- राही भिडे (ज्येष्ठ पत्रकार)
राजकारणात एकदा खुर्ची मिळाली, की ती सहजासहजी सोडायची नसते, सोडली की गेलीच समजा. ही एकूण जगभरातील नेत्यांची मानसिकता आहे. एकदा खुर्ची मिळाली की तहहयात हवी, असे जणू समीकरणच बनले आहे. कितीही अपराध झाले, वय झाले आणि साधे उभे राहता येत नसले, तरी निवडणूक आली, की खुर्ची टिकविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होत असते. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांत दिलेला राजीनामा हे प्रामाणिक आचरणाचे आदर्श उदाहरण आहे.
राजकारणात कितीही चुका झाल्या, तरी आपलेच किती बरोबर आहे हे ठासून सांगायचे असते. भारतात पदोपदी हा अनुभव येतो. एखाद्या निर्णयाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे राजकारणी आता विरळाच. खुर्ची मिळाली, की तिला चिकटून बसण्याचा आणि कितीही मानहानी झाली, तरी ती न सोडण्याचा राजकारण्यांचा स्थायीभाव असतो; परंतु ट्रस त्याला अपवाद ठरल्या आहेत. आपण घेतलेल्या आर्थिक निर्णयाला पाठिंबा मिळत नाही आणि आपल्या निर्णयामुळे देशाला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढता येत नाही, हे लक्षात आले, तेव्हा ट्रस यांनी त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगून राजीनामा देणे पसंत केले. ज्या काळात त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली, तो काळ हा आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा काळ होता. त्या म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत, हुजूर पक्षाने मला निवडून दिले; परंतु हा जनादेश मी पूर्ण करू शकणार नाही.
त्यांच्या राजीनाम्याच्या एक दिवस अगोदर ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनीही राजीनामा दिला होता. त्या भारतीय वंशाच्या आहेत. ट्रस सरकारच्या धोरणांवर त्या नाराज होत्या. गृहमंत्री आपल्या पंतप्रधानांविरुद्ध बोलण्याची हिंमत करतो, हे ब्रिटनमध्येच शक्य आहे. खुर्चीला चिकटून राहणे, पक्षाने दिलेली निवडणूक आश्वासने न पाळणे ही वृत्ती वाढत असताना एखाद्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर घेऊन सत्तेचा मोह सोडण्याचे धाडस फक्त ट्रस यांच्यासारख्या नेत्याच करू शकतात. साहजिकच ब्रिटनमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असून आता तिथला पुढचा पंतप्रधान कोण होणार, हा प्रश्न आहे. मात्र, नवा पंतप्रधान निवडून येईपर्यंत प्रथेप्रमाणे त्या काळजीवाहू पंतप्रधान राहतील. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात पंतप्रधानांची निवड होऊ शकते.
पंतप्रधान जेव्हा राजीनामा देतात, तेव्हा देशात आपोआप सार्वत्रिक निवडणुका होत नाहीत. २०१६ मध्ये जेव्हा थेरेसा मे यांनी डेव्हिड कॅमेरून यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांनी तत्काळ निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला होता. नव्या पंतप्रधानांनी नियोजित वेळेपूर्वी निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला, तर देशातील पुढील निवडणुका जानेवारी २०१५ पूर्वी होण्याची शक्यता नाही. ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर यांनी आता सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ट्रस यांनी राजीनामा देताच हुजूर पक्षाने नवा नेता निवडण्याची तयारी सुरू केली आहे. नवे पंतप्रधान होण्यासाठी दावेदारांनी पक्षाच्या खासदारांना पाठिंबा मिळवण्याची कसरत सुरू केली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
सुनक यांचा पराभव करूनच लिझ ट्रस पंतप्रधान झाल्या होत्या. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शर्यतीतून माघार घेतली आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये सुनक हे आजही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेले सुनक त्यामुळे पंतप्रधान झाले आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान झाल्यामुळे इतिहास घडला आहे. परंतु लिझ यांचा भारताबरोबर मुक्त व्यापार धोरणाचा करार ते पुढे नेणार का, हा प्रश्न आहे. त्यांच्या देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आश्वासन सुनक यांनी दिले आहे.