- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री,नमस्कार. काँग्रेस पक्षाला १३८ वर्षे पूर्ण झाली म्हणून प्रत्येकाने १३८ रुपये डोनेशन द्यावे, असे आवाहन आपल्या पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी केल्याचे पाहिले. १३८ रुपये किंवा त्याच्या पटीत पैसे डोनेट केले तरी चालतील. या पैशांतून काँग्रेस पक्ष, देश वाचवण्यासाठी, सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल, असेही आपले नेते म्हणाले. हे १३८ रुपये गोळा करायला सुरुवात कोणापासून करायची? कार्यकर्त्यांपासून... पदाधिकाऱ्यांपासून... की नेत्यांपासून..? ज्यांना पक्षाने भरभरून दिले अशा नेत्यांनीही १३८ रुपये द्यायचे आणि ज्याने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलल्या त्यानेही १३८ रुपये द्यायचे..! ही समानता फक्त आपल्याच पक्षात असू शकते. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. त्यातील एका तुकड्याचे तरुण नेते रोहित पवार यांनी महाराष्ट्रभर यात्रा काढली. तरुण वर्ग स्वतः सोबत जोडण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. त्याचा समारोप त्यांनी नागपुरात केला. ज्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले, त्यातील एका तुकड्याचे नेते उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या प्रश्नावर मुंबईत मोर्चा काढला. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे अजून तरी दोन तुकडे झालेले नाहीत. असे असताना काँग्रेसने नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात काठावर पास होण्याइतपतही मार्क मिळवलेले नाहीत. त्यांना अभ्यास करता यावा म्हणून या १३८ रुपयांमधील काही रक्कम देण्याची योजना आहे का..? म्हणजे आपले नेते अभ्यास तरी करतील. सरकार कुठे चुकत आहे ? सरकारवर कसा आणि किती हल्लाबोल केला पाहिजे, याचे ज्ञान मिळवतील.
भाजपला महाराष्ट्रात सरकार आणायचे होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जलसिंचनाचे गाडीभर पुरावे घेऊन धडक मोर्चा काढला होता. पुरावे असलेली ती गाडी कुठे गेली माहिती नाही. मात्र ज्यांच्याविरुद्ध आरोप होते ते अजितदादा आज त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून बसले आहेत. आपल्या काँग्रेसच्या नेत्यांनाही अशी एखादी यात्रा, मोर्चा, पदयात्रा, प्रभातफेरी करण्यासाठी किंवा विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात गाडीभर पुरावे गोळा करून राज्यभर मिरवून आणण्यासाठी या निधीचा वापर करण्याची तरतूद केली पाहिजे. गेला बाजार या पैशांतून गाडीभर पुरावे नेण्यासाठी लागणारी गाडी तरी भाड्याने घेता येईल का? याचाही विचार आपण केला असेलच.
एवढी वर्षे महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे नेते अत्यंत सचोटीने काम करत राहिले. साक्षात राजा हरिश्चंद्राची उपमा द्यावी असेच आपल्या नेत्यांचे कार्य राहिले आहे. कधी त्यांनी कोणाकडून बदल्यांसाठी किंवा कामांसाठी पैसे घेतले नाहीत. पक्षासाठी देखील फारसा निधी त्यांनी गोळा केला नसेल. त्यामुळेच आता आपल्यावर लोकांकडून प्रत्येकी १३८ रुपये गोळा करण्याची वेळ आली आहे. याची आम्हाला चांगलीच कल्पना आहे. दान, धर्म, पुण्य, दातृत्व या गोष्टी महाराष्ट्राची शक्ती आहेत. त्यामुळे आपण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये प्रत्येकी १३८ रुपये गोळा करण्यासाठी जीव तोडून मेहनत कराल याविषयी आमच्या मनात शंका नाही.
लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. कुठल्या मतदारसंघातून कोण उभे राहू शकते, यासाठीचे तपशीलवार दोन-तीन वेळा सर्वेक्षणही करून घेतले आहे. आपले कोणते नेते आपल्यासोबत राहतील आणि कोणते सोयीनुसार भाजपसोबत जातील? याचेच सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही, असे एक नेते खासगीत सांगत होते. तसे काही आहे का ? त्याचा शोध घेण्यासाठी या निधीचा वापर करण्याची कोणी कल्पना मांडली तर तसे करू नका. उगाच आपल्यावर टीकेची झोड उठेल. आपल्या पक्षातील काही वरिष्ठ नेते भाजपशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत. त्यामुळे भाजपने केलेला सर्वेक्षण अहवाल त्यांच्याकडून गुपचूप आपल्याला मागवता येईल का..? तेवढाच आपला खर्च वाचेल.
आपण एवढे पैसे गोळा करणार आहोत. ते वाया जाऊ नये म्हणून जाता जाता दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे. विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने कोणती चुकीची धोरणे आखली ? याचा विस्तृत अभ्यास करावा लागेल. त्यासाठी किमान सहा महिने लागतील. तेवढ्या वेळात लोकसभेच्या निवडणुका पार पडतील; पण चिंता करू नका. केलेला अभ्यास विधानसभेला कामी येईल. विधानसभेला आपल्यासोबत कोण राहील, कोण नाही याचाही अंदाज येईल.लोकांकडे आपण जेव्हा जाऊ, तेव्हा लोक तुम्हाला पैसे कशासाठी पाहिजेत, असे विचारतील. आपल्याला किमान ७० वर्षांचा हिशेब तरी देता आला पाहिजे. या पैशांतून आपण देशभर ७० वर्षांत काँग्रेसने देशासाठी काय केले ? याचे डॉक्युमेंटेशन करून गावागावात दाखवले पाहिजे. कार्यकर्ते तयार केले पाहिजेत, अशी जर कल्पना कोणी मांडली तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याचा काही उपयोग होत नाही. बुथ मॅनेजमेंट, पन्ना मॅनेजमेंट, मतदानाच्या दिवशी कोणत्या भागातले मतदार मतदानासाठी बाहेर काढायचे आणि कोणाला घरातच बसू द्यायचे हे नियोजन जास्त महत्त्वाचे. त्यासाठी पैसे जमा होणे महत्त्वाचे. पुढचे पुढे बघू...तुमचाच,बाबूराव