मिलिंद कुलकर्णीमालतीबाई नेहेते या कोरोना बाधित ८२ वर्षीय वृध्देला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचाराऐवजी दुर्देवी मरण येणे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. ‘देवदूत’ म्हणून ज्या वैद्यकीय-आरोग्य सेवेकडे पाहिले जाते, त्यांच्या योगदानाविषयी संपूर्ण देशाने थाळी वाजवून ऋण व्यक्त केले, त्यांनीच ‘यमदुता’ची भूमिका बजवावी, हे मोठे दुर्देव आहे.मूळ न्हावीच्या असलेल्या नेहेते कुटुंबियांवर कोरोना काळात दुर्देवी आघात झाले. मालतीबाई यांचे पूत्र व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी तुळशीराम यांना संसर्ग झाला. पाठोपाठ सून शीला यांनाही बाधा झाली. सुनेचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. १ जून रोजी मालतीबाई यांना त्रास होऊ लागल्याने भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जळगावच्या कोविड रुग्णालयात हलविले. २ जून रोजी त्या बेपत्ता झाल्याची माहिती नातू हर्षल यांना रुग्णालय प्रशासनाने कळविली. रोज विचारपूस करुनही व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने अखेर ६ रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार देण्यात आली. १० रोजी रुग्णलयातील स्वच्छतागृहात मालतीबार्इंचा मृतदेह आढळून आला. प्राण वाचावा, उपचार व्हावा, यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या मालतीबार्इंचा वैद्यकीय प्रशासनाच्या अनागोंदी, भोंगळ कारभाराने जीव घेतला. वॉर्डातील स्वच्छतागृहात ८ दिवस पडूनही कुणी त्यांचा शोध घेऊ नये? स्वच्छता गृह सफाईसाठीही उघडू नये, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नातू हर्षल आणि इतर नातेवाईकांनी पाठपुरावा केल्यामुळे मालतीबार्इंच्या दुर्देवी मृत्यूची घटना समोर तरी आली, अन्यथा असे किती जणांचे बळी तेथील दुरवस्था, दुर्लक्ष आणि बेपर्वाईने घेतले असतील याची मोजदाद न केलेली बरी.सामान्य माणसाचे जीवन किती स्वस्त झाले आहे, याचे हे जळजळीत उदाहरण आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ, अभ्यासू वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री असताना एका गरीब महिलेचा मृत्यू केवळ दुर्लक्षाने व्हावा, यापेक्षा संतापजनक गोष्ट दुसरी नाही. असे महाविद्यालय जळगावात असून फायदा काय, हा प्रश्न आता आम्हा जळगावकरांंना विचारावा लागणार आहे. कोरोनाच्या साथीपासून अडीच महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनात कोणतीही सुसूत्रता, समन्वय आढळून आलेला नाही. प्रत्येक विभाग आणि अधिकाऱ्याचा अहंकार, पद आणि प्रतिष्ठेचा गर्व हेच आम्ही पाहत आलो. अनेक गंभीर प्रकार होऊनदेखील ते दडपण्याकडे कल राहिला. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती आणि दहशतीचे वातावरण असल्याने कोणीही कोविड रुग्णालयाकडे फिरकत नाही. त्यामुळे चार भिंतीच्या आड जे काही घडत आहे, ते बाहेर येत नाही. प्रशासन जी माहिती देते, तीच प्रसारमाध्यमे आणि जनता खरी मानत आहे. पण वास्तव फारच भीषण आहे. रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: वॉर्डात जाऊन सेवा करीत आहेत. रुग्णाची तपासणीदेखील केली जात नाही, अंगावर औषधी दुरुनच फेकली जातात, तेथील खाटांवरील चादरी बदलल्या जात नाही, स्वच्छतागृह दुर्गंधीपूर्ण आहेत, शिवभोजन थाळी बळजबरी दिली जात आहे, अशा अनेक तक्रारी आहेत. काही अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान असे प्रकार आढळून आले, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही घटना उघडकीस आणल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत चित्रफितीद्वारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलादी भिंतीमागील भीषण सत्य जगासमोर आणले.कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘योध्दा’ म्हणून ज्यांचा अभिमान संपूर्ण समाजाला आहे, त्यांच्याच पेशातील काही जण अशा कृत्यांद्वारे काळीमा फासत आहे.मायबाप सरकारने देखील जळगाव वा-यावर सोडलेले आहे. आरोग्यमंत्री एकदा येऊन गेले. पण त्यांनंतरदेखील ना मृत्यूचा दर कमी झाला, ना रुग्णांची आबाळ थांबली. निलंबित झालेल्या अधिष्ठात्यांची बदली होऊनही ती मागे रद्द झाली. कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकारण कसे चालते, याचा उबग आणणारा अनुभव जनता घेत आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते अशा घटनेला सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र म्हणते, तर विरोधी पक्षाने सरकारच्या कुचकामी कारभारावर टीका करण्याची अमूल्य संधी मिळविली. मालतीबार्इंसारखे अनेक जीव हकनाक बळी जात आहे. ना त्यांना सत्तेचे राजकारण कळते, ना खुर्च्यांमधील अहंकार आणि हेवेदावे कळतात..आपल्या नशिबाचे भोग म्हणून मुकेपणाने मरण स्विकारत आहेत. देवा, या सगळ्यांना सद्बुध्दी दे, एवढेच मागणे आता जनतेच्या हाती उरले आहे.
इथे ओशाळली माणुसकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 2:32 PM