अभ्यासू नेता अकाली हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 06:27 AM2018-08-23T06:27:41+5:302018-08-23T06:27:47+5:30
काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे.
काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. एनएसयुआयच्या माध्यमातून युवकांची मोट बांधण्याचे काम करत त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. तरुणांना विश्वास देत त्यांनी केलेल्या कामामुळे ते पक्षात व तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. रजनी पटेल यांच्या तालमीत तयार झालेले गुरुदास सुरुवातीपासूनच ‘गुरु’ या नावाने लोकप्रिय होत गेले. या लोकप्रियतेनेच त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. मुंबईतला तरुण शिवसेनेसोबत असतानाच्या काळात ‘गुरु’नी तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक काम केले. त्यांचा हाच गुण दिल्लीकरांना भावला. राजीव गांधी यांनी त्यांच्यातले हे वेगळेपण हेरले आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर कामत यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पाचवेळा पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि मुंबईकरांनीही त्यांना निवडून दिले. आपल्या कामामुळे मुंबईत काँग्रेसचा चेहरा अशी त्यांची ओळख होत गेली. पक्षातल्या बड्या नेत्यांनी त्यांच्यावर कायम विश्वास टाकला. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जुळले. त्यामुळे दिल्लीच्या दरबारी राजकारणात ते चांगले रुळले. आजच्या काळात कोणता नेता कधी पक्ष बदलेल याचा काहीही नेम नसताना, गुरुदास यांनी पक्षासोबत टोकाची निष्ठा ठेवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिसायला अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्त्व आणि मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषांवरचे प्रभुत्व या जशा ‘गुरु’ च्या जमेच्या बाजू होत्या तशीच कोणत्याही राजकीय घटनेचे अचूक विश्लेषण करण्याची त्यांची स्वत:ची अनोखी शैली होती. त्यामुळे ते माध्यमांना कायम सोर्स म्हणून जवळचे वाटू लागले. त्यातून त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. पक्षानेही त्यांना भरभरून दिले. देशाचे गृहराज्यमंत्रीही केले. मात्र मागेल ते मिळत आहे हे पाहून त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद मिळावे असे वाटू लागले. मात्र त्यांना दुय्यम खाते देऊ केले गेले. त्याचा राग मनात धरून त्यांनी शपथविधीलाच जाणे टाळले. तेथून त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वावर काँग्रेसचे राजकारण चालते. प्रतीक्षा करण्याची चिकाटी जेवढी जास्त तेवढे फळ जास्त असा एकंदरीत माहोल. जो पक्षाशी निष्ठावान राहतो त्याची पक्षात उशिरा का होईना कदर होतेच. ‘गुरु’कडे पक्षाविषयी, पक्षाच्या नेत्यांविषयी अमाप श्रद्धा होती, मात्र अभाव सबुरीचा होता. त्यानेच त्यांचे राजकीय नुकसानही केले. जुळवून घेण्याची वृत्ती न जोपासल्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्या जाण्याने मुंबई काँग्रेसचा चेहरा नाहीसा झाला आहे.