दिलीप तिखिले|आता हनिमून संपलाच बघ...! नो सोडचिठ्ठी, नो तलाक...! बस्स् एकदम ‘ब्रेक अप’...खेळ खल्लास म्हणजे खल्लासच...आता ना मुका द्यायचा ना मोका ... आले कुठले...! म्हणे, मुका घेतला तरी नाही नांदायचे. इथे कुणाचे अडलेयं खेटर....आम्हाला निकम्मे म्हणता का?..अहो! उठा..., वेक अप!!! ही काय बडबड चालवलीय...?सौ.च्या आवाजाने हिंमतराव दचकून जागे झाले. तिच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून आपण झोपेत काहीतरी भलते, सलते बोलून गेल्याची जाणीव हिंमतरावांना झाली.हिंमतराव : (सावरून) काही नाही गं... तो आमच्या राजकारणातला भाग आहे. तुला नाही कळायचं.सौ. : (संशयाने) राजकारणातला भाग की, बाहेरचे लफडे? आजकाल तुम्हा भाजपावाल्यांचे काही खरं नाही. रोज काहीना काही लफडं कानावर येतंय...आणि काय हो...तो हनिमून, सोडचिठ्ठी, मुका आणि काय, काय बडबडत होता...! हा काय तुमच्या राजकारणाचा भाग आहे का?हिंमतराव : तुझा संशय रास्त आहे, पण तू समजते तसे काही नाही. मागे तो संजय काय म्हणाला, ठाऊक आहे...! म्हणे, आता मुका घेतला तरी आम्हाला तुमच्यासोबत नांदायचे नाही. आता तूच सांग केवळ चुंबाचुंबी करून संसार चालतो का?सौ. : इश्य... हे काय विचारणे झाले.हिंमतराव : बघ...! कशी लाजलीस तू!! पण, आमच्या राजकारणात असे शब्द वापरताना कुणाला लाज वाटत नाही. आता परवाचंच बघ... काय म्हणाले ते उद्ववराव.. माहित आहे? म्हणे भाजपाचे सरकार निकम्मे आहे, ते केवळ मोगलाई पोसत आहे... आता मला सांग, आमचे सरकार निकम्मे आहे. तर सरकारात असलेली सेनाही निकम्मी नाही का?सौ. : पण मी म्हणते, ते रोज तुम्हाला लाथा घालतात, आडूनपाडून बोलतात. तुम्ही मात्र गुमान सहन करता. हाकलून का लावत नाही त्यांना?हिंमतराव : मजबुरी मॅडम...! त्यांना सत्तेबाहेर काढले तर आम्ही तरी आत राहू का? तिकडे ‘इंजिन’ सारखं धूर ओकत राहते. केव्हा रक्ताचे नातं एक होईल याचा नेम नाही. राजकारणात हे सर्व बघावेच लागते.सौ. : म्हणून तर त्यांचे फावते. तुम्हालाही जशास तसे उत्तर देता आले पाहिजे. खरं तर त्या ‘शेरा’ला पुरून उरण्यासाठी तुमच्याकडे कुणी सव्वाशेरच नाही.हिंमतराव : बरोबर आहे तुझे म्हणणे. म्हणूनच ‘नारायणास्त्र’ आणले होते आम्ही त्या कामासाठी. आणताना भरभरून बारुद भरली होती. म्हटलं येईल पुढे कामात. पण साहेबांनी ट्रिगरच दाबला नाही.सौ. : शेवटी काय झाले... फुटलेच ना! कणकवलीत या अस्त्राने तुमचीच कणिक तिंबली ना!हिंमतराव : हो...! बरोबर आहे तुझे. पण... एक सांगतो. १९ ची निवडणूक येऊ दे. हे धनुष्य तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अगदी मनातलं सांगतो.सौ. : बस्स् ... तुम्ही काय तुमचं हायकमांड काय... स्वत:च्याच मनातलंच सांगत बसणार. लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज नाही. १९मध्ये त्यांनी मन बदलले तर राहा झोपेतच बडबडत.
मुका काय मोकाच देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:01 AM