यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक
१ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा ६२ वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. त्या दिवशी राज्याच्या विकासावर काही चिंतन-मंथन होईल, अशी अपेक्षा करणं सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात व्यर्थच आहे. त्या दिवशी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होतेय. बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक शिवाजी पार्कवर जायचे. तिथेच गुढीपाडव्याला राज यांनी त्यांच्या विचारांची गुढी उभारली. मग त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. आता उत्तरोत्तर त्यांच्या सभा होतच राहतील. १ मे रोजीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बूस्टर डोस सभा आहे. भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला की, नाही माहिती नाही. पण, विचारांचा बूस्टर डोस फडणवीस त्यांना देणार आहेत. त्याने कोरोना पळणार नाही पण, कमळवाले नक्कीच चार्ज होतील.
या दोन सभांचं कवित्व संपत नाही तोच बीकेसीमध्ये उद्धव ठाकरे यांची दे दणादण स्वरुपाची सभा होईल. राज्यात राजकीय राडा चालू आहे आणि चालू राहील. महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात घालणारी उत्तर सभा मात्र कोणालाही घ्यायची नाही. दिवस विकास चालिसाचे नाहीत; हनुमान चालिसाचे आहेत. राज्याच्या राजकारणात आधीपासूनच काही भोंगे नेते आहेत, आता खऱ्याखुऱ्या भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. दाट मुस्लीम वस्त्यांमध्ये जरा फिरा; तिथली तरुणाई अस्वस्थ आहे. दोन्ही बाजूंचे कडवे बाह्या सरसावत आहेत. १ मे १९६० रोजी आपण संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला होता. किती महान स्वप्न बघितली होती? मात्र, आज, ‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’च्या नशिबी अमंगळाचे भोंगे आले आहेत. राज्याच्या राजकारणात एक टक्क्याचीही ताकद नसलेल्या राज ठाकरेंच्या ट्रॅपमध्ये अख्खं राजकारण अडकलं आहे. हे म्हटलं तर उरलेल्या ९९ टक्क्यांमधल्या नेत्यांचं भरकटणं आहे अन् म्हटलं तर एक टक्क्यातील राज यांचं यशही. महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण किती खुजं आहे त्याचंही हे द्योतक आहे.
फडणवीस हनुमान चालिसा खडाखडा म्हणताहेत, उद्धव ठाकरे अचानक बाल ब्रह्मचारी हनुमानाचा वारसा सांगून शिवसेनेचं हिंदुत्व गदाधारी असल्याचा दावा करताहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्ठाले भोंगे घेऊन महागाईविरुद्ध कंठशोष करताहेत. मोठे साहेब उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बारामतीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेत असत, असा दावा केला जात आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांनी अचानक हातात जपमाळ घेतली आहे. हनुमान चालिसाच्या पुस्तकांची विक्री दहापट वाढल्याच्या बातम्या येत आहेत. राज यांच्या हनुमान चालिसाचं लोण देशभरात पोहोचलं आहे. मध्य प्रदेशात केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी द्यावी म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते मंदिरात हनुमान चालिसा म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राणा-राणी तर हनुमान चालिसापायी कोठडीत गेले आहेत. ते भाजपच्या ऑर्केस्ट्रातील कलाकार आहेत. दलित म्हणून पोलीस कोठडीत पाणीही पाजलं नाही या त्यांच्या दाव्याचे एका मिनिटाच्या व्हिडिओनं पुरते वाभाडे काढले.
राजकारणाच्या बोलपटात बोलघेवड्यांची संख्या वाढत आहे. महागाईसारख्या गंभीर विषयांची जागा उथळ राजकारणाने घेतली आहे. घरातून चाळीस पावलं चालत जाऊन (शिवतीर्थ बंगला ते शिवाजी पार्क) बोललेल्या राज यांना हनुमान चालिसा एवढी हिट होईल, असं स्वत:लाही वाटलं नसेल. गणपती दूध प्याला होता, त्या घटनेची आठवण होत आहे. सगळं काही आपल्याभोवती फिरताना बघून राज स्वत:शीच हसत असतील नक्की. ‘इश्यूज’ऐवजी धुमाकूळ घालत असलेल्या ‘नॉन इश्यूज’च्या राजकारणाचे ते कॅप्टन बनले आहेत. राज ठाकरे सर्वांच्या राजकारणाचा अजेंडा सेट करू पाहत आहेत. बदाम खाऊन बुद्धी येत नाही, ठोकर खाल्ल्यानं ती येते. राज यांनी आतापर्यंत अनेक ठोकरा खाल्ल्यानं त्यातून अनेक अनुभव आता त्यांच्या गाठीशी जमा झाले आहेत. पहिला पेपर ते पास झाले, आणखी पाच पेपर बाकी आहेत.
सुसाट कुबेराचा सत्कारसुसाट गायकवाड हे कसलं नाव आहे? तर ते आहेत सुसा गायकवाड म्हणजे सुरेश सावळा गायकवाड. त्यांच्या कामाचा झपाटा बघून त्यांचं नाव पडलं सुसाट. वित्त विभागाचे कुबेर म्हणूनही त्यांची अनेक वर्षे ख्याती. कोण आहे हा माणूस? १९७८ च्या आसपास ते मंत्रालयातील वित्त विभागात सहायक म्हणून चिकटले. तेव्हा त्यांचे वडील बंधू तिथेच शिपाई होते. परवा सुसांचा मुंबईत पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला तेव्हा चार मंत्री आले होते. छगन भुजबळ, जयंत पाटील असे अनेक दिग्गज होते. इतकं काय आहे सुसांमध्ये? गेली जवळपास तीस-बत्तीस वर्षे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प बनवण्यात त्यांची मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. अर्थसंकल्प तोंडपाठ असलेला हा माणूस. एवढं मोठ्ठ योगदान असूनही सुसा कधी प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाहीत. सहसचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर तब्बल सहा वर्षे मुदतवाढ मिळालेला हा अधिकारी. त्यानंतर आणखी सात वर्षे ते विधानमंडळाचे वित्तीय सल्लागार होते. अजूनही राज्याच्या अर्थसंकल्पाचं पान सुसांशिवाय हलत नाही. अर्थसंकल्प समजून घेण्याची तयारी असलेल्या सगळ्यांनी सुसांच्या पायाशी चार-आठ तास घालवले तर बरंच काही डोक्यात जाईल.