इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 09:13 AM2022-11-21T09:13:01+5:302022-11-21T09:13:35+5:30

वर्तमानातले प्रश्न सोडून द्यायचे वाऱ्यावर आणि इतिहासात जाता येईल तेवढे मागे घुसत राहायचे. आपल्या सोयीचे संदर्भ शोधून काढायचे आणि आपल्याला गैरसोयीचे संदर्भ कुणी मांडले की लगेच चपलांच्या माळा हातात घेऊन वातावरण तापवायला जो तो तयारच. यात अगदी एकाही पक्षाचा अपवाद नाही.

How far back in history do you go? There is no good in arguing | इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही

इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही

Next


काँग्रेसचे पदयात्री राहुल गांधी भारत जोडो अभियानांतर्गत महाराष्ट्रातून  मध्य प्रदेशात पोहोचले. महाराष्ट्रातील पदयात्रेदरम्यान राहुल यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून  वातावरण वणव्यासारखे पेटविण्यात आले.  असे वादविवाद  अपेक्षित असले तरी ज्या प्रकारे ते लढवले जातात, ती काही सभ्य सार्वजनिक संस्कृती म्हणता येणार नाही. विषय कोणताही असो, चर्चेतला मूळ मुद्दा भरकटवून पुतळे जाळणे, मोर्चे काढणे, रस्त्यावर उतरणे, संबंधितांच्या फोटोला चपलांचे हार घालणे अशा उद्योगात हल्ली महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फार चेव चढताना दिसतो. राहुल यांच्या विधानानंतर हे सगळे रीतसर झाले. त्या आधीच्याही घटना आठवून पाहा;  दीर्घकाळ महाराष्ट्रात हेच चालू आहे. वर्तमानातले प्रश्न सोडून द्यायचे वाऱ्यावर आणि इतिहासात जाता येईल तेवढे मागे घुसत राहायचे. आपल्या सोयीचे संदर्भ शोधून काढायचे आणि आपल्याला गैरसोयीचे संदर्भ कुणी मांडले की लगेच चपलांच्या माळा हातात घेऊन वातावरण तापवायला जो तो तयारच. यात अगदी एकाही पक्षाचा अपवाद नाही.

 

भारताच्या ऐतिहासिक युगप्रवर्तकांपासून ते विविध पक्षीय राजकीय नेत्यांपर्यंत ज्याची-त्याची वक्तव्ये, कृती इतिहासाचे संदर्भ वगळून शेकडो वर्षांनंतरच्या आधुनिक वर्तमानात खेचून आणायची आणि पुढले भक्ष्य सापडेपर्यंत सार्वजनिक वातावरण पेटवून द्यायचे, हा  महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा स्वभाव बनून गेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या काँग्रेस नेतृत्वावर काँग्रेसविरोधक असभ्य भाषेत तोंडसुख घेत असतातच; पण भारत जोडो यात्रेची मूळ भूमिका मांडत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय मध्येच काढण्याचे राहुल यांना तरी काय  प्रयोजन होते? त्यानिमित्ताने भारत जोडो यात्रेकडे होणारे माध्यमांचे (कथित) दुर्लक्ष मोडून काढण्याची ही कूटनीती होती, असेही आता काहीजण म्हणतात. हे काय आहे? - वर्तमानाचा विसर पाडून जो तो असा इतिहासात घुसून वितंडवाद घालत राहिला, तर आजच्या प्रश्नांबाबत कोण, कधी बोलणार? - अशी शंका आता सामान्य माणसांनाही यायला लागलेली आहे.

राजकीय नेत्यांचे हे इतिहास-पर्यटन कमी होते म्हणून की काय, हल्ली सिनेमा निर्माते-दिग्दर्शकही इतिहास ढवळायला निघाले आहेत. म्हणजे गोंगाट आणखीच मोठा ! त्यात आता महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनीही नव्याने भर घातली असून, नवा वाद सुरू झाला आहे. वाद हे कोणाही समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे अंग असते. विधायक मार्गाने गेलेले वाद अनेकदा काही महत्त्वाचे बदलही घडवून आणतात. त्यामुळे असे वाद व्हायला हवेत; पण ते सभ्यपणे करता येणार नाहीत का?  सावरकरांवरच्या टिपण्णीमुळे भाजपने राहुल गांधी यांच्यासाठी आणलेले जोडे  आता  राजभवनावर पाठवा, अशी भाषा खासदार संजय राऊत यांनी वापरली आहे. हे टाळता येणार नाही का? ज्या थोर विभूतींना आपण दैवतासारखे मानतो त्यांच्याविषयी अपशब्द वापरू नये, त्यांचा अपमान होईल, असे वर्तन करू नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांकडून असते. मात्र, अलीकडे महाराष्ट्राने सभ्यतेची पातळी सोडल्याचे सर्वपक्षीय चित्र उभे राहिले आहे. त्यात माध्यमेही तेल ओतण्याचे काम करतात. जितकी भाषा अश्लाघ्य, तेवढी त्या नेत्यास  अधिक प्रसिद्धी मिळण्याचे दिवस आलेत का, अशी शंका येते.

अनेकवेळा बोलताना चुकीचा शब्द वापरल्याने संदर्भ तुटतो, नेमकेपणाने मुद्दा मांडता न आल्याने गैरसमज निर्माण होतो. ते समजून घेऊन अयोग्य असेल तर जरूर प्रतिवाद केला पाहिजे.  संयुक्त महाराष्ट्राच्या  लढ्यात अत्यंत कडवी टीका करताना खोचक बोलले जात असे; पण त्यात असभ्यपणा नव्हता. महाराष्ट्र त्या परंपरेपासून दूर जातो आहे. राज्यातील काही उद्योग गुजरातमध्ये जाण्यावरून सुमारे महिनाभर लढली गेलेली आरोप-प्रत्यारोपांची लढाई आठवा. त्यात ना कुणी महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्याचे काळजीने काही आरेखन केले, ना कोणी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. फक्त एकमेकांवर चिखलफेक एवढेच? - ही अशी उणीदुणी काढत बसण्याला कुणाला खरेतर वेळच असू नये, असे वर्तमान आणि भविष्य आपल्यासमोर आहे.  हवामान बदल, नागरीकरण, शहरी समस्या, पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण असे गंभीर विषय आपल्या गळ्याशी आले आहेत. त्याचे काय ते पाहा. इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही.
 

Web Title: How far back in history do you go? There is no good in arguing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.