देशाच्या बहुतेक भागांत आणि विशेषतः महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापूर अशा अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी काळी दिवाळी साजरी केली. अशावेळी शहरांमधील बुडव मध्यमवर्गीयांनी दिवाळीत घडविलेले त्यांच्याकडील समृद्धीचे, संपत्तीचे दर्शन क्लेशदायक आहे. उंची कपडे, दागिने, गोडधोड पदार्थ यांच्याबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीने शहरांचे आसमंत यंदाच्या दीपोत्सवात कमालीचे उजळून निघाले. या शहरी मंडळींना ग्रामीण भागातील गरीब, वंचित अशा शेतकरी-शेतमजूर वर्गाचे दुःख दिसले नाही. सतत कोणत्या ना कोणत्या उत्सवात रमणाऱ्या या वर्गाने फटाक्यांच्या रूपाने एक नवे संकट स्वत:वर ओढवून घेतले आहे. शहरांमधून आलेल्या सगळ्या बातम्या पाहा: रॉकेटने डोळ्याची पापणी फाटली, डोळ्यात रक्त साकळले व गोठले.
फटाक्यांमुळे मुलांचे चेहरे भाजले. समोरच्या इमारतीत राहणाऱ्यांवर राग असल्यामुळे खोडसाळपणे त्या दिशेने रॉकेट सोडणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. बाहेरून आलेल्या रॉकेटमुळे चार बेडरूमचा आलिशान फ्लॅट जळून खाक झाला, गोदामाला आग लागली. फटाके वाजवू नका म्हटले म्हणून मारहाण झाली. दिवाळीसारखे प्रकाशाचे पर्व साजरे करतानाही आपण बेभान होतो. सहज जाणवतील असे धोकेही आंधळे झाल्याने जाणवत नाहीत. भान हरपून आपण आपलाच जीव धोक्यात घालतो, हेच या प्रकारांमधून दिसून येते.
अर्थात, जनतेच्या मनातले म्हणजे हिंदूचे सरकार सत्तेवर आल्यामुळे यंदा सण-उत्सव दणक्यात साजरे करा, असे आवाहन थेट राज्यकत्यांनीच केले असल्याने लोकांनी थोड्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना कसा दोष देणार? त्यातूनच ज्यांचा विवेक अजूनही जाग्यावर आहे, अशांनी फटाक्यांच्या धोक्यांबद्दल सावध केले तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी थेट संबंधितांना देश सोडून जावे, असा इशारा दिला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये दिवाळीच्या तीन-चार दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडे नोंद झालेल्या आगीच्या घटना आणि त्यात जखमींची संख्या पाहिली तरी चित्र बरेच स्पष्ट होते. हे केवळ महाराष्ट्रात घडले असे नाही.
देशाच्या बहुतेक भागांमध्ये अशाच घटना घडल्या. राजधानी दिल्ली तर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. तो डाग पुसण्याचा एक प्रयत्न म्हणून सरकारने येत्या १ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारचे फटाके उडविणे, साठवण्यावर बंदी घातली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने भाजपने लगेच आप हा हिंदूविरोधी पक्ष असल्याचे आकांडतांडव सुरू केले. नेते, प्रवक्ते सरकारवर तुटून पडलेच; शिवाय भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हिंदू म्हणून दिवाळी साजरी करताना फटाके वाजविण्याचा हक्क असल्याचा दावा केला. ती याचिका तातडीने सुनावणीस घेण्यास नकार देताना न्या. एम. आर. शाह व न्या. एम. एम. सुंद्रेश यांनी संबंधित खासदारांना सुनावले की, नागरिकांच्या जीवितापेक्षा तुमचा धार्मिक हक्क महत्त्वाचा नाही.
लोकांना जरा शुद्ध हवेत श्वास घेऊ द्या. तरीदेखील बंदी असूनही दिल्लीकरांनी दिवाळीत मनसोक्त फटाके फोडलेच. फटाक्यांवर बंदीचा फज्जा उडाला. फटाकेबंदीसह इतर सारे प्रयत्न करूनही राजधानीतले प्रदूषण फार कमी झाले नाही. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद या सर्व भागांत यंदाही श्वास घेणे मुश्कील होते. त्यातल्या त्यात समाधान एवढेच की, २०१९ पासून चार वर्षांतील किमान प्रदूषण यंदा नोंदवले गेले. अर्थात, त्यात माणसांपेक्षा निसर्गाची साथ अधिक होती. यंदा दिवाळीच्या दिवसांमध्ये राजधानी परिसरात हवा वाहती होती. त्यामुळे धूर एका ठिकाणी साचून राहिला नाही.
खरेतर टोकाच्या धर्माभिमानी प्रचारामुळे अलीकडे धार्मिक भावना कमालीच्या टोकदार झाल्या आहेत. प्रत्येक धर्माच्या अनुयायांवर हेच बिंबविले जाते की, आपलाच धर्म संकटात आहे. त्यामुळे अशा अपघातांबद्दलदेखील काही बोलले, लिहिले की दरवेळी आमच्याच सणावेळी हे प्रदूषण वगैरे कसे काय आठवते, असे प्रतिप्रश्न केले जातात. स्वतःचा, कुटुंबातील सदस्यांचा, लहान मुले व वृद्धांचा जीव धोक्यात घालून साजरा केला जातो तो कसला उत्सव, हा प्रश्न मात्र पडत नाही. थोडक्यात सांगायचे तर आता प्रबोधन वगैरे प्रयोग मागे पडले आहेत. कायद्याने अशी बेफिकिरी रोखणे हाच उपाय शिल्लक आहे.