जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) रशियावर डोपिंगप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली. या कारवाईनंतर रशिया आॅलिम्पिकसह कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. क्रीडाविश्वात वाडाने केलेल्या या कठोर कारवाईनंतर भूकंप झाला असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. कारण रशिया काही लिंबूटिंबू देश नाही. आॅलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या वर्चस्वापुढे आव्हान निर्माण करणारा देश म्हणून रशियाकडे पाहिले जाते.
केवळ आॅलिम्पिकच नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील रशिया आणि अमेरिका यांच्यातील चढाओढ जगजाहीर आहे. क्रीडाविश्वाविषयी म्हणायचे झाल्यास, गेल्या काही वर्षांपासून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या आॅलिम्पिक वर्चस्वाला चीन थोडे-फार धक्के देत आहे. मात्र, त्या आधीपासून अमेरिकेला घाम फोडला तो रशियानेच. त्यामुळेच ‘वाडा’ने पारदर्शी निर्णय घेताना अशा मोठ्या देशाला कोणतेही झुकते माप न देता निर्णय घेतला आणि संपूर्ण क्रीडाविश्व अचंबित झाले.कोणत्याही क्षेत्रातील भ्रष्टाचार हा वाईटच. त्यात क्रीडाविश्वाला फिक्सिंग, डोपिंग यांची कीड लागली आहे. नैसर्गिक क्षमतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला नमविण्यात अपयश येत असेल, तर कृत्रिमरीत्या आपली क्षमता वाढविण्यासाठी जे काही करता येईल, ते करायचे आणि कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच, अशा मनोवृत्तीने केलेले कार्य म्हणजेच ‘डोपिंग’. हेच कृत्य रशियाने केले.
बरं रशियाने हे पहिल्यांदाच केले असेही नाही. या आधीही अनेकदा रशियन खेळाडू डोपिंगमध्ये अडकले आहेत आणि त्यांच्याकडून जिंकलेली आॅलिम्पिक पदके हिसकावूनही घेतली आहेत. मात्र, तरीही रशियासारख्या प्रगत देशाला धडा घेता आला नाही.रशियाला जरी क्रीडाविश्वापासून दूर ठेवण्यात आले असले, तरी त्यांचे खेळाडू मात्र स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, केवळ एका अटीवर. ती अट म्हणजे त्रयस्थ ध्वजाखाली खेळणे. म्हणजे आपल्या देशाचा ध्वज घेऊन खेळण्याची त्यांना परवानगी नाही.आॅलिम्पिक स्पर्धेत रशियाचा इतिहास खूप जुना आणि देदीप्यमान आहे. गेल्या २० वर्षांत रशियाने जगाला आपली क्रीडा ताकद दाखविली. त्यांनी गेल्या सहा आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण ५४६ पदकांची लयलूट करताना, १९५ सुवर्ण, १६३ रौप्य आणि १८८ कांस्य पदके जिंकली. रिओ आॅलिम्पिकमध्येच रशियाच्या ट्रॅक अँड फील्ड संघाला सहभाग घेण्यापासून रोखले गेले होते, तसेच २००८ साली बीजिंग आॅलिम्पिकमधील ४५ रशियन खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळले होते. यापैकी २३ खेळाडू पदकविजेते होते हे विशेष.स्वित्झर्लंड येथील लुसाने शहरात १९९९ साली वाडाची स्थापना झाली आणि त्यानंतर प्रत्येक देशात राष्ट्रीय उत्तेजकद्रव्य विरोधी संस्थेची (नाडा) स्थापना करण्यात आली. या दोन्ही संस्थेच्या वतीने कधीही, कोणत्याही खेळाडूची चाचणी केली जाऊ शकते. यामध्ये खेळाडू दोषी आढळला, तर त्याच्यावर दोन वर्षे ते आजीवन बंदीची कारवाई होते.
या सर्व प्रकरणामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही लोकांच्या चुकीमुळे सर्वांनाच शिक्षा करणे योग्य नसल्याचे म्हटले. ‘वाडा’ला रशियन आॅलिम्पिक समितीविषयी कोणतीही तक्रार नसल्यामुळे रशियन खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्यास मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. असे असेल, तर पुतिन यांचे म्हणणे योग्यच आहे. जे खेळाडू प्रामाणिक आहेत, त्यांना रशियाच्या ध्वजाखाली खेळता आले पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून पुतिन यांची तळमळ कळते. मात्र, ही गोष्ट रशिया क्रीडाविश्वात पहिल्यांदाच घडलेली नाही, याकडेही लक्ष द्यावे लागेल. अशा चुकीच्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आणि रशियातील डोपिंगच्या मोठ्या रॅकेटला संपुष्टात आणण्यासाठी पुतिन यांच्या ‘टीम’ला आता तरी जाग यावी, याच उद्देशाने ‘वाडा’ने ही कठोर कारवाई केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, २०१६ साली जाहीर करण्यात आलेल्या मॅकलेरेन अहवालामध्ये रशियात २०११ ते २०१५ सालादरम्यान चक्क सरकारच्या पुढाकारानेच डोपिंग करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला होता. हे तर चक्रावून सोडणारे प्रकरण होते. त्यामुळेच ‘वाडा’ने घेतलेल्या कठोर निर्णयाचे प्रत्येक क्रीडा प्रशंसकाकडून स्वागत होत आहे. कारण एक-दोनदा झालेली चूक मान्य करता येईल, पण नेहमी अडखळणारे पाऊल चूक कसे ठरेल?
- रोहित नाईक । वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई.