देशातील चारचाकी मोटारगाड्यांच्या उत्पादकांनी एकत्र येऊन या गाड्यांचा खप चाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचे जाहीर केले आहे. मारुती उद्योगासारख्या पहिल्या क्रमांकाच्या उद्योगाने आपले अनेक प्रकल्प बंद केले आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी उच्चपदस्थ माणसे कशा विनोदी भूमिका घेतात आणि कसली बालिश वक्तव्ये जारी करतात याचा अतिशय हास्यास्पद नमुना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे केला आहे. देशातील चारचाकी मोटारगाड्यांच्या उत्पादकांनी एकत्र येऊन या गाड्यांचा खप चाळीस टक्क्यांनी कमी झाल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर मारुती उद्योगासारख्या पहिल्या क्रमांकाच्या उद्योगाने आपले अनेक प्रकल्प बंद केले आहेत. या क्षेत्रात काम करणारे अभियंते व कामगार यांची संख्या १० लाखांनी कमी होणार असल्याची व या साऱ्यांना घरी बसायला लावण्याची तयारी त्यांच्या उद्योगपतींनी चालविली आहे. मोटारगाड्यांच्या खपात आलेल्या या मंदीचे कारण सांगताना सीतारामन यांनी त्यासाठी ओला व उबेर या सहजगत्या भाड्याने मिळणाºया मोटारगाड्यांना दोषी ठरविले आहे. ओला व उबेर यांचा प्रसार साºया देशात अजून व्हायचा आहे, मात्र मोटारगाड्यांचा खप सर्वत्रच कमी झाला आहे.सीतारामन यांचा अर्थविचार खरा मानला तरी त्यामुळे दुचाकी मोटार वाहनांचे खप तेवढेच कमी का झाले याचे उत्तर मिळत नाही. देशात होंडा या मोटारसायकलचे दरवर्षी ४० लाखांचे उत्पादन होते, तर बजाजचे उत्पादन ३५ लाखांपर्यंत जाते. याही क्षेत्रात २५ टक्क्यांएवढी मंदी आली आहे. तिचा ओला वा उबेरशी काहीएक संबंध नाही. देशाचे सारे अर्थकारणच घसरणीला लागले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर असलेला देश आता सातव्या क्रमांकावर आला आहे. त्यात येणारी विदेशी गुंतवणूक थांबली आहे, शिवाय अगोदर ज्यांनी अशी गुंतवणूक केली त्या कंपन्यांनी त्यांचे दीड लक्ष कोटी डॉलर्स देशातून काढून घेतले आहेत. नवी गुंतवणूक येत नाही आणि जुनी कमी होत जाते तेव्हा देशाला मंदीच्या दिशेने जाण्याखेरीज दुसरा पर्याय उरत नाही. केवळ मोटारींचाच बाजार बसला असे नाही. मोटारसायकली, वस्त्र प्रावरणे, दागिने, शोभेच्या वस्तू, फळफळावळे या साऱ्यांचीही खरेदी कमी झाली आहे. बाजार ओस पडत आहेत आणि त्यात नव्याने उभे राहिलेले प्रचंड मॉल्स रिकामे दिसू लागले आहेत.ज्या एका गोष्टीची विक्री सध्या वाढली आहे ती गोष्ट औषधे ही आहे. साथींचे आजार व रोगराई वाढल्याने दवाखान्यातील व फार्मसीतील गर्दीच तेवढी वाढलेली दिसली आहे. कोणतीही वस्तू दर दिवशी आपले भाव वाढविताना दिसते व कालपर्यंत विकत घेता येणाºया वस्तू आजच हाताबाहेर जाताना लोकांना दिसत आहेत. धान्य महागले आहे. चांगल्या प्रतीचे धान्य मध्यमवर्गीयांनासुद्धा न परवडणारे झाले आहे. देशातील ५०० बड्या कंपन्यांपैकी ३५० कंपन्यांनी आपण तोट्यात व्यवहार करीत असल्याचे जाहीर केले आहे. विमान कंपन्या बुडाल्या, बँकाही बुडीतखाती चालत आहेत. जेथे पैसा खेळावा तेथे तो दिसेनासा होऊ लागला आहे. देशात ७ कोटी ६० लक्ष बेकार लोक असल्याचे सरकारचेच सांगणे आहे. या संख्येत कामावरून कमी केल्या जाणाºया लोकांची आता मोठी भर पडते आहे. देशाला निश्चित आर्थिक धोरण नाही आणि त्याचे अर्थविषयक निर्णय तत्कालिक पातळीवर घेतले जात आहेत असेच सध्याचे अर्थकारणाचे चित्र आहे. या साºयांना ओला आणि उबेर या गोष्टी जबाबदार आहेत असे कुणी म्हणत असेल तर त्याची गणना कशात करावी हाच जाणकारांना पडणारा प्रश्न आहे. अभियंत्यांना नोकºया मिळत नाहीत म्हणून त्यांची महाविद्यालये बंद पडत आहेत. शिवाय देशी अभियंत्यांना विदेशात मिळणाºया नोकºयाही दिवसेंदिवस कमी होत आहेत. २०१२ पासून आतापर्यंत देशातील एकाही विद्यापीठाचा समावेश जगातील पहिल्या क्रमांकाच्या ३०० विद्यापीठांत होऊ शकला नाही ही आपल्या शिक्षण खात्याचीही विटंबना सांगणारी बाब आहे. देशातील सर्वच प्रकारचे शिक्षण देणाºया विद्यापीठांची ही अवस्था आहे. केवळ एकादशीच्या दिवशी अमेरिकेने आपले चांद्रयान अवकाशात उडविले व त्याचमुळे ते यशस्वी झाले, उलट भारताने एकादशीचा दिवस न निवडल्याने आपले यान तसे उतरले नाही, असे सांगणारे जगत्गुरू देशात उभे होणे ही या एकूण अपयशाची परिणती मानली पाहिजे.
खरंच...! वाहन उद्योगातील मंदीला ओला आणि उबेर जबाबदार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:50 AM