घर से मस्जिद है बहुत दूर चलो यू कर ले,किसी रोते हुए बच्चे को हसाया जाये...ईश्वराची आराधना एवढी सोपी असताना काय गरज आहे नमाज, पोथ्या, पारायणांची? निदा फाजली यांच्या अनेक रचना हाच प्रश्न उपस्थित करून जातात. त्यांच्या निधनाने एक संयत, सहिष्णु आणि सजग कवी गमावल्याची खंत तमाम रसिक मनांमध्ये निर्माण झाली आहे. फाळणीच्या, दंगलीच्या झळा सोसलेल्या या कवीने धर्म, ईश्वर ज्या पद्धतीने मांडला आहे, ते वाचून निरीश्वरवादीही ईश्वर ही संकल्पना स्वीकारण्यास प्रवृत्त होईल आणि त्याच वेळी या सगळ्या संकल्पना एवढ्या सुटसुटीत असताना त्यांचं जंजाळ का झालं, असा प्रश्न कर्मठ धर्ममार्तंडाना पडेल. शतकानुशतकं ज्या प्रतिकांमध्ये सगळेच धर्म अडकून पडले आहेत, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची धमक फाजली यांनी दाखवली, तीसुद्धा निरागसतेने आणि संयमाने. ‘मस्जिद है नमाजियों के लिये, अपने घर में कही खुदा रखना,’ असं सांगत त्यांनी देव आणि मानवातलं अंतरच मिटवून टाकलं. संत कबीर, मीराबाई आणि वारकरी संप्रदायातील संतांच्या रचनांशी त्यांच्या रचना नातं सांगतात. कर्मकांडांवर भाष्य करताना ते म्हणतात...बच्चा बोला देखकर, मस्जिद आलिशानअल्ला तेरे एक को, इतना बडा मकाँअंदर मुरत पर चढें, घी-पुरी-मिष्टानमंदिर के बाहर खडा, ईश्वर माँगे दान असहिष्णुता हा सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरही फाजली यांनी समर्पक भाष्य केलं आहे. ते लिहितात... ‘हिंदू भी मजे मे, मुसलमाँ भी मजे मे, इन्सान परेशाँ है, यहाँ भी वहाँ भी...’ आयुष्य आज आहे, तर उद्या नाही. सरते शेवटी भेदांच्या भिंती गळूनच पडणार आहेत याची जाणीवही ते करून देतात. माटी से माटी मिले, खो कर सभी निशान किसमे, कितना, कौन है, कैसे हो पहचानआयुष्य क्षणभंगुर आहे. ‘मै भी, तू भी यात्री, आती जाती रेल, अपने अपने गाँव तक, सबका सब से मेल...’ असं म्हणता म्हणता त्यांचं गाव आलं आणि ते निघूनही गेले. पण जाताना रेलगाडीतल्या सहयात्रींना आयुष्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगून गेले.
माटी का घर एक ही
By admin | Published: February 12, 2016 4:11 AM