- गजानन जानभोरसत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी संघाला असे बंधुभावी, सहिष्णू होणे त्या अर्थाने अगत्याचेही झाले आहे. आपले कट्टरतेचे मूळ नष्ट होऊ द्यायचे नाही पण सहिष्णुताही स्वीकारायची! हे संघातील नवे वैचारिक द्वंद्व असेल. हिंदुत्वाचा खरा अर्थ माणुसकी आणि बंधुभाव हाच असल्याचा राग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी परवा नागपुरात पुन्हा एकदा आळवला. संघ परिवारातील माणसे अधूनमधून असे बोलत असतात. लोक आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यातून संघाबद्दल समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर होतो, असे संघ परिवाराला उगाच वाटत असते. पण समाजाचा बुद्धिभेद करण्याची संघाची ही रीत जुनीच असल्याने त्यावर फारसा कुणी विश्वास ठेवीत नाहीत. सरसंघचालकांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ आधी प्रवीण तोगडिया, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची या आपल्याच परिवारातील विखारी हिंदुत्ववाद्यांना सांगण्याची गरज आहे. संघाच्या कथनी आणि करणीत विसंगती आहे. ती असंख्य घटनांमधून प्रतीतही होत असते. सरसंघचालक ‘एक गाव, एक स्मशानभूमी’चा आग्रह धरतात. पण त्याच वेळी आरक्षणाचा फेरविचार करावा अशी मागणीही करतात. उत्तर प्रदेशचा दयाशंकर सिंह हा भाजपा नेता मायावतींचा अश्लाघ्य शब्दात अपमान करतो, त्यावेळी सरसंघचालक निषेधाचा ब्र सुद्धा काढीत नाहीत. शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरील प्रवेशासाठी याच हिंदू धर्मातील माता-भगिनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खातात, त्यावेळी हे सरसंघचालक उपाख्य हिंदू धर्म रक्षक सरकारला खडसावत नाहीत. साईबाबांना हीन लेखणाऱ्या शंकराचार्यांना आणि अल्पसंख्यकांबद्दल गरळ ओकणाऱ्या साक्षी महाराजांना माणुसकी व बंधुभावाची शिकवण देण्याची सद्बुद्धी सरसंघचालकांना त्यावेळी का सुचत नाही? ज्या धर्माचे आपण ठेकेदार असल्याचा आव ही मंडळी आणतात त्याच सामान्य हिंदूंच्या मनातील हे प्रश्न आहेत. महात्मा गांधी संघाला प्रात:स्मरणीय आहेत (किमान ते तसे सांगतात) पण गांधीजींची हत्त्या करणाऱ्या नथुराम गोडसेला हौतात्म्य बहाल करणाऱ्या आपल्याच विकृत माणसांना फटकारण्याची हिंमत सरसंघचालक का दाखवत नाहीत? संघाची प्रतिमा आधुनिक आणि सर्वसमावेशक केल्याशिवाय सामान्य हिंदूंना आपलेसे करता येणार नाही, याची जाणीव भागवतांना आहे. संघ परिवाराच्या अफवांना बळी न पडता उलट त्या हाणून पाडण्याचे काम याच हिंदूंनी केले आहे. हा देश एकसंध ठेवण्यात इतर धर्मातील सूज्ञ नागरिकांप्रमाणे सामान्य हिंदूंचेही तेवढेच मोलाचे योगदान आहे. हा हिंदू मतदार काँग्रेस आणि तत्सम राजकीय पक्षांची वैचारिक बांधिलकी मानणारा आहे. तो तसा नसता तर संघ परिवाराचे या देशातील सर्व हिंदूंवर एव्हाना वर्चस्व राहिले असते. ही जाणीव संघाला आता झाली असल्यानेच या सामान्य हिंदूंना आपलेसे करायचे व नंतर त्यांच्या मदतीने देशावर राजकीय सत्ता गाजवायची, हा संघाचा अजेंडा आहे. त्यासाठीच संघाला ‘माणुसकी’ आणि ‘बंधुभावाचे’ हिंदुत्व खुणावू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि काही राज्यांतील भाजपा सरकारमध्ये सत्तेची फळे चाखत असलेल्या वाटेकऱ्यांचाही संघावर त्यादृष्टीने अप्रत्यक्ष दबाव असतोच. त्यामुळे सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी संघाला असे बंधुभावी, सहिष्णु होणे त्या अर्थाने अगत्याचेही झाले आहे. पुढच्या काळात याच अंतर्गत वैचारिक द्वंद्वाने संघ ढवळून निघणार आहे. आपले कट्टरतेचे मूळ नष्ट होऊ द्यायचे नाही पण सहिष्णुताही स्वीकारायची! हे ते द्वंद्व असेल. भागवतांच्या भूमिकेबद्दल मतभेद असलेला एक कट्टर वर्ग संघातच आहे. पण संघीय शिस्तीमुळे तो जाहीरपणे मतप्रदर्शन करीत नाही. पण तोगडिया, योगी आदित्यनाथांसारखी मंडळी समाजात विष पेरतात तेव्हा त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. सरसंघचालकांनी अलीकडे सांगितलेला हिंदुत्वाचा खरा अर्थ संघ परिवारातीलच मंडळी कितपत स्वीकारतात, यावरच या हिंदुत्ववादी संघटनेची नवी दिशा ठरणार आहे.
हिन्दुत्वाचे द्वंद्व
By admin | Published: July 26, 2016 2:15 AM