शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
2
एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर!
3
माजी आमदार आडम यांच्या घरावर दगडफेक; सोलापुरात खळबळ
4
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात दाेघे जागीच ठार 
5
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
6
दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त
7
काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!
8
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
9
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
10
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
11
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
12
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
13
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
15
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
16
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
17
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
19
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
20
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...

पालथ्या घड्यावर पाणी कसे पडते?

By किरण अग्रवाल | Published: October 30, 2022 11:41 AM

Social Problem : मातेलाच म्हातारपणी वाऱ्यावर सोडण्याची अमानवीयता निपजतेच कशी?

- किरण अग्रवाल 

दीपोत्सवाचे दीप उजळत आनंद, मांगल्याचे वातावरण सर्वत्र ओसंडत असताना मातेलाच म्हातारपणी रस्त्यावर सोडून देण्याचा निर्दयी प्रकार घडून आला. भलेही आर्थिक विपन्नावस्थेतून हा प्रकार घडला असेल, पण त्यातून कमजोर पडलेल्या संवेदनांची भयावहता उघड होऊन गेली म्हणायचे.

 

एकीकडे दिवाळीत वंचितांच्या वस्तीवर जाऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दिसून येत असताना, दुसरीकडे याचदरम्यान प्रकृती बरी नसलेल्या वयोवृद्ध मातेला रस्त्यावर बेवारस सोडून देण्याची मानसिकताही समोर येते तेव्हा बोथट होत चाललेल्या संवेदना व अमानवीयतेचा क्रूर चेहरा अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही.

 

कोरोनाचे भय ओसरत असले तरी लम्पीने जनावरे दगावत आहेत. हाताशी आलेली पिके परतीच्या पावसाने जमीनदोस्त केल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे, तरी संकटावर मात करून व जगण्याची नवी उमेद घेऊन दिवाळीच्या दीपोत्सवाने यंदा सारे आकाश उजळून निघाले. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जाणिवा अधिक गहिऱ्या होताना दिसत आहेत. आदिवासी, वंचित, शोषित वर्गातील मुलांचीही दिवाळी आनंदमयी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था व व्यक्तींमध्ये प्रतिवर्षी भरच पडत आहे, हे अधिक आनंददायी आहे. यंदाही अनेकांनी हे सामाजिक भान जपले. परपीडेबद्दलचा कळवळा यातून दिसून आला; पण एकीकडे हे होत असतानाच दुसरीकडे काही घटना मात्र अशा घडून येतात की मनावर ओरखडा उमटून जाणे स्वाभाविक ठरते.

 

आपण सारे दिवाळी साजरी करत असताना पातूर तालुक्यातील एका रस्त्यावर ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेस आजारी अवस्थेत बेवारस सोडून देण्यात आल्याची घटना समोर आली. ज्या मातेने आपल्या लेकरांसाठी काबाडकष्ट केले, आयुष्य झिजविले; तिच्याच वाट्याला उतारवयात हे भोग यावेत हे वेदनादायी आहे. मातेचे ते हृदय आहे, त्यामुळे अधिक बोलत नसले तरी तिच्या जगण्यातील कारुण्य भळभळून वाहत असल्याचे स्पष्ट व्हावे. वृद्धांच्या सांभाळ, संगोपनासाठी कायदे आहेत; पण लोकलज्जेतून व समाजाची भीती बाळगत त्या कायद्यांचा कोणी आधार घेत नाही म्हणून काहीजण असेही निपजतात जे नात्यांना नख लावतात. अशांची मानसिकता कशी बदलावी हाच समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांपुढील व कायद्यापुढील प्रश्न आहे.

 

मागे अकोल्यातच माजी नगरसेविका राहिलेल्या एका वृद्ध महिलेला मुले व सुना सांभाळत नाहीत म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली होती. बाळापूरमध्येही एका वृद्ध भगिनीला तहसीलदारांकडे तक्रार नोंदविण्याची व खावटी मिळवून घेण्याची वेळ आली होती, तर माना पोलीस स्टेशन हद्दीत मुलाच्या दुर्दैवी निधनाचे दुःख सहन करून जगणाऱ्या मातेला सुनेने घराबाहेर हाकलून दिल्याचे प्रकरण घडले होते. अर्थात, या झाल्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेल्या घटना; परंतु घरात राहून अवहेलना सहन कराव्या लागणाऱ्या वृद्धांचे प्रमाण कमी नाही. बोलताही येत नाही व सहनही होत नाही, असे हे दुःख आहे; पण इलाज नाही म्हणून सारे सहन करून आयुष्य ओढले जाते. जगण्याचे असे ओढणे झाले की त्यात 'राम' उरत नाही, आणि त्यातून आणखी वेगळ्या घटना घडून येतात.

 

मुद्दा असा की, आपण लाख सोशल झालो, शिकलो- सावरलो; मोठी प्रगती झाली, पण मानसिकता का बदलली नाही? अलीकडे अध्यात्माकडे अनेकांचा ओढा वाढलेला दिसतो. मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. कथाकार, प्रवचनकारांचे मंडप गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. नाही म्हटले तरी त्यातून संस्कारांचे, माणुसकीचे उपदेश घडून येतात. तरी पालथ्या घड्यावर पाणी पडण्यासारखी स्थिती का बघावयास मिळते? जन्मदेत्या मातेलाच वाऱ्यावर सोडण्यासारखी किंवा पोटच्या मुलीला नकोशी म्हणून कचराकुंडीत टाकून देण्यासारखी अमानवीयता, निर्दयता येते कुठून? दारिद्र्य हे अशा अनेक गोष्टीमागचे कारण ठरते हेही खरेच; पण म्हणून रक्ताच्या नात्याचीच कसोटी लागावी? तसे नसेल तर समाजाचे व कायद्याचेही भय उरले नाही म्हणून हे असे होते का? याचा यानिमित्ताने विचार करण्याची वेळ आली आहे.

 

सारांशात, वृद्ध मातेला बेवारसपणे सोडून देण्याच्या पातूरमधील घटनेतून पराकोटीला गेलेल्या संवेदनाहीनतेचा मुद्दा समोर येऊन गेला आहे. समाजजीवनातील ही भेसुरता दूर करायची तर मानवतेसोबतच संवेदनांचेही दीप उजळण्याची गरज आहे.