सविता देव हरकरे(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)दर वर्षीप्रमाणेच यंदाही १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. परंतु मानवी विकासाच्या प्रक्रियेत झपाट्याने होणारा जंगलांचा ऱ्हास आणि त्यावर अवलंबून असलेल्या प्राण्यांपुढे निर्माण झालेला जीवनमरणाचा गंभीर प्रश्न बघता केवळ एक आन्हिक समजून असा उत्सव साजरा करुन भागणार नाही, तर अत्यंत गांभीर्याने योग्य उपाययोजनांद्वारे नैसर्गिक संपत्तीचे जतन करावे लागणार आहे. अन्यथा एकापाठोपाठ एक होणारा वन्यजीवांचा नायनाट भविष्यात मानवाच्या अस्तित्वासाठीच घातक ठरू शकतो. चित्ता केव्हाच संपला. गेंड्यांच्या बाबतीतही असेच घडले. आता केवळ आसामच्या काझिरंगामध्ये थोडेबहुत गेंडे शिल्लक आहेत. रानम्हशी शेवटच्या घटका मोजत आहेत. नाही म्हणायला आसाम, मध्य प्रदेश आणि ओरिसाच्या मर्यादित क्षेत्रात त्यांचे अस्तित्व टिकून आहे. कोणे एकेकाळी भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि जंगलचा राजा म्हणून देशभरात मिरवणारा सिंह केवळ गुजरातच्या गीरपुरताच मर्र्यादित असावा यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असणार? तिथे अनेक वर्षांपासून संरक्षण लाभल्यानेच ३००-४०० सिंह शिल्लक आहेत. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना वाघांच्या वाढत्या उदात्तीकरणावर चिंता व्यक्त करतानाच सिंहांच्या संवर्धनाचाही मुद्दा उपस्थित केला होता. सिंह केवळ गीरपुरताच मर्यादित न राहता देशभरातील जंगलांमध्ये त्यांचा संचार असला पाहिजे आणि यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत काही वन्यजीव प्रेमींनीही व्यक्त केले आहे. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु तो थंड बस्त्यात गेला. कारण त्यांना लागणारी माळराने येथे नाहीत. जंगलांमधील हरणे आणि अस्वलांचीही संख्या रोडावली आहे. प्राण्यांच्या अशा अनेक प्रजाती नामशेष झाल्या असून असंख्य अतिधोकादायक स्थितीत आहेत. ही एक धोक्याची घंटा मानली गेली पाहिजे. महाराष्ट्राचा विचार करता, हा प्रदेश जैवविविधतेने नटलेला आहे. विविध अभयारण्यांशिवाय ताडोबा-अंधारी, मेळघाट,पेंच, सह्याद्री आदी व्याघ्र प्रकल्प येथे आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २०.१२ टक्के क्षेत्रात पसरलेली ही वने म्हणजे वन्यजीवांचे आश्रयस्थान! जवळपास ३५०० प्रजातींच्या फुलांनी बहरणारे वृक्ष यात प्रामुख्याने सागवान, हळदू, शिसम, कळम, चेहडा, हिरडा, सालई, रोहन, मोह या महत्त्वाच्या वृक्षांचा समावेश आहे. याशिवाय ८५ प्रकारचे सस्तन प्राणी आणि ४६० प्रजातींचे नानाविध पक्षी येथे आढळतात. वाघांसोबतच बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, तडस, रानगवे, अस्वल, रानकुत्रे असे प्राणी या जंगलांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सापांचेही अनेक प्रकार येथे आहेत. पण दुर्दैवाने जंगल म्हणजे वाघ एवढेच समीकरण आपण ध्यानात ठेवल्याने हे सर्व पक्षी-प्राणी दुर्लक्षित होत आहेत. वन विभागाकडूनही वाघांवरच लक्ष केंद्रित करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरु आहे. वाघांच्या उदात्तीकरणामागेही त्याच्या संवर्धनापेक्षा उत्पन्नाचाच हेतू अधिक असल्याचे दिसून येते. कारण आपण वाघाचे नामकरण करुन त्याला आयकॉन बनविले असले तरी त्याच्या संरक्षण, संवर्धनाची पुरेशी यंत्रणा आपल्याकडे नाही, हे वास्तव स्वीकारायला हवे. शासन आणि प्रशासनाच्या या उपेक्षेने केवळ वाघच नव्हे तर इतर अनेक प्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. पूर्वी घरांच्या छतांवर आढळणारे मधमाशांचे पोळे आता शोधून सापडत नाही. परागीकरण करणारी रंगीबेरंगी फुलपाखरे दिसेनासी झाली आहेत. सीमेंटची जंगले आणि गगनचुंबी इमारतींमध्ये चिमण्यांचा चिवचिवाट केव्हा लुप्त झाला हे कळलेसुद्धा नाही. कोळी, वटवाघुळे हे सर्वच पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका वठवित असतात. त्यांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. जैवसाखळीतील स्वच्छतादूत गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आजमितीस राज्यात फक्त २५० गिधाडे शिल्लक आहेत. प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या देखण्या सारसांची स्थिती तर आणखी वाईट आहे. विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात ४० सारस शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, राजस्थान गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मात्र हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो. मग महाराष्ट्रातच त्याला धोका का याचा विचार व्हायला नको का? वन्यजीवांचे संरक्षण करताना त्यांचा अधिवास अबाधित ठेवणे आणि इतरांपासून त्यांचा बचाव करणे हे दोन मुख्य उपाय आहेत आणि नेमक्या याच दोन गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. खाद्यांन्नाचा तुटवडा नसेल तर वाघही जंगलातून बाहेर पडत नाही. पण आज वनक्षेत्र कमी होण्यासोबतच तृणभक्षी प्राण्यांना लागणारे गवत आणि अधिवासही नष्ट होत आहेत. वनसंवर्धनाच्या नावावर वन विभागातर्फे वृक्षारोपणाची विक्रमी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोट्यवधींची वृक्षलागवड केली जात आहे. पण यापैकी किती झाडे जगणार आणि आजवर किती जगली याचा हिशेब मात्र या विभागाकडे नाही आणि ते शक्यही नाही. कारण मुळात झाडांचे वाचणे किंवा मरणे हे आपल्या हाती नाही. निसर्गावरच ते सोडावे लागते. शेवटी निसर्ग हा मानवाप्रमाणेच नात्यागोत्यांमध्ये अडकलेला एक समुदाय आहे. त्यामुळे हे कुटुंब परिपूर्ण असले तरच वृक्ष जगतात, बहरतात. त्याला अनुकूल वातावरण मिळायला हवे. एकीकडे आपल्या उपद्रवांनी या निसर्गरुपी कुटुंबाचाच ऱ्हास करायचा आणि मग कृत्रिम निसर्ग (जंगल) निर्माण करण्याचा अट्टहास धरायचा, हे कितपत योग्य आहे. निसर्ग सर्वज्ञ आहे. स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता त्याच्यात आहे. गरज आहे ती केवळ मानवाने त्यातील आपला हस्तक्षेप थांबविण्याची. असे घडले तरच खऱ्या अर्थाने वन्यजीव सप्ताह साजरा होईल.
कृत्रिम निसर्गाचा प्रयोग कितपत व्यवहार्य?
By admin | Published: October 05, 2016 3:56 AM