- रवींद्र राऊळ(उप वृत्तसंपादक, लोकमत, मुंबई)
खाकी वर्दीचा धाक उतरणीला लागला असून, दिवसेंदिवस वाढत असलेले पोलिसांवरील हल्ले ही कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी बाब ठरत आहे. वाळूमाफिया, गुन्हेगारांकडून पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना घडतच असतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संचारबंदीचा आदेश अमलात आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्यांकडून हल्ले झाल्याच्या तब्बल सातशे घटना नोंदल्या गेल्या आहेत. सामाजिक स्वास्थ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार पाहिले तर त्यामागची कारणे वेगवेगळी दिसतात. मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदीत अडवल्याच्या रागाने माथेफिरू तरुणाने थेट बॅगेतून कोयता काढून पोलीस अधिकाऱ्यांवर वार केले. अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेरच एकाने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. एका घटनेत वाहतूक पोलिसालाच आपल्या गाडीच्या बोनेटवर घेऊन वेगाने गाडी चालवणाऱ्या आणि सोबत दोन दुचाकीस्वारांना जखमी करणाऱ्या चालकाचा व्हिडिओ समोर आला, तर सोलापूरमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्यात आल्याचा प्रकार घडला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत एका महिलेने पोलिसाला केलेली मारहाण अवघ्या राज्याने पाहिली. वांद्रे येथे दोघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवताना अडवल्याने पोलिसावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
कोरोनाच्या काळातील पोलिसांची कामगिरी निर्विवाद वाखाणण्याजोगी आहे. नियम पाळण्यास भाग पाडत असल्याच्या रागातून पोलिसांना मारहाण होण्याचे असंख्य प्रकार या काळात घडले. मात्र, याचवेळी नागरिकांना कायदे पाळण्याची सक्ती करताना त्यांच्याशी कसे वर्तन करावे, याचेही भान पोलिसांनी बाळगणे आवश्यक आहे. कायदेशीर कारवाईचा मार्ग न अवलंबता समोरच्याचा पाणउतारा करणे, अवमानकारक बोलणे, शिवीगाळ करणे, प्रसंगी मारहाण करत त्याचा आत्मसन्मान जाणीवपूर्वक ठेचणे, असे प्रकार पोलिसांकडून होत असतात.
अनेकदा पोलीस नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी नाहक मारहाण करतात. कर्तव्यावरील पोलिसाने केलेली मारहाण दखलपात्र गुन्हा ठरत नसल्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. पोलिसांच्या नागरिकांसोबतच्या वर्तणुकीत सुधारणा होण्याच्या विषयाची चर्चा अनेक दशके सुरू आहे. आवश्यक पथ्ये पाळण्याचे तंत्र, जमावाचे मानसशास्त्र हेरत कर्तव्य बजावणे पोलीस प्रशिक्षणात समाविष्ट केले गेले पाहिजे. मात्र, कामाच्या धबडग्यात अडकलेल्या वरिष्ठांना याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, असे चित्र आहे. पोलीस अॅट्रॉसिटी हा एक गंभीर विषय आहे. वर्दीचा गैरफायदा घेत पोलीस किती अत्याचार करतात, हे गुपित नाही. तशा अनेक तक्रारी रेकॉर्डवर येत असतात; पण किती तक्रारींची तड लागते, किती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होते, हा संशोधनाचा विषय आहे. निलंबन, चौकशीच्या फेऱ्यात चौकशी अधिकारी ‘डिपार्टमेंटचा माणूस’ म्हणून दोषी अधिकाऱ्यांना कसे पाठीशी घालतात, हेही उघड आहे.
पोलिसांवर हल्ल्याचे काही पॅटर्न आहेत. टोल नाक्यावरच्या अवैध वसुलीला वैतागून पोलिसांवर हल्ले होतात. वाळू तस्करीमध्ये राजकीय नेते, ठेकेदार यांना प्रत्यक्षात पोलिसांचेच सहकार्य मिळते. आंदोलन, मोर्चे, दंगली आदी ठिकाणी केवळ गर्दीसाठी जमवलेल्या समाकंटकांकडून पोलिसांना सामूहिक मारहाण झाल्याची उदाहरणे आहेत. पोलिसांचा अपमान करण्यात सर्वाधिक आघाडीवर कोणी असेल तर ते राजकीय नेते. या प्रत्येकाचीच ‘आपण म्हणजेच कायदा’ अशी मानसिकता असते. पोलीस कर्मचाऱ्याला मारझोड करणे, शिवीगाळ करणे, पोलीस म्हणजे आपले खासगी नोकर असल्यासारखे वागणाऱ्यांना कायद्याचा धाक नसतो. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांमध्ये महिलांची वाढलेली संख्या ही सामाजिक दृष्टीने चिंतेची बाब ठरू लागली आहे.
कायदे कितीही कडक झाले तरी अंमलबजावणीतील त्रुटी जोपर्यंत दूर होत नाहीत, तोपर्यंत पोलिसांचा धाक कोणालाच वाटणार नाही. अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राने एकजुटीने मुंबई, राज्य पोलिसांच्या सन्मानार्थ आवाज उठवला होता. पोलिसांचा आणि वर्दीचा हा सन्मान टिकायला हवा.