विकास झाडे । संपादक, लोकमत, दिल्ली
एकापाठोपाठ एक संकटांची मालिकाच सुरू व्हावी व आपल्या सभोवातालचे जग त्या संघर्षासाठी तयार व्हावे, अशीच काहीशी परिस्थिती आपल्यासमोर आहे. आरोग्य आणीबाणीपासून ते तुफानी चक्रीवादळाचा सामना आपण करतआहोत. जानेवारीपासून आतापर्यंत देशात विविध ठिकाणी भूकंपाचे एकूण ८९ धक्के बसले. यातील भूकंपाची तीव्रता रिश्टर प्रमाणावर अधिकाधिक ४ पर्यंत होती. तशी ही तीव्रता सौम्य म्हणता येईल. भूकंपाच्या सर्वाधिक धक्क्याचे केंद्रबिंदू हरियाणा आहे. दर धक्क्यागणिक दिल्ली-एनसीआर हादरत होते.
रहिवाशांच्या मनातील भीती अजूनच गडद होत होती. अभ्यासकदेखील या भूकंपाच्या छोट्या धक्क्यांचा अभ्यास करत असून, अद्याप ठोस निष्कर्षाप्रत आलेले नाहीत.जानेवारी २००१मध्ये गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपाची नोंद रिश्टर प्रमाणावर ७.७ एवढी होती. या भूकंपात २० हजार लोकांचा करुण अंत झाला. वित्तहानी अतोनात झाली. त्याआधी १९९३ मध्ये लातूरच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर प्रमाणावर ६.२ होती. यात ९५०० जणांचा मृत्यू झाला. हेच चित्र डोळ्यांसमोर उभे असताना दिल्लीला दर आठवड्याला हादरविणाऱ्या भूकंपाने रौद्ररूप धारण केले तर किती भयावह स्थिती होईल, याची कल्पना न केलेलीच बरी! भूकंप हीसुद्धा नैसर्गिक आपत्तीच आहे. भूगर्भातील हालचालींमुळे कंपने निर्माण होतात आणि जमिनीवर त्याचे हादरे बसतात. भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे आहे, त्याची तीव्रता किती आहे यावर सारे काही अवलंबून असते. ही आपत्तीही थोपविणे मानवाला शक्य नाही. जपानसारख्या प्रगत राष्ट्राने यातून धडा घेतला. सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रात असूनही जपानने स्वत:ला भूकंपाचा सामना करण्यासाठी तयार केले. भूकंपप्रवण बांधकामाचे तंत्रज्ञान विकसित केले. अनिर्बंध बांधकाम रोखले. तशी कठोर धोरणे आखलीत, त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे सुरू आहे तसे चित्र इथे नाही.
परवा ‘निसर्ग’ चक्रीवादळातून मुंबई थोडक्यात बचावली. संपूर्ण राज्य श्वास रोखून होते; परंतु हे संकट टळले नाही. आजचे मरण उद्यावर गेले एवढेच. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते २४० किलोमीटर तास वेगाने हे चक्रीवादळ पुन्हा धडकू शकते. असे झाल्यास मुंबईचे चित्र डोळ्यांपुढे आणा, मुंबई कशी असेल? ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असे म्हणणारे पुन्हा येतील किंवा नाही, याबाबत खात्री नसली तरी हे चक्रीवादळ नक्की येणार आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगभर पाच जूनला ‘जागतिक पर्यावरणदिन’ साजरा झाला. आपण धडा घेतला त्यातून? निसर्गाचे अतोनात दोहन करताना आपण सावध राहिलो नाही. राजकीय धोरणांमधील फोलपणाही समोर आला. ‘विकास की पर्यावरणरक्षण की पर्यावरण रक्षणातून विकास...’ याची घडी अद्याप बसलेली नाही. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली यूपीए सरकारने समिती नेमली होती. हा अहवाल विकासविरोधी असल्याचा नारा देत बासनात टाकला. पश्चिम घाट , सह्याद्री पर्वतरांगांमुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे थैमान रोखले गेले. हाच सह्याद्री, पश्चिम घाट आपण बोडका करायला निघालो आहोत.
जगभरातील महत्त्वाच्या पर्यावरणदृष्ट्या हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश होतो. गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकपासून ते थेट केरळपर्यंत पसरलेला पश्चिम घाट हा जैविक वैविध्याची मोठी खाण आहे. असंख्य मौलिक वनस्पती, प्राणी आणि कीटकांच्या प्रजाती येथे आढळतात. पृथ्वीवर अधिकाराची भावना व त्यातली नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्यासाठीच आहे; ही अप्पलपोटेपणाची भावना मानवाची वाढली. त्यामुळे निसर्गाची झालेली वाताहत पाहतोच आहोत!
अस्मानी व सुलतानी संकट एकाचवेळी देशावर आल्याची ही पहिलीच वेळ असावी! कोरोनाच्या निमित्ताने झालेल्या टाळेबंदीत कोट्यवधी लोकांचा रोजगार हिरावला आहे. ४० कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींचे वेतन अर्ध्यावर आले आहे. कुटुंबाला कसे सांभाळायचे, या विवंचनेतून अनेकांनी आत्महत्या केली. सरकारला त्याचे दु:ख नाही. लोकांपुढे मोठमोठे आकडे मांडून त्यांची दिशाभूल केली. वर्षपूर्तीचा आलेख मांडताना देशातील किती लोक उपाशी मेलेत, किती लोकांच्या नोकºया गेल्या हे सांगण्याचे धाडस सरकारमध्ये नव्हते. २० लाख कोटींच्या मायावी पॅकेजचा देशातील किती लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ मिळाला आहे? उद्योगांना थेट मदत करून कामगारांना नोकरीतून काढू नका, अशी भूमिका सरकारला घेता आली असती. दुर्दैवाने ते झाले नाही.
तीन तारखेला ‘सायकलदिन’ होता. त्याच दिवशी साहिदाबादची अॅटलस सायकल कंपनी बंद करण्यात आली. एक हजार कामगार त्याविरोधात कंपनीच्या प्रवेश द्वारावर निषेधाच्या घोषणा देत होते. काय हा दैवदुर्विलास! संपूर्ण देशच खड्ड्यात घातला गेला आहे. अलीकडेच वैफल्यातून लोक ‘व्हाईट हाऊस’मध्ये घुसले होते, ती भीती राज्यकर्त्यांना ठेवावी लागेल. संकटातून बचावासाठी सरकार ‘गांधी’ नावाची ढाल वापरते. गांधीजींनी सांगितलेल्या शाश्वत विकासातूनच आपला देश महासत्ता होईल, असेही भासविले जाते. टी.व्ही.च्या पडद्यावरून गांधी विचारांचे महत्त्व सांगणारे जुमलेबाज भाषण आमच्या कानावर धडकते. इकडे आम्ही ‘महात्मा गांधी की जय’ म्हणत सरकारची सगळी पापं विसरतो.