मन्मथच्या आत्महत्येनंतर प्रत्येक पालक आतून हादरून गेला. मुलांना सांभाळायचं कसं आणि पालकत्वाची भूमिका, याविषयी सोशल मीडियातून बरेचसं उथळपणे व काही प्रमाणात गांभीर्याने लिहिलंदेखील गेलं. मन्मथ या तरुण मुलाच्या आत्महत्येने आधुनिकीकरणाच्या जगात सतत धावणारा माणूस आतून हादरलाय आणि भांबवलाय, हे बाकी खरं. या धक्क्यातून सावरतोय न सावरतोय तोच मनप्रीत या कोवळ्या वयातील मुलाने आत्महत्या केल्याने अवघा देश हादरून गेलेला आहे. ब्ल्यू व्हेल नावाच्या एका गेमने हा बळी घेतला, हे तर आणखीनच धक्कादायक आहे. तंत्रज्ञानाच्या आणि आभासी जगाच्या किती आहारी आपण जाऊ शकतो, हे दाखवून देणारी ही धोक्याची पहिलीवहिली भयावह झलक आहे. रशियात जन्माला आलेल्या आणि जगभरात धुमाकूळ घातलेल्या या खेळाने आजवर १३० बळी घेतल्याची धक्कादायक माहिती आता उघड होत आहे. त्याचा निर्माता तुरुंगात असला तरीही असे जीवघेणे आणि विकृत मनोवृत्तीचे खेळ आजही खुलेआम सुरू राहतातच कसे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वी पोकेमॉनसारखा असाच एक टुकार गेम आलेला होता आणि लोक वेड्यासारखे त्याच्या मागे लागलेले होते. ब्ल्यू व्हेल ही गेमची आवृत्ती त्यापेक्षा अधिक धोकादायक मानायला हवी. कारण यात ५० दिवसांच्या त्या काळात तुम्हाला पूर्णपणे नैराश्यात झोकून देण्याची क्षमता या खेळात आहे. त्याची लास्ट स्टेज म्हणजे आत्महत्येचे चॅलेंज आहे. या घटनेकडे केवळ वरवर पाहून चालणार नाही. त्याचा अन्वयार्थ नीट समजून घेत आपल्याला यापुढील काळात पावले टाकावी लागणार आहेत. नात्यांमध्ये कमी होत चाललेला संवाद आणि आभासी जगाचे लहान वयापासून वाढते आकर्षण या बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे लक्षात घेत सजग राहावे लागणार आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असताना मुलांच्या हाती मोबाईल येणारच नाही असे होणार नाही; पण ते काय पाहतात आणि त्याचा त्यांच्या मनोवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे सजगतेने पाहणे, हे मात्र पालक म्हणून कर्तव्य आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळे भावविश्व निर्माण होत असते. नव्या पिढीच्या त्या भावविश्वाशी आपण कितपत एकरूप होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे. अन्यथा मनप्रीतसारख्या आणखी एका कोवळ्या जीवाचा विकृतीने बळी घेतल्यानंतर हळहळण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही.
‘त्यांचं’ भावविश्व आणि आपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:41 PM