कुलदीप नायर यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी झालेल्या निधनाने गेल्या संपूर्ण शतकाचा डोळस साक्षीदार राहिलेला वजनदार व स्वतंत्र वृत्तीचा पत्रकार देशाने गमावला आहे. देशातील बहुतेक सर्वच प्रमुख इंग्रजी दैनिकांमध्ये संपादक म्हणून सेवा बजावलेला आणि आपला स्तंभ १४ भाषांतील व अनेक देशातील ८० वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करणारा त्यांच्या तोडीचा दुसरा यशस्वी पत्रकार आज देशात दुसरा नाही. त्यांच्या नावावर असलेली १५ पुस्तकेही वाचकांना मार्गदर्शक ठरणारी व राजकीय नेत्यांना सदैव दिशा दाखविणारी ठरली आहेत. आज पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये जन्माला आलेले कुलदीप नायर फाळणीनंतर भारतात आले. इंग्लंडमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेऊन त्यांनी तब्बल १० वर्षे भारत सरकारच्या गृहमंत्रालयात त्याचे प्रवक्तेपण व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. परिणामी प्रशासन व मंत्रालय यांच्या कारभाराची त्यांना जवळून पाहणी करता आली. त्यातूनच त्यांना अतिशय गुंतागुंतीच्या व गूढ बातम्या मिळत राहिल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांशी निकटचे व विश्वासाचे संबंध असणारे नायर विचाराने डावे व समाजातील उपेक्षितांच्या वर्गाचे प्रवक्ते होते. शिवाय लोकशाही मूल्यांवर निष्ठा राखणारे पत्रकार म्हणून त्या मूल्यांवर आघात करणाºयांशी त्यांनी दरवेळी लढतही दिली. त्याचसाठी १९७५ च्या आणीबाणीत त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला. पं. नेहरू व त्यांचे अंतर्गत व आंतरराष्टÑीय धोरण यावर त्यांचे टीकास्त्र अखंड सुरू राहिले. त्यासाठी त्यांचे व त्यांच्या सुविद्य पत्नीचे मतभेदही होत राहिले. तरीही त्यांनी नेहरूंशी चांगले संबंध राखले. अगदी अलीकडे त्यांनी नरेंद्र मोदींवरही कठोर टीका केली. मात्र मोदींनीही त्यांच्याशी कधी वैर केले नाही. लोकशाहीसाठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व मतभिन्नता राखण्याचा अधिकार मोलाचा आहे असे मानणारे नायर सध्याच्या राजवटीत त्या दोहोंचाही होत असलेला संकोच व त्यात माध्यमांची होणारी गळचेपी यावर संतप्त होते. त्यांच्या दुर्दैवाने आजचे राजकीय वातावरणही त्यांच्या खुल्या पत्रकारितेला अनुकूल राहिले नव्हते. भूमिकांवर ठाम राहणारे आणि भूमिकांची किंमत मोजणारे पत्रकार व कार्यकर्ते यांना त्यांच्या स्वतंत्र असण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. ती नायर यांनी चुकविली. त्याचसाठी त्यांना एक्स्प्रेससारख्या दैनिकाचे संपादकपद सोडावे लागले. अनेक पुरस्कारांकडे पाठ फिरवावी लागली आणि अनेक मोठ्या सन्मानांना मुकावे लागले. मात्र खºया व प्रामाणिक विचारवंतांची दखल समाजाला आज ना उद्या घ्यावी लागते. नायर यांना यथाकाळ सरकारने राज्यसभेवर घेतले. त्यांची इंग्लंडच्या हायकमिश्नर पदावर नियुक्तीही सरकारने केली. कुलदीप नायर हे भारत व पाकिस्तान यांच्यातील स्नेहसंबंधांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्यातील संवाद व सौहार्द कायम राखण्यावर त्यांचा भर होता. त्याचसाठी दि. १४ आॅगस्टला, पाकिस्तानच्या स्थापनेच्या दिवशी व दि. १५ आॅगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंजाबातील अमृतसर जवळच्या बाघा सीमेवर जाऊन दोन्ही देशांच्या प्रतिमांचे पूजन करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. या देशातील वैर संपावे व त्यांच्यात स्नेहाचे संबंध कायम राहावे हा त्यांचा ध्यास अखेरपर्यंत कायम राहिला. त्यासाठी या दोन्ही देशातील कडव्या भूमिकावाल्यांचाही त्यांच्यावर राग राहिला. राजकारण्यांचा राग, कडव्या भूमिका घेणाºयांचा विरोध, पत्रकारांचे स्वातंत्र्य दडपून टाकणाºया मालकशाहीचा रोष आणि समाजातील गरीब व उपेक्षितांची बाजू घेतल्याने धनवंत उद्योगपतींचाही विरोध या साºयांना तोंड देऊनही कुलदीप नायर पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची उंची कायम राखत अखेरपर्यंत जगले. त्यांच्यावर टीका झाली. आरोप झाले, काहींनी त्यांच्यावर पाकधार्जिणेपणाचाही ठपका ठेवला पण नायर यांची प्रतिमा त्यामुळे कधी डागाळली नाही. ते अखेरपर्यंत ताठ मानेने व सरळ मनाने जगले. जगाचा निरोपही त्यांनी तसाच घेतला. त्यांची स्मृती वृत्तपत्रांच्या क्षेत्रात दीर्घकाळपर्यंत प्रेरणा व मार्गदर्शन देणारी राहील यात शंका नाही.
कुलदीप नायर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 6:22 AM