- विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक
अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठात १९९७ साली एक वेगळीच संगीतसभा आयोजित करण्यात आली होती. खरं तर तो एक प्रयोगच होता. त्यामध्ये एका पियानोवादकाने तीन वेगवेगळ्या संगीतकारांनी निर्मिलेल्या संगीतरचना सादर केल्या. त्यातील एक रचनाकार होते योहन सबास्टियन बाख. पाश्चात्य अभिजात संगीताच्या क्षेत्रातील अद्भूत प्रतिभेचा जर्मन संगीतकार ! दुसरी रचना होती त्याच विद्यापीठाच्या संगीत विभागातील एका प्राध्यापकाने निर्मिलेली. ती त्याने मुद्दामच बाखच्या शैलीशी मिळतीजुळती ठेवली होती आणि तिसरी रचना चक्क अल्गोरिदम वापरून तयार करण्यात आली होती. तीदेखील बाख यांच्या संगीतरचनांची विदा वापरून; पण स्वतंत्रपणे केलेली कृत्रिम निर्मिती होती. तिन्ही रचना ऐकविल्यानंतर रसिकांना कोणती रचना कोणाची ते ओळखण्यास सांगण्यात आलं. आश्चर्य म्हणजे बहुतेकांना वाटलं की, प्राध्यापक महोदयांची रचना संगणकीय आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे बहुतेकांना अल्गोरिदमने केलेली रचनाच बाखची अस्सल आणि मूळ रचना वाटली.
संगीत म्हणजे दैवी, हृदयातून येणारा, सर्जक आविष्कार असतो, असं मानणाऱ्या रसिक-कलावंतांसाठी हा एक धक्काच होता. सर्जनशीलता म्हणजे खास मानवी प्रांत. तिथे यंत्रतंत्राला स्थान नाही. तो फक्त मानवी प्रज्ञेचा आविष्कार असंच बहुतेकांना वाटतं; पण या प्रयोगाने दाखवून दिलं की अगदीच तसं असतं असं नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे कलात्मक आविष्कारही प्रतिभावान कलाकाराच्या आविष्कारासारखेच उत्तुंग वाटू शकतात.
आता हे खरं की त्या प्रयोगात अल्गोरिदमने केलेली रचना ही बाखच्याच रचनाशैलीची नक्कल होती. डेव्हिड कोप नावाच्या संगणकतज्ज्ञाने कृत्रिम बुद्धिमत्तेकडून ती करवून घेतली होती. मोठे किचकट काम होते ते. त्याने बाखच्या संगीतरचना एकत्र केल्या. त्यातील एकेका रचनेतील एकेक सुराची पाच सांगीतिक निकषांवर संगणकीय नोंद केली. अशा अक्षरशः हजारो सुरांची त्यांनी नोंद केली. बाखच्या रचनांमध्ये कोणत्या सुरानंतर कोणता येतो, याचे पॅटर्न्स नोंदविणारे अल्गोरिदम लिहिले. एकदा ही विदा आणि सुरावटींच्या वृत्ती-प्रवृतींचे कल लक्षात आले की मग या कृत्रिम बुद्धिमत्तेला फक्त पहिला सीर देण्याचा अवकाश. त्या सुरानुसार हा अल्गोरिदम बाखच्या शैलीतील एक नव्हे अनेक संभाव्य रचनांचे पर्याय देणार. ते पर्याय किती अस्सल वाटतात, याचा प्रत्यय प्रयोगात आलाच.
हा प्रयोग होऊन आता पाव शतक उलटलं आहे. आज तर संगणकांची विदा प्रक्रिया करण्याची क्षमता अनेकपटींनी वाढलीय. विदाप्रक्रियेचे नवनवे प्रकारही शोधले गेले आहे. त्यामुळे साहजिकच सर्जन करण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमताही त्याच प्रमाणात वाढलीय. तुम्ही कदाचित म्हणाल की कृत्रिम बुद्धिमत्तेने जे केलं ते खरं सर्जन नाही. ते फक्त अस्तित्वात असलेल्या गोष्टीची सरमिसळ आहे. तुमचं म्हणणं खरंच आहे; पण एक प्रतिप्रश्न असा, की मुळात मानवी सर्जनशीलता तरी प्रत्येक वेळी नवं काही देते की तीही असलेल्याच गोष्टींची नवरचना करते?पाब्लो पिकासो हा महान चित्रकार म्हणाला होता, ‘चांगले कलाकार (गोष्टी किंवा कल्पना) उधार घेतात. महान कलाकार (त्या) चोरतात.’ अर्थातच हे चोरणं नेहमीच नसतं. कल्पना जरी चोरलेल्या असल्या तरी त्यांना जोडण्याची दृष्टी मात्र कलाकाराची असते. त्याच्या अनुभवविश्वातून साकारलेली, त्या त्या स्थळकाळाच्या संस्कारांनी घडलेली असते. एका अर्थाने गोष्टींमधील नवे सहसंबंध बघण्याची, कल्पिण्याची दृष्टी हा कलाकारांच्या सर्जकतेचा गाभा. ही दृष्टी विकसित किंवा उत्क्रांत होत जाते. ती वैयक्तिक कलाकारांच्या बाबतीत जशी उत्क्रांत होते तशी कलाकारांच्या पिढ्यांमध्येही होत जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेतून होणाऱ्या सर्जकतेत ही उत्क्रांती आणता येईल का, हा प्रश्न म्हणूनच महत्त्वाचा बनतो आणि त्याचं उत्तर आजमितीला हो असं आहे.
सांगीतिक रचनांची प्रचंड विदा घ्यायची. त्यातील डीएनएसारखे असणारे गुणधर्म टिपायचे. त्यातून सांगीतिक रचनांच्या पिढ्या जन्माला घालायच्या. त्यातील कोणत्या रचना काळाच्या, रसिकांच्या आणि बाजारपेठेच्या निकषावर टिकल्या हे तपासायचं, त्याआधारे सुधारित सांगीतिक डीएनएची नवी पिढी घडवायची आणि रचना तयार करायच्या. खऱ्या उत्क्रांतीसारखी वाटणारी ही प्रक्रिया राबवू शकणारे अल्गोरिदम आज उपलब्ध आहेत आणि संगीतरचना तयार करीत आहे. यू-ट्यूबमधील अनेक व्हिडीओंवर पार्श्वसंगीत म्हणून वाजणाऱ्या अनेक सुंदर रचना या अशाच कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या असतात. कविता आणि चित्र काढणारे अनेक अल्गोरिदमही आज उपलब्ध आहेत आणि त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती जाणकार रसिकांनाही अस्सल मानवी वाटाव्या इतक्या सुंदर झाल्या आहेत. अर्थात, दरवेळी त्यात मानवी बुद्धीतून येणारी अभिनवता दिसणार नाही. त्याबाबतील त्यांना मानवाचंच अनुकरण करावं लागणार; पण थोडे बारकाईने पाहिलं तर बाजारपेठेच्या आश्रयाने चालणाऱ्या बहुतेक उपयोजितन कलाविष्कारांमध्ये अभिनवता ही बऱ्याच काळानंतर आणि कमी प्रमाणातच अनुभवायला येत असते. - तरीही कलेची निर्मिती आणि आस्वादातील आनंद हे आपल्यासाठी अस्सल मानवीपण जोपासण्याची मूल्यं! यांत्रिकतेविरुद्धच्या लढाईतील मानवीपणाचे आपले जणू बालेकिल्ले; पण आज तेही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टप्प्यात आले आहेत. म्हणूनच एक भांबावलेपणही आलं आहे. खूप खोलवरचे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. माणूसपणाचा कस लावणारे हे प्रश्न कोणते? त्यांची उत्तरं मिळतील तरी का, आणि कुठे?... या प्रश्नांना स्पर्श करून ही लेखमाला संपवू या. भेटू पुढच्या आणि शेवटच्या लेखात.