धर्मराज हल्लाळेवृत्तसंपादक, लोकमत, लातूर
लहान-मोठ्या शहरांच्या आधाराने आपले भविष्य घडेल, या आशेने ग्रामीण तरुणांचे घोळके शिकायला आले आहेत. यांची जबाबदारी कोण घेणार?
कोरोना ओसरला अन् लातूर, नांदेड असो की, पुणे-मुंबई विद्यार्थ्यांची गर्दी ओसंडून वाहू लागली. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस इथपासून ते अधिकारी होण्याची मनीषा बाळगणारे लाखो तरुण विद्यार्थी गाव सोडून सध्या शहरांकडे आले आहेत. ज्यांची परिस्थिती जेमतेम ते तालुक्याला अन् जिल्ह्याला थांबले आहेत. ज्यांच्या घरात आहेत. कोरोना ओसरताच महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, खासगी शिकवण्यांचा परिसर गजबजला आहे. या विद्यार्थ्यांच्या अडचणी अनंत आहेत. त्यात भुकेचाही प्रश्न निर्माण व्हावा, ही मोठी शोकांतिका आहे.
लातूरमध्ये काही खाणावळ चालकांनी महागाईचे कारण पुढे करून अलीकडेच एका दिवसासाठी विद्यार्थ्यांना उपवास घडवला. त्यामुळे कोणत्याही संघटनेच्या पाठबळाशिवाय शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. कोणतेही आवाहन नव्हते. संघटनेचा फलक नव्हता. नेता नव्हता. बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, सेट- नेट तयारी करणारे, ग्रामीण भागातील होते. लातूर हे नीट वेळच्या जेवणाची अडचण आहे.... आणि जेईईच्या तयारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी येणारा विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने मध्यम वर्गातील आहे. तुलनेने नीट, जेईई तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना सुविधा पुरवितात. मात्र, आर्थिक पाठबळ, ते महानगरांकडे वळले धर्मराज हल्लाळे वर्षानुवर्षे भरती न झालेला, पोलीस शिपाईपदासाठी रस्त्यावर भल्या पहाटे धावणारा मोठा वर्ग आहे.
केंद्रीय अथवा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होणे दूर, तलाठी, ग्रामसेवक जी मिळेल परीक्षा आणि मिळेल ती नोकरी करण्यासाठीच्या परीक्षेसाठी धडपडणारा विद्यार्थी वर्ग प्रत्येक लहान-मोठ्या शहरात आहे. जणू त्यांचेच प्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाची सवय नसल्याने अवघ्या काही मिनिटांत पोलिसांच्या आवाहनाला दाद देत विद्यार्थी आपापल्या खोल्याकडे निघूनही गेले. त्यांतील काही तरुण सांगत होते, आमचा कोणताही राजकीय हेतू नाही, पाठीशी कोणती संघटना नाही, आम्ही भुकेने व्याकुळ होऊन एकत्र जमलो आहोत. दरवाढ गगनाला भिडली आहे. खोल्यांचे भाडे वाढले. दोन वेळच्या जेवणाची अडचण आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत भरतीसाठी आलेले तरुणही रस्त्याच्या कडेला झोपले होते. यावर सत्ताधारी, विरोधकांचे राजकारण होत राहील. समाज म्हणून प्रत्येकजण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणार आहे की नाही? पोलीस भरतीसाठी धावणारा तरुण सहा महिन्यांपूर्वी कोविड उपचार केंद्रात सेवा देत होता. पदवीधर असल्याने त्याला कंत्राटी नोकरी मिळाली होती. कोरोना ओसरला आणि नोकरीही संपली. आता जिथे-तिथे कंत्राटी नोकरी आहे, तिथेसुद्धा चिकटण्यासाठी रस्सीखेच आहे. वेतन कितीही मिळो, मात्र टिकून राहण्याची धडपड सुरू आहे, ती भविष्यात हीच नोकरी कायम होईल, या आशेवर. त्यात काहीजणांचे कंत्राट संपले आणि सेवाही थांबली आहे.
परवा जे लातुरात घडले आहे. त्यामागची अस्वस्थता प्रत्येक शहरातील तरुण विद्यार्थ्यांची आहे. खाणावळ, खोलीभाडे, अभ्यासिका, खासगी शिकवणी वर्गाचे शुल्क देताना गणित कोलमडत आहे. अर्धावेळ काम करुन काहींची शिकवणीची धडपड सुरू आहे.
निर्व्यसनी, प्रामाणिक, कमवा शिका धर्तीवर पुढे जाणारे तरुण सभोवताली दिसले तर त्यांना समाज म्हणून आपण काही आधार देणार की नाही? प्रत्येक प्रश्न सरकार सोडवील, ही एक अंधश्रद्धाच आहे.
म्हणूनच गुणवान विद्यार्थ्यांची समाजाने दखल घ्यायला हवी. मी, माझे कुटुंब आणि माझी मुले याच्या पलीकडे जाण्याची वृत्ती किमान ऐपतदारांनी जमेल तितकी दाखवावी, अन्यथा सरकारलाच नव्हे, तुम्हा-आम्हालाहीपळता भुई थोडी होईल..।