स्पर्धेच्या या जगात प्रत्येकाला पळण्याशिवाय आणि वेगवेगळी अनेक स्किल्स शिकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कोणत्याही एकाच क्षेत्रात वाकबगार असूनही आजकाल चालत नाही. ज्यांना अनेक क्षेत्रात गती आहे, एकाच वेळी अनेक क्षेत्रात जे संचार करू शकतात आणि एकाच कामासाठी आपल्याला अवगत असलेल्या अनेक क्षेत्रांचा उपयोग करू शकतात, त्यांनाच पुढील काळात भवितव्य असणार आहे. त्यामुळेच आज अनेकजण वैविध्यपूर्ण गोष्टींचं शिक्षण घेत असतात. तरीही ते पुरेसं नाही. कारण आता बरीच कामं मशीनच आणि तेही अत्यंत कुशलपणे करीत आहे. त्यांच्यातील अचूकता माणसाला साधता येणं जवळपास अशक्य आहे.
मशीनच्या पुढची पायरी आता आपल्याला दिसते आहे. ती म्हणजे रोबोट्स. या रोबोट्सचा झपाटा तर इतका अचंबित आणि थक्क करणारा आहे, की सगळ्याच गोष्टींवर त्यांनी आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. घरकामापासून ते वैद्यकीय क्षेत्र, किचकट ऑपरेशन्स, पोलीसगिरी, एवढंच काय, कंपन्यांच्या सीइओपदीही आता रोबोट्सची नियुक्ती होऊ लागली आहे. त्यामुळे या रोबोट्सची सध्या फारच चलती आहे. हे रोबोट्स माणसांप्रमाणे वागायला, हालचाल करायला, संवाद साधायला, इतकंच काय, समोरच्या व्यक्तीच्या मनात आता काय चाललंय हेदेखील ओळखायला लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या माणसांना पर्याय म्हणून रोबोट्सचा सर्रास वापर व्हायला लागला आहे. त्यातही ह्युमनाइड रोबोट्सला अनेकजण पसंती देत आहेत. माणसांप्रमाणे दिसणारे, वागणारे, माणसांपेक्षा कितीतरी जास्त झपाटा आणि 'बुद्धिमत्ता असणारे हे रोबोट्स आता भविष्य काळाची गरज असणार आहेत. त्याची चुणूक आता पावलोपावली दिसू लागली आहे. त्याचंच एक ताजं उदाहरण नुकतंच ब्रिटनमध्ये पाहायला मिळालं.
ब्रिटिश पार्लमेंटच्या लॉ ऑफ हाऊसमध्ये ऐ-दा या ह्यूमनाइड रोबोटनं नुकतंच भाषण केलं. ऐदा ही एक महिला ह्युमनाइड रोबोट आहे. एका आधुनिक महिलेचं रूप या रोबोटला देण्यात आलं आहे. ब्रिटिश गणितज्ञ डा लवलेस यांच्या नावावरून तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधली (Artificial Intelligence) पहिली दोन अद्याक्षरं AI आणि एडा मधील DA ही दोन अक्षरं घेऊन AIDA (ऐ-दा) असं तिचं नामकरण करण्यात आलं आहे.
पण महत्त्वाची गोष्ट वेगळीच आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिल्यांदाच AI-DAचं भाषण होणार होतं. अनेक प्रश्नांना ती उत्तरंही देणार होती. संसदेचे मोठमोठे, नामांकित सदस्य या उपक्रमासाठी हजर होते. सर्वांनाच या संभाषणाची उत्सुकता होती. संभाषणाला सुरुवातही झाली. पण बोलता बोलता ती अचानक झोपून गेली! तिचे डोळे एकदम विचित्र दिसायला लागले. सगळीकडे एकदम सन्नाटा पसरला. असं एकदम अचानक काय झालं? प्रमुख वक्ता बोलता बोलता अचानक झोपून कशी काय गेली? तांत्रिक बिघाडामुळे असं झालं होतं. AI-DA चे निर्माता एडन मेलर तातडीनं पुढे आले. त्यांनी तिला 'रिबुट' केलं आणि ती परत 'माणसात आली व बोलायला लागली. अनेक प्रश्नांची सफाईनं उत्तरंही तिनं दिलं. पण तत्पूर्वी मेलर यांना तिला गॉगल घालावा लागला. कारण या प्रकरणानंतर तिचे डोळे भयानक दिसायला लागले होते, अधूनमधून आपला चेहराही ती कसनुसा करीत होती.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कला क्षेत्र धोक्यातआर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे कला आणि इतर क्रिएटिव्ह क्षेत्रांना येत्या काळात मोठा धोका निर्माण होईल का, असं विचारल्यावर AI-DAनं सांगितलं, येत्या काळात कलेच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होईल आणि त्याची तयारी सगळ्यांनीच ठेवली पाहिजे.
थोडंसं भीतीदायकच वाटत होतं ते. ते तसं वाटू नये, त्याची तीव्रता कमी व्हावी आणि ती 'नॉर्मल' वाटावी यासाठी मेलर यांनी तिला गॉगल घातला होता. या घटनेवरून जगात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, रोबोट्स कितीही हुशारीनं आणि माणसाच्या कैक पटीनं वेगात, अचूक काम करू शकत असले तरी शेवटी 'तिन्ही लोकी मानवच श्रेष्ठ' आहे! AI-DA पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली, जेव्हा दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या सत्तराव्या वाढदिवशी तिनं त्यांचं पेंटिंग तयार केलं होतं. या पेंटिंगवरून तिची बरीच वाखाणणीही झाली होती. ड्रॉइंग, पेंटिंग आणि शिल्प या तिन्ही प्रकरांत AI-DA निष्णात आहे. AFDA नं सांगितलं, तिच्या डोळ्यांना लावलेले कॅमेरे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक आर्म्स यांच्या मदतीनं ती कॅनव्हासवर सुंदर चित्रं काढू शकते. चित्र काढण्याबाबत तिचा स्वतःचा काहीही अनुभव नसल्यामुळे कॉम्प्युटर प्रोग्राम आणि अल्गोरिदम यांचा सहारा ती घेते.