- वसंत भोसलेदेशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवासस्थानीच अंगरक्षकांकडून हत्या झाली. पंजाबमधील दहशतवादाचे स्वरूप किती क्रूर बनले होते, याचे ते उदाहरण होते. संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी होती.इंदिरा गांधी यांची हत्या ३१ आॅक्टोबर, १९८४ रोजी झाली. त्या दिवशी राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. त्यांना तातडीने नवी दिल्लीला यावे लागले. इंदिरा गांधी यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कारापूर्वी नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होणे क्रमप्राप्त होते. शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची हत्या केल्याने शिखांविरोधात वातावरण निर्माण झाले. परिणामी, देशात, विशेषत: दिल्लीत शिखांच्या विरोधात दंगली सुरू झाल्या. त्याचे स्वरूप भयानक होते.अशा वातावरणात आणि देश दु:खसागरात बुडालेला असताना, सायंकाळी राजीव गांधी यांनी सहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. इंदिरा गांधी यांच्या पार्थिवावर ३ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुख यावेळी उपस्थित होते. भारतीय लोकशाहीच्या वाटचालीवर मोठा आघात झाला होता. पंजाब आणि आसामच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभर राष्ट्रीय एकात्मतेची चिंता वाहण्यात येत होती. देश कठीण प्रसंगातून जातो आहे, असे सर्वसामान्य माणसाला वाटत होते. आणीबाणीच्या घोषणेने देशातील लोकशाही संकटात आली, अशी भावना लोकांची झाली होती. त्यास सडेतोड उत्तर मतपत्रिकेतून दिले गेले. मात्र, पर्याय म्हणून प्रथमच विरोधक सत्तेवर आल्यावर त्यांना पाच वर्षे सरकार चालविता आले नाही. देशाची एकात्मता, स्थिर शासन धोक्यात असल्याच्या भावनेने भारतीय जनतेने ज्या इंदिरा गांधींचा पराभव करून, काँग्रेसला सत्तेवरून पायउतार केले होते, त्याच जनतेने प्रचंड बहुमताने त्यांच्याच हाती देशाची सत्ता पुन्हा स्वाधीन केली होती. भारतीय लोकशाहीच्या वाटचालीतील मतदारांचा हा समंजसपणा सर्वांत मोठे मूल्य म्हणून मानला गेला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सत्तेवर आलेल्या राजीव गांधी यांनी आठव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.पंजाब व आसाम अद्यापही शांत झालेला नव्हता. त्या राज्यांतील अनुक्रमे १३ व १४ मतदारसंघांचा अपवाद वगळता ५१४ मतदारसंघांत निवडणुका जाहीर झाल्या. लोकसभेच्या ५१४ पैकी ४०४ जागा काँग्रेसने जिंकल्या. उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.विरोधी पक्षांची दाणादाण झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बावीस, समाजवादी काँग्रेसला चार, जनता पक्षाला दहा, लोकदलास तीन, भारतीय जनता पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशात सिनेअभिनेते एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापन झालेल्या तेलुगू देसम पक्षाला ३० जागा मिळून तो विरोधातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला. देशाच्या राजकारणात एखादा प्रादेशिक पक्ष लोकसभेत विरोधी पक्षात सर्वांत मोठा ठरण्याची ही पहिलीच वेळ होती. ६ एप्रिल, १९८० रोजी स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. या पक्षाला केवळ दोनच जागा मिळाल्या. गुजरातमधील मेहसाना मतदारसंघात ए. के. पटेल आणि आंध्रात हणमकोंडा मतदारसंघातून सी. जगनरेड्डी विजयी झाले होते. अटलबिहारी वाजपेयी यांचा ग्वाल्हेरमधून माधवराव शिंदे यांनी दोन लाख मताधिक्क्याने पराभव केला.पंजाब अणि आसाममध्ये मार्च, १९९५ मध्ये सत्तावीस मतदारसंघांत निवडणुका घेण्यात आल्या. त्यापैका दहा जागा (पंजाब ६ आणि आसाम ४) काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे या पक्षाची सदस्य संख्या ४१४ वर गेली. यापूर्वी इतके प्रचंड यश काँगे्रसला कधीच मिळाले नव्हते. त्यानंतर, काँग्रेससह कोणत्याही पक्षाला किंबहुना लोकसभेच्या इतिहासात आजवर मिळाले नाही.उद्याच्या अंकात ।बोफोर्सच्या तोफगोळ्याने काँग्रेसचे बळ घटले...!
इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 5:31 AM