राजकारणात उतरलेला प्रत्येकजणच मोठा देवभोळा आणि मंत्र-तंत्र-ज्योतिष-बाबा-महाराज यांना शरण जाणारा असल्याने त्या सर्वांचा आता स्वामी स्वरुपानंद नामे करुन द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्या निरुपणावर विश्वास बसायला हरकत नाही आणि म्हणूनच आता त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या आणि याही आधी पडून गेलेल्या व न जाणो कदाचित भविष्यातही पडू शकणाऱ्या दुष्काळाबाबत परस्परांची उणीदुणी थांबवायला हरकत नाही. तसे झाले तर कदाचित वृत्तपत्रांची आणि अन्य प्रसार माध्यमांची चटकदार बातम्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यापायी थोडी कुचंबणा होईल पण बाकीचे व्यवहार तर सुरळीत पार पडू शकतील. राज्याला आज जाणवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला ना पूर्वीच्या युतीचे, ना त्यानंतरच्या आघाडीचे, ना सध्याच्या युतीचे सरकार जबाबदार आहे. जबाबदार आहेत ते शिर्डीस्थित साईबाबा! साईबाबांची मंदिरे उभारुन व त्यांना देव मानून त्यांची पूजा करणे आणि त्यांच्या चरणापाशी हनुमंताला स्थान देणे असल्या प्रकारांमुळेच महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेल्याची धर्मशास्त्रीय मीमांसा स्वामी स्वरुपानंदांनी केली आहे. स्वामीजी हिन्दू धर्माचे मोठे अधिकारी आणि भाष्यकार असल्याची अनेकांची श्रद्धा असल्याने व हिन्दू धर्मात पूर्वीचा जन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांना मान्यता असल्याने स्वरुपानंद यांचे मागील जन्मात साईबाबांशी काही तरी भांडण असले पाहिजे. अन्यथा त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून एकट्या साईबाबांच्या मागे लागण्याचे कोणतेही तार्किक कारण दिसत नाही. याच शंकराचार्यांनी राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एक भयसूचक इशाराही अप्रत्यक्षरीत्या देऊन ठेवला आहे. ज्या हिन्दू देवालयांमध्ये महिलाना परंपरागत प्रवेशबंदी होती त्यापैकी काही मोजक्या देवालयांनी या महान परंपरेला छेद देत महिलाना प्रवेशाची मुक्त मुभा दिल्याने या मोकळीकीचा लाभ जसजसा वाढत जाईल तसतसे संबंधित महिलांवरील बलात्काराचे प्रमाण वाढत जाईल हाच तो स्वामीजींचा भयसूचक इशारा असल्याने आता स्वाभाविकच राज्याच्या गृह खात्यावरील ताणात मोठ्या प्रमाणावर वृद्धी होऊ शकते!
ऐसे कैसे झाले...!
By admin | Published: April 13, 2016 3:41 AM