकार या तपासाच्या मार्गात काटे पेरत असल्याचेही पुरेसे स्पष्ट झाले. काही टीकाकार म्हणालेही, मुस्लीम दहशतवाद्यांना फाशी देताना तुम्ही दयामाया दाखवत नाहीत, तेथे अत्यंत भरभक्कम पुरावे हाती असतानाही तुम्ही कायदे कडक वापरत नाहीत..
हिंदू दहशतवाद हा अलीकडचा प्रकार आहे आणि तो मुस्लीम भयाचा प्रतिकार आहे हे मान्य केले तरी याच दहशतवादाने महात्मा गांधींचा बळी घेतला, बाबरी मशिद नेस्तनाबूत केली व मुक्त भारतातील सर्वात भीषण दंगलीही घडवून आणल्या होत्या, हे नाकारून चालता येणार नाही. या दंगलींमध्ये हजारो मुस्लिमांचे बळी घेतले व गुजरातसारख्या राज्यात बरेच महिने रक्तपाताच्या नद्या वाहत होत्या..
मुस्लिमांबद्दल एक तिरस्काराची भावना आापल्या देशात मुद्दामच निर्माण करण्यात आली आहे. हे जनमत मुद्दामच तयार करण्यात आले व त्याला सतत खतपाणी घातले गेले. हिंदुत्वाची दहशत याच बहुसंख्यांच्या भीतीशी व द्वेषाशी जोडली गेली असून या प्रवृत्तीची विचारधाराच आहे : मुस्लीम देशाचे शत्रू आहेत आणि त्यांचा प्रतिकार करायचा तर हिंदूंनी ऐक्य निर्माण केले पाहिजे, राष्ट्रवाद निर्माण झाला पाहिजे आणि हा देश केवळ हिंदूंचा आहे असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. हिंदू हा बहुतांशी सहिष्णू सेक्युलर असल्याने हिंदुत्वाच्या फौजांना हिंदू माणसाबद्दलच तिटकारा वाटतो व त्याचे संघटन अत्यंत क्रूरपणे तालिबानी पद्धतीने व्हावे असे त्याच्या मनाने घेतले आहे व हा आज एका हिंदू राष्ट्रवादी भक्तीचा अजेंडा बनला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांना पाठीशी घालण्यासाठी देशात संस्थात्मक व्यवस्था आहे व या संघटना व त्यांच्या मारेक-यांना देशातील सुरक्षा संस्थाच संरक्षण देतात. इस्लामी दहशत हा नि:संशय भारतीय माणसाला गंभीर धोका आहेच; परंतु हिंदू दहशतसुद्धा कमी धोक्याची नाही, उलट तिचे संहार-बळ, शक्ती व गांभीर्य अधिक मोठे आहे. दोघांचाही बीमोड झाला पाहिजे. सनातन्यांची नांगी ठेचली पाहिजेच, शिवाय सीमीवर बंदी लागू होत असेल तर त्यांच्यावरही ती उगारली गेली पाहिजे.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )