भारतात मानवी जीवन कसे कवडीमोल आहे, याची प्रचिती आणून देणाºया तीन दुर्घटना गत तीन दिवसात घडल्या. रविवारी हिमाचल प्रदेशमध्ये एका ढाब्याची इमारत कोसळून १३ सैनिकांसह एकूण १४ जणांचे प्राण गेले. त्याच दिवशी गुजरातमध्ये एका अॅम्युजमेंट पार्कमधील एक झुला तुटल्याने दोन जणांना जीव गमवावा लागला, तर इतर ३० जण जखमी झाले. या घटनांच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच, मुंबईतील डोंगरी भागात मंगळवारी एक इमारत कोसळून १३ जण ठार, तर दहा जण जखमी झाले. मुंबईतील डोंगरी भागातील इमारत जुनी असल्याने कोसळली असे एकदाचे म्हणता येईल; पण हिमाचल प्रदेशमधील ढाब्याच्या इमारतीचे बांधकाम तर २००९ मध्ये म्हणजे अवघ्या दहा वर्षांपूर्वी झाले होते आणि काही दिवसांपूर्वीच त्या इमारतीवर आणखी एक मजला चढविण्यात आला होता. मुंबईलगतच्या ठाणे शहरात २०१३ मध्ये लकी कंपाऊंड नामक इमारत कोसळून तब्बल ७६ जण ठार झाले होते, तर ६४ जण जखमी झाले होते. ती इमारत तर निर्माणाधीन असतानाच कोसळली होती. भारतात केवळ जुन्याच इमारती धोकादायक आहेत असे नव्हे, तर नव्याने बांधलेल्या इमारतीही कोसळू शकतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात एखादी तरी जुनी इमारत कोसळतेच! किमान गुंतवणुकीतून, कमीत कमी कालावधीत, कमीत कमी श्रम करून, जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या हव्यासामुळे वेळ पडल्यास मानवी जीवन क:पदार्थ समजण्याच्या प्रवृत्तीने भारतात मूळ धरले आहे. ती प्रवृत्तीच अशा अपघातांसाठी कारणीभूत ठरते. बहुतांश विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना तर पैशाचा हव्यास आहेच; पण या व्यवसायाच्या नियमनाची जबाबदारी ज्या यंत्रणांकडे आहे, त्या यंत्रणांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाºयांनाही झटपट पैसा कमावण्याचे व्यसन जडले आहे. शिवाय आयजीच्या जीवावर उदार होणारे बायजी म्हणजे राजकारणीही मलिदा ओरपण्यासाठी एका पायावर तयार असतातच! त्यामुळे सुरक्षा विषयक मानके किंवा नियम, कायदे कितीही कडक केले तरी त्यांना ठेंगा दाखवून अवैध बांधकामे केली जातात. त्यातूनच मग लकी कंपाऊडसारख्या दुर्घटना घडतात. हिमाचल प्रदेशमधील दुर्घटनेमागेही प्रथमदर्शनी तेच कारण दिसते. अलीकडेच त्या इमारतीवर एक मजला चढविण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, इमारतीचा मूळ ढाचा आणखी एका मजल्याचा भार पेलवण्याइतपत मजबूत होता का इत्यादी तपशील अद्याप समोर आलेले नाहीत; मात्र इमारत कोसळण्यामागे तीच कारणे असण्याची दाट शक्यता आहे. नव्या इमारती कोसळण्यामागे प्रामुख्याने निकृष्ट दर्जाचे अथवा इमारतीच्या ढाच्याच्या क्षमतेचा विचार न करता केलेले अतिरिक्त बांधकाम ही कारणे आहेत, तर मुंबईतील जुन्या इमारती कोसळण्यामागे वेगळीच कारणे आहेत. राहते घर सोडून जायचे कोठे, या विवंचनेतून रहिवाशांद्वारा इमारतीच्या पुनर्विकासाला होणारा विरोध हे त्यामधील प्रमुख कारण आहे. अर्थात त्यासाठी केवळ रहिवाशांनाच दोष देता येणार नाही. इमारतींचा पुनर्विकास करायचा म्हटले की, त्या इमारतीमधील रहिवाशांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवले जाते. अनेकदा हे कॅम्प मूळ इमारतीपासून खूप दूरवर असतात. त्यामुळे रहिवाशांचे आयुष्यच प्रभावित होते. त्यामुळे ते पुनर्विकासास हिरवी झेंडी देण्यास नाखूश असतात. पुन्हा नव्या इमारतीचे बांधकाम केव्हा पूर्ण होईल, झाल्यावर आपल्याला नव्या इमारतीत जागा मिळेल की नाही, अशा नाना शंका रहिवाशांच्या मनात असतात. ट्रान्झिट कॅम्पमध्ये गत एक-दोन दशकांपासून राहत असलेल्या अनेकांना अद्यापही त्यांच्या पुनर्विकास झालेल्या मूळ इमारतीमध्ये परतणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आपल्यासोबतही तसेच झाल्यास काय घ्या, या आशंकेपोटीही रहिवाशी धोकादायक इमारतींमध्येच राहणे पसंत करतात; पण ट्रान्झिट कॅम्पमध्ये बिºहाड हलवायला तयार होत नाहीत. शिवाय इमारतींचा पुनर्विकास हे प्रकरण वरकरणी दिसते तेवढे सोपे नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत आणि त्यामधील एक महत्त्वाचा कंगोरा भ्रष्टाचाराचा आहे. या कंगोºयामुळे जुन्या इमारतींमधील रहिवाशांच्या मनात पुनर्विकासासंदर्भात सतत एक प्रकारची धास्ती असते. त्यातून धोकादायक अवस्थेत पोहचलेल्या अनेक इमारतींमध्ये रहिवाशी राहत असतात आणि मग एके दिवशी डोंगरीसारखी दुर्घटना घडते. पारदर्शक नियम व कायद्यांचा अभाव आणि आहेत त्या नियम, कायद्यांची थोडक्या वैयक्तिक लाभासाठी पायमल्ली करण्याची तयारी, याच बाबी हिमाचल प्रदेश, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या दुर्घटनांसाठी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघतो. ही परिस्थिती बदलायची असेल, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असे वाटत असेल, तर सरकारलाच पुढाकार घेऊन कठोर नियम व कायदे लागू करावे लागतील आणि त्यांचा भंग करणाºयांना किमान कालावधीत कठोर शिक्षा होईल याची खातरजमा करावी लागेल. कायदा आपले काहीही बिघडवू शकत नाही याची खात्री वाटत असल्यानेच मुजोरी अंगात भिनते आणि वैयक्तिक लाभासाठी मानवी जीवन कवडीमोल समजण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. ही प्रवृत्ती ठेचल्याशिवाय हिमाचल प्रदेश, अहमदाबाद, मुंबईसारख्या दुर्घटनांची मालिका खंडित होणार नाही!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com