Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 11:39 AM2018-11-01T11:39:57+5:302018-11-01T11:55:15+5:30

काँग्रेसने बाजूला ठेवलेल्या या नेत्यांना आपलेसे करण्याकडे संघ परिवाराने गेली काही वर्षे लक्ष केंद्रित केले. हे काम शांतपणे चालले होते. पण, मोदी सत्तेत आल्यानंतर....

history and political context behind Sardar Patel Statue of Unity | Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

googlenewsNext

- प्रशांत दीक्षित 

गुजरातमध्ये उभा राहिलेला सरदार पटेल यांचा भव्य पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा एकतेचा पुतळा म्हणून देशासमोर सादर होत असताना देशात मात्र विचारांची दुफळी माजलेली आहे. सरदार पटेल यांचा गौरव खरे तर सर्व पक्षांकडून व्हायला हवा होता. कारण भारताला देश म्हणून भौगोलिक चेहरा देण्याचे ऐतिहासिक काम सरदार पटेल यांनी केले. पटेल यांनी संस्थाने विलीन करून घेतली नसती, विशेषत: निजामाला शरण आणले नसते तर भारताला भौगोलिक एकसंघताच मिळाली नसती आणि अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले असते. छोट्या व मोठ्या संस्थानांमध्ये विभागलेला भारत ब्रिटीशांनाही हवा होता. कारण अशा संस्थांनाना आपलेसे करून, प्रसंगी दबाव आणून त्यांना अनेक गोष्टी साध्य करता आल्या असत्या. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाची खरी किंमत ब्रिटीशांनाही कळलेली नव्हती. पण खंडित भारत आपल्या फायद्याचा आहे हे त्यांना कळत होते. दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटीशांची आर्थिक वाताहात केली आणि जगावर आडमार्गाने राज्य करण्याचे स्वप्न हवेत विरले. आज ती संस्थाने स्वतंत्र राहिली असती तर त्यातील कित्येकांना चीनने अंकित करून घेतले असते. आफ्रिकेत व आशियातील लहान राष्ट्रांबाबत चीनचे जे धोरण आहे तेच त्यांना भारतात राबविता आले असते. यातून किती भयावह परिस्थिती निर्माण झाली असती याची कल्पना केली तर सरदार पटेलांच्या कामाची मौलिकता कळेल.

म्हणून देशाला मजबूत बनवायचे असेल तर भौगोलिक एकसंघता अतिशय महत्त्वाची आहे व ती कोणत्याही मार्गाने का होईना, मिळवलीच पाहिजे हे सरदार पटेल यांनी जाणले होते.अर्थात नेहरू किंवा महात्मा गांधी यांना हे जाणवले नव्हते असा याचा अर्थ नाही. भौगोलिक एकसंघतेचे महत्त्व सर्वांनाच माहीत होते. मात्र ती साधण्यासाठी आवश्यक असणारा कणखर बाणा अन्य नेत्यांपेक्षा सरदारांकडे अधिक होता. अन्य नेत्यांकडे तितका कणखरपणा नव्हता. याचे एक कारण म्हणजे महात्मा गांधी, नेहरूंसह अन्य नेते आपल्या प्रतिमेमध्ये अडकले होते. भौगोलिक एकता साधण्यासाठी प्रसंगी साम-दाम-दंड यांचा उपयोग करणे आवश्यक होते. अशा उपायांची आवश्यकता पटली असली तरी ते उपाय योजण्यासाठी आवश्यक तो स्वभाव या नेत्यांचा नव्हता. याशिवाय आपल्या प्रतिमेला तडे जाण्याची धास्ती नेत्यांच्या मनात असू शकते. सरदार पटेल यांना अशी धास्ती नव्हती. त्यांची प्रतिमा आणि नियतीने त्यांच्यापुढे ठेवलेले कार्य यामध्ये एकवाक्यता होती. भारताची भौगोलिक एकसंघता साधण्यासाठी आवश्यक असणारा कणखरपणा, चातुर्य, मुत्सद्दीपणा हे सर्व गुण पटेलांकडे जन्मजात होते. काँग्रेसने त्याचा अनुभव घेतला होता. साहजिकच लहान-मोठ्या संस्थानांना सामावून घेऊन देश एकसंघ करण्याची जबाबदारी पटेलांवर आली.


महत्त्वाची बाब ही की, नेहरूंनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. आज नेहरू विरुद्ध पटेल अशी मांडणी केली जाते, तेव्हा एक विसरले जाते की नुकत्याच जन्मलेल्या देशाला समर्थ पायांवर उभे करण्यासाठी अनेक गुणवान नेत्यांची गरज होती. त्यातील काही गुण नेहरूंकडे होते तर काही पटेलांकडे होते. याशिवाय राजाजी, डॉ आंबेडकर असे अन्य गुणवान नेतेही होते. या प्रत्येकाने आपल्या गुणांनी भारताची पायाभरणी केली. पटेलांना जे जमले ते नेहरूंना जमले नसते. काश्मीरवरून हे कळून येते. तथापि, नेहरूंना जे जमले ते पटेलांनाही जमले नसते. नेहरूंनी देशाला जी आधुनिक दिशा दिली, जगाशी देशाला जोडले, मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसत्ताधीश होण्याची पूर्ण संधी असतानाही ती संधी नाकारून विरोधी पक्षांना योग्य मान देत देशात लोकशाही व्यवस्था रुजविली, ते काम तितक्याच यशस्वीपणे पटेलांना कदाचित करता आले नसते. सरदार पटेलही जनसामान्यांचे नेते होते, तसेच शेतकरी वर्गात लोकप्रिय होते. पण ज्याप्रमाणे नेहरुंवर भारताच्या सर्व प्रदेशातून प्रेम केले जात होते, ते प्रेम पटेलांना मिळविता आले नसते.

मात्र दोन मोठ्या नेत्यांच्या गुणांमधील हा फरक एकमेकांच्या विरुद्ध नव्हता तर परस्परांना पूरक होता. याची जाण दोघांनाही होती. मतभेद होते. काही मुद्द्यांवर तीव्र मतभेद होते. पण दुसऱ्याच्या गुणांबद्दल आदरही होता. या आदरापोटीच एकमेकांना समजून घेऊन धोरणे ठरविण्याची लवचिकता होती. सरदार पटेल जास्त जगले असते तर देश वेगळा दिसला असता असे म्हटले जाते ते तितकेसे बरोबर नाही. सरदार पटेल आणखी दहा वर्षे जगले असते तरी देश नेहरूंनी दाखवून दिलेल्या दिशेनेच गेला असता. मात्र नेहरूंच्या स्वप्नाळू धोरणांना चाप लावून त्याला व्यवहाराची धार सरदारांनी लावून दिली असती. सरदारांचे निधन झाल्यावर नेहरूंना धाक वाटेल अशी व्यक्ती सरकारमध्ये राहिली नाही. डॉ आंबेडकर, राजाजी अशा व्यक्तीही काँग्रेसमधून बाहेर पडल्या व एका रितीने काँग्रेसचा एकछत्री अंमल देशावर सुरू झाला.

अशा एकछत्री अंमलामुळे सरदार पटेल व अन्य नेत्यांच्या गुणांचा आदर करण्याची संस्कृती काँग्रेसमधून हळूहळू नष्ट झाली. देशाच्या इतिहासातील अन्य नेत्यांचे योगदान हे शालेय पुस्तकातील एक-दोन धड्यांइतके मर्यादितच राहिले. देशातील संस्थानिकांना सामावून घेण्यासाठी सरदार पटेलांना किती डावपेच खेळावे लागले याची कल्पना आजच्या तरुण पिढीला नसते. त्यावर फार पुस्तके लिहिली गेली नाहीत वा त्याबद्दल चर्चाही झडल्या नाहीत. त्यावेळी किती आघाड्यांवर सरदार लढत होते हे आजच्या पिढीला माहित नाही. डॉ आंबेडकर, पटेल, राजाजी, सुभाषचंद्र अशा अनेक नेत्यांना काँग्रेसने डावलले व भारताचा सर्व इतिहास नेहरू घराण्याशी बंदिस्त केला. डाव्या पक्षांची त्याला साथ मिळाली कारण त्यांच्या दृष्टीने नेहरू डावे होते व पटेल हे भांडवलदारांचे हस्तक होते.

काँग्रेसने बाजूला ठेवलेल्या या नेत्यांना आपलेसे करण्याकडे संघ परिवाराने गेली काही वर्षे लक्ष केंद्रित केले. हे काम शांतपणे चालले होते. त्यावेळी त्याबद्दल फार बोलले जात नव्हते. मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर, काँग्रेसने बाजूला टाकलेल्या या सर्व नेत्यांना अग्रस्थानी आणण्याची जाहीर खटपट त्यांनी सुरू केली. इतिहासातील जाणीवपूर्वक मागे टाकलेला भाग संघ परिवाराने पुढे आणण्यास सुरुवात केली. त्याबरोबर देशात पुन्हा नेत्यांच्या उंचीचे वाद सुरू झाले.

संघ परिवाराने असे करण्यास एक वेगळे कारण असावे. संघाकडे स्वातंत्र्य चळवळीची आयती रियासत नाही. जशी ती काँग्रेसकडे आहे. उलट १९४२ च्या चळवळीत सामील न झाल्याबद्दल संघाला आजही बचावाची भूमिका घ्यावी लागते. (डाव्या पक्षांनीही ४२च्या चळवळीला विरोध केला होता, पण त्याबद्दल चर्चा होऊ न देण्याची दक्षता ते सफाईने घेतात) संघाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान काय या प्रश्नावर, एकदा काँग्रेसचा अडकलेला झेंडा संघ स्वयंसेवकाने चटकन खांबावर चढून मोकळा करून दिला, या पलिकडे संघाला उत्तर देता येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांशी नाळ जुळविण्याची धडपड संघ परिवाराकडून होत असते. नेहरू-गांधींपलिकडे न पाहण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे या धडपडीला जनसामान्यांकडून प्रतिसादही मिळतो. 

आणखी एक कारण म्हणजे भक्कम, मजबूत देशाचे जे कल्पनाचित्र संघ परिवाराकडे आहे त्यामध्ये सरदार पटेल व सुभाषचंद्र बसतात. नेहरूंचे चित्र वेगळे होते. ते अधिक लवचिक होते. संघ परिवाराचे चित्र पक्की चौकट बसविणारे आहे. बंदिस्त आहे. याचबरोबर आपला दृष्टीकोन जनमानसावर ठसविण्यासाठी भव्य वास्तू वा पुतळे उपयोगी पडतात. जगातील सर्व देशांत हे पाहावयास मिळते. अमेरिकेमध्ये लिंकनचा भव्य पुतळा असतो तसाच चीनमध्ये माओचा असतो. बुद्धांचे अतिभव्य पुतळे जगातील अनेक ठिकाणी आहेत. रशियाही पुतळे प्रेमातून सुटला नव्हता. भारतात नेहरूंचा अतिभव्य पुतळा नाही. नेहरूंनी तो होऊही दिला नसता. त्यापेक्षा भाक्रा धरण हे माझे स्मारक माना असे म्हटले असते. पण नेहरू वा महात्मा गांधींच्या नावाचा रस्ता नाही वा संस्था नाही असे गाव नाही. नेहरू-गांधींचा प्रभाव लहानसहान गोष्टींतून देशात सर्वत्र पसरलेला आहे. त्याला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर लोकांच्या डोळ्यात भरेल, मनात ठसेल असे स्मारक होणे आवश्यक होते. या देशात नेहरुं इतकीच महत्वाची अशी वेगळी विचारधारा अस्तित्वात होती व सरदार पटेल हे त्याचे प्रतिक आहेत हे जगावर ठसविण्यासाठी नर्मदा तीरावर अतिभव्य पुतळा उभारला गेला असेल. नेहरू घराण्याचा करिश्मा कमी करण्याचा उद्देश यामागे नक्कीच आहे. जनतेला तो समजतही आहे. त्याचवेळी अन्य नेत्यांनाही स्थान मिळत आहे हेही जनतेला आवडत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. 

जगातील सर्वात मोठा पुतळा भारतात असणे ही नक्की अभिमानाची गोष्ट आहे. लिंकनच्या पुतळ्यापुढे उभे राहिल्यानंतर लोकशाही व्यवस्थेबद्दल अपार आदराची भावना निर्माण होते. परंतु, अमेरिकेत पुतळ्यांबरोबरच भव्य शिल्पे म्हणता येतील असे प्रकल्प अनेक आहेत. छाती दडपून टाकील असे संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था आहेत. जगाला आपल्या तालावर नाचायला लावणारे तंत्रज्ञान आहे. संशोधन, नवे तंत्रज्ञान व भव्य प्रकल्प यातून आलेल्या ताकदीमुळे लिंकनच्या पुतळ्याला खरे वजन प्राप्त होते. चीनमधील माओचा पुतळा असतो तसाच ५५ किलोमीटरचा समुद्र सेतूही असतो. त्याची चर्चा होते कारण चीन अर्थसत्ता बनली आहे. सरदार पटेलांचा पुतळा प्रेरणादायी नक्कीच ठरेल. पण भारत आर्थिक व तांत्रिक महासत्ता झाला तरच त्याला खरे वजन येईल आणि त्यासाठी सरदार पटेलांच्या पोलादी स्वभावाला नेहरूंच्या लवचिक व आधुनिक विचारांची जोड द्यावी लागेल. मोदींकडून ते अपेक्षित असले तरी तसे होण्याची शक्यता कमी आहे.



 

Web Title: history and political context behind Sardar Patel Statue of Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.