मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन हा एक उपाय आहे. जगभरातील अनेक देशांनी लॉक डाऊन केले आहे, त्याचे परिणाम दिसत आहेत. कोरोनावर कोणतीही प्रतिबंधात्मक औषधी अद्याप तयार झालेली नाही, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे एवढेच आपल्या हाती आहे. भारतात लॉकडाऊनचे दुसरे पर्व सुरु झाले असताना नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. ४० दिवस लॉकडाऊन पाळणे हे सोपे नाही, हे मान्य करायला हवे. पण स्वत:च्या जीवापेक्षा अधिक काही नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने उपाययोजना कठोरपणे अंमलात आणायला हव्या.खान्देशात कोरोना पोहोचला असून त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तब्बल २० रुग्ण आढळून आले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव, अमळनेर, धुळे, साक्री, शिंदखेडा, नंदुरबार, शहादा, आणि अक्कलकुवा अशा ८ तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. जळगाव, धुळे या जिल्हा मुख्यालयांसह अमळनेर, साक्री या तालुकास्थानी रुग्ण दगावले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खान्देशच्या चार ही दिशांना कोरोनाचा प्रभाव असलेले जिल्हे आहेत. गुजराथ, मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा तिन्ही जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत. औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक या शेजारी जिल्ह्यात रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे जिल्हा बंदीचे कठोरपणे पालन केल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळविणे सोपे नाही.२० एप्रिलपासून सरकारने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केला. काही उद्योग, व्यापाराला परवानगी दिली. मात्र त्याचा भलताच परिणाम झाला. मुंबई, पुण्यात तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. भाजीपाला, किराणासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे शारीरिक दूरत्वाचे नियम गुंडाळून ठेवण्यात आले. ही परिस्थिती पाहता सरकारला शिथीलतेचा निर्णय या दोन महानगरांसाठी मागे घ्यावा लागला.आपल्या भागात तीच स्थिती आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजीबाजार, किराणा दुकाने, रुग्णालये, औषधी दुकाने याठिकाणी शारीरिक दूरत्व, मास्क हे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. भाजीपाला आणि फळ विक्रेते यांच्यावर नियंत्रण आणण्याची नितांत आवश्यकता आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणाºया या विक्रेत्यांभोवती मोठी गर्दी होते, तर एका जागी थांबलेल्या विक्रेत्याकडे हेच चित्र असते. विक्रेते आणि नागरिक मास्क वापरण्याचा कंटाळा करतात. रात्रीच्यावेळी तरुण मुले, महिला आणि सहकुटुंब फिरणाऱ्यांची गर्दी अनेक रस्त्यांवर दिसून येते. आपण नियम पाळत नाही, नियम आपल्यासाठी नाही, असे मानून वागणाºया या बेपर्वा लोकांमुळे नियम पाळणाºया इतरांना धोका होऊ शकतो, हे यांच्या गावीही नसते.कोरोना विषाणूचा परदेशातून भारतात आल्याचे स्पष्ट झाले. पासपोर्टवाल्या श्रीमंतांनी हा संसर्गजन्य आजार आणला आणि रेशनकार्डवाल्या गरिबांना दिला अशी मांडणी केली गेली. वर्गवादी रचना असे मानले गेले. मात्र कोरोनाने त्यांनाही चकवले. केंद्र सरकारच्या हवाई मंत्रालय, लोकसभा सचिवालय, महाराष्टÑाचे मंत्री यांनाही प्रादुर्भाव झाला. डॉक्टर, अधिकारी, पत्रकार यांनाही कोरोनाने गाठले. त्यामुळे आमची प्रतिकारशक्ती चांगली आहे, आम्हाला काही होणार नाही, या भ्रमात कोणी राहू नये.जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचना, केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कळविलेले मार्गदर्शक उपाय यांचे काटेकोर पालन करणे आजच्या घडीला नितांत आवश्यक आहे. तर्कवितर्क, वादप्रतिवाद, शंकाकुशंका यांना थोडे दिवस विश्रांती द्या. शासकीय प्रयत्नांना नागरिकांच्या सामूहिक निर्धाराची जोड मिळाल्यास कोरोनावर आपण मात करु शकू. चला तर मग निर्धार करुया आणि सुरक्षित राहूया.
नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:47 PM