आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेले आाणि त्याचे खापर परीक्षा विभागावर फोडून नामानिराळे होण्याचा प्रयत्न करणारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची कुलपती विद्यासागर राव यांनी केलेली बडतर्फी अपेक्षितच होती. देशमुख यांनी ती आपल्या कर्माने ओढवून घेतली. १६० वर्षांची परंपरा सांगणाºया मुंबई विद्यापीठात कुलगुरूंच्या बडतर्फीचा नवा नामुश्कीचा इतिहास घडला. उत्तरपत्रिकांच्या आॅनलाइन तपासणीची योजना, त्यामागील हेतू योग्यच होता. पण प्रशासकीय निर्णयात केवळ हेतू चांगला असून भागत नाही, तर निर्णयाची अंमलबजावणी व परिणाम महत्त्वाचे ठरतात. हाताशी असलेला वेळ, लाखो उत्तरपत्रिका, प्रशिक्षण ही सारी समीकरणे प्रतिकूल असतानाही कुलगुरूंनी अट्टाहास केला. वास्तविक पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर काही परीक्षांसाठी आॅनलाइन तपासणीची अंमलबजावणी करून नंतरच ती सर्व परीक्षांसाठी वापरायला हवी होती. पण चमत्काराचा सोस नडला. निकाल रखडल्यानंतर कुलपती विद्यासागर राव यांनी निकालासाठी मुदत घालून दिली. तो इशारा तरी देशमुख यांनी समजून घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे अद्यापही पुनर्मूल्यांकन, गहाळ उत्तरपत्रिका-पुरवण्यांचा घोळ विद्यापीठाला निस्तरायचा आहे. अर्थात देशमुख यांच्या बडतर्फीने हे सारे प्रश्न सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून निघणाऱ? हाही प्रश्न आहे. भ्रष्टाचार, गुणांची फेरफार, शैक्षणिक क्षमतांचा घोळ यातून मुंबई विद्यापीठाच्या याआधीच्या वेगवेगळ्या कुलगुरूंची कारकिर्द वादग्रस्त ठरली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता यादीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक पहिल्या शंभरात नसल्याचे उघड झाले, तेव्हाच त्याच्या गुणवत्तेची पातळी काय लायकीची आहे, याची लक्तरे राष्ट्रीय स्तरावर पोहोचली! विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याऐवजी कुलगुरूपदावर नियुक्तीनंतर राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणे, पायलट ट्रेनिंगसाठी विमान खरेदीचा प्रस्ताव, पुढे स्वस्तातील हेलिकॉप्टर राइड, परदेशात कॅम्पस उभारणे या कारणांमुळे संजय देशमुख प्रसिद्धीच्या झोतात येत राहिले आणि टीकेचे धनीही ठरले. आॅनलाइन मूल्यांकन आणि निकालांचा गोंधळ यामुळे राज्यपालांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर देशमुखांनी स्वत:हून पद सोडले असते तर त्यांची आणि पदाची शोभा राहिली असती, पण त्यांना विवेकाने निर्णय घेता आला नाही. परिणामी त्यांची हकालपट्टी झाली आणि ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे जाले जगामाजी’ अशी संत तुकारामांनी वर्णन केलेली नामुश्की त्यांच्यासोबत विद्यापीठावरही ओढवली आहे.
आॅनलाइन निकाल प्रक्रियेच्या नावे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा करण्यास कारणीभूत ठरलेल्या मुंबई विद्यापीठाची ऐतिहासिक नामुश्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:09 AM