पर्यावरणाच्या रक्षणासाठी जी-७ देशांच्या प्रमुखांची जी बैठक झाली तिला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येऊनही हजर राहिले नाहीत. अमेरिकेतल्या दक्षिणेकडील सगळे डोंगर व जंगले महिनोन्महिने जळत असताना आणि ते मानवी जीवनाला व अनेक शहरांना हानी पोहोचविण्याची भीती असतानाही ट्रम्प यांना त्याची फारशी पर्वा नाही.
पर्यावरणाचे रक्षण करायचे तर ते बिघडविणारी द्रव्ये व वायू वातावरणात न सोडणे आवश्यक आहे. तसे करायचे तर देशातील अनेक उद्योग बंद करावे लागतात किंवा त्यांच्या उत्पादनावर नियंत्रणे आणावी लागतात. ट्रम्प यांची ती तयारी नाही. पर्यावरण बिघडले, प्राणवायूचे प्रमाण घटले, त्यामुळे मुले व माणसे आजारी पडली तरी त्याची त्यांना फिकीर नाही. त्यांचे उद्योग व कारखानदारी चालू राहणे आणि अमेरिकेच्या संपत्तीत भर पडणे हीच बाब त्यांना महत्त्वाची वाटते. मानवी आनंद आणि श्रीमंती यात अंतर आहे व आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. या सत्याचा विचार न करणारी बेमुर्वतखोर माणसे एकाच वेळी निसर्गाचे आणि मानवजातीचेही वैर करीत असतात. तसाही अमेरिका हा जगात सर्वाधिक प्रदूषण वाढविणारा देश आहे. फार पूर्वी रिओ-डी-जानिरोला जागतिक पर्यावरण परिषद भरली असताना तीत बोलताना भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव म्हणाले, ‘ज्या देशांनी जगाचे पर्यावरण सर्वाधिक बिघडविले त्यांनीच ते दुरुस्त करण्याचा सर्वाधिक भार उचलला पाहिजे.’ त्यांचा रोख अर्थातच अमेरिका व पाश्चात्त्य औद्योगिक देश यांच्यावर होता. पर्यावरण शुद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ते शुद्धही होऊ शकते. बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी हे जगाला करून दाखविले. पिट्सबर्ग हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर होते. कोळसा, लोखंड, अॅल्युमिनियम इत्यादीच्या खाणींचे ते शहर सहा लक्ष लोकसंख्येचे होते. दुसऱ्या महायुद्धात तेथील खाणींनीच अमेरिकेची संरक्षण यंत्रणा उभी केली. पण त्या प्रयत्नात ते शहर एवढे प्रदूषित झाले की त्याची लोकसंख्या अवघी सहा हजारांवर आली. ओबामा यांनी त्याच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले.
पुढे त्या शहरात त्यांनी जागतिक पर्यावरण परिषदच भरविली. तेव्हा पिट्सबर्ग पुन्हा सहा लक्ष लोकवस्तीचे झाले होते. त्यात बागा, हिरवळ व फुलझाडे यांची रेलचेल होती. रस्त्याच्या कडेने असणाºया हिरवळीवर ससे बागडताना तेथे पाहता येणारे होते. हे साºया जगाला करता येणारे आहे. भारतातही सर्वाधिक प्रदूषित शहरे व वस्त्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर हे असेच प्रदूषित शहर म्हणून जगाला ज्ञात आहे. त्यातल्या खाणी, कारखाने, विद्युत मंडळे व उद्योग सतत धूर सोडणारे व प्रदूषण वाढविणारे आहेत. अल्पवयीन मुले तेथे श्वसनाच्या आजाराने बेजार आहेत. पण त्याच्या शुद्धीसाठी शासकीय स्तरावर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. खासगी संस्थांचे प्रयत्नही अपुरे आहेत. नियतीने दिलेले आरोग्याचे वरदान आम्हाला सांभाळता येऊ नये याहून आपली दुर्बलता दुसरी कोणती असू शकेल? आजचे पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात, जगात माणूस आणि निसर्ग यांचे युद्ध सुरू झाले आहे. त्यात माणूस शस्त्रधारी तर निसर्ग नि:शस्त्र आहे. त्याचे परिणाम आपण आज साºया जगात पाहत आहोत. दोन्ही धृवांवरचे बर्फ वितळले आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावली आहे, त्याच्या काठावरची शहरे पाण्याखाली जात आहेत. जगाचे तापमान उंचावले आहे आणि ऋतूंनीही त्यांचे नियम बदललेले दिसत आहेत.
आज आपण त्याविषयी बेफिकीर आहोत. पण निसर्गाचे संकट महामारीसारखे येते आणि त्याला कोणतीही मर्यादा असत नाही. त्याची वाट न पाहता त्यापासूनच्या संरक्षणाची सिद्धता करणे हाच जग आणि मानव जात यांना वाचविण्याचा खरा मार्ग आहे. त्याचा अवलंब करणे हे जगासाठीच नव्हे तर आपल्यासाठीही अधिक आवश्यक व उपयोगाचे आहे. हे जग मागल्या पिढ्यांनी आपल्याला असे दिले असले तरी पुढच्या पिढ्यांसाठी ते चांगले राखणे ही आपली जबाबदारीही आहे. जगातील काही देश व समाज याबाबत अधिक जागृत आहेत. डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड यासारखे देश व जपान हे जगातील सर्वाधिक पर्यावरणशुद्ध देश मानले जातात. त्यांचा आदर्श आता साºया जगानेच घेण्याची व आपले भविष्य सुरक्षित करण्याची गरज आहे.