गत काही दिवसांत विदर्भात उघडकीस आलेली काही प्रकरणे बघू जाता, आसाराम, राम रहीम, राधे माँ, रामपाल यासारख्या प्रकरणांपासून सर्वसामान्य नागरिकांनी काहीही धडा घेतला नसल्याचे कटु सत्यच अधोरेखित होते. बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी अशोक पवार ऊर्फ पाणीवाले बाबाच्या विरोधात काही गावक-यांनी पोलिसांकडे तक्रार केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या बाबाची भेट घेऊन त्याला आव्हान दिले. हा बाबा कर्करोग व एड्ससारखे दुर्धर आजार केवळ कथित आयुर्वेदिक पाण्याद्वारा बरे करण्याचा दावा करतो. तत्पूर्वी बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी गावात अघोरी उपचार करणाºया एका मांत्रिकाने एका युवतीचा विनयभंग केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गत आठवड्यात अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथे पतीसाठी औषध आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर नईमबाबा नामक भोंदूने बलात्कार केल्याची घटना समोर आली. हा नईमबाबा सध्या कारागृहाची हवा खात आहे. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत भोंदूगिरीची तीन प्रकरणे उघडकीस येतात, यावरून अंधश्रद्धांची पाळेमुळे समाजात किती खोलवर रुजलेली आहेत, याची जाणीव होते. शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत जाईल, तशा अंधश्रद्धा आपोआप कमी होत जातील, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने वस्तुस्थिती विपरीत आहे. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यांचा काहीही संबंध नसल्याचे, उच्च शिक्षितांच्या वर्तनावरून वारंवार सिद्ध होत आहे. एखाद्या बाबाच्या कृपाप्रसादासाठी रांगांमध्ये उभे असलेले डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते, सनदी लेखापालांसारखे उच्च शिक्षित प्रत्येक शहराने बघितले आहेत. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक उलटत आले असताना ही स्थिती असेल, तर आमच्या शिक्षण प्रणालीसंदर्भात गांभीर्याने विचार व्हायला हवा. पुढील पिढ्यांना केवळ शिक्षितच नव्हे, तर बुद्धिप्रामाण्यवादी बनविणारी शिक्षण प्रणाली ही काळाची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये बदल गरजेचे आहेत. अर्थात, अशी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात आणणे खूप कठीण आहे; कारण श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील सीमा अत्यंत धूसर आहे. या वस्तुस्थितीचा लाभ घेऊन, आमच्या श्रद्धास्थानांवर हल्ले होत असल्याची ओरड सुरू करणाºया मंडळीची आमच्या देशात अजिबात कमतरता नाही. अशांची संख्या कमी होत नाही, तोवर बुद्धिप्रामाण्यवादी तयार करणारी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात आणणे कठीण आहे आणि जोवर अशी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात येत नाही, तोवर अशांची संख्या कमी होणे शक्य नाही. मग हा पेच सुटावा तरी कसा?
आयुर्वेदिक पाण्याद्वारा कर्करोग व एड्ससारखे दुर्धर आजार बरे करण्याचा हा पेच सुटावा तरी कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:52 PM