मिलिंद कुलकर्णी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे महाभयंकर रूप सारेच अनुभवत आहोत. कडक निर्बंधांनंतर आता कठोर लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वर्षभरापूर्वीच्या कटुस्मृती पुन्हा ताज्या होत आहेत. त्याच चुका, तेच दावे आणि तसेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आम्ही काहीच धडा शिकलो नाही, असे वाटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महासाथीच्या अनेक लाटा येत असतात, असे वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले होते. युरोप, अमेरिकेत अशा लाटा येऊन गेल्याचे आपण बघितले. तरीही आम्ही बेफिकीर, बेजबाबदारपणे वागलो आणि दुसऱ्या लाटेचा पुरेसा मुकाबला करू शकत नसल्याचे सिद्ध केले. लसीकरणासारखे मोठे अस्र हातात असूनही आम्ही त्याचा उपयोग पुरेसा करून घेऊ शकलो नाही, एवढे कर्मदरिद्री आहोत. वर्षभरापूर्वीप्रमाणेच रुग्णालये ओसंडली आहेत. सरणांवर गर्दी झाल्याने मृतदेहांना अंत्यसमयीदेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आणि तुटवडा निर्माण झाला आहे. हे सगळे का होत आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. वर्षभरापूर्वी आलेल्या अनुभवानंतरही आम्ही शहाणे झालो नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा सुदृढ करण्याच्यादृष्टीने काहीही प्रयत्न केले नाहीत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावर रेमेडेसिवीर या इंजेक्शनचे उत्पादन थांबवले गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. जागतिक महासाथीविषयी आम्ही किती सतर्क आणि सजग आहोत, याविषयी अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण या ठिकाणीही होत आहे. केंद्रातील भाजपचे सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविषयी दुजाभाव करीत असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करायचा. केंद्र सरकारचे मंत्री, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेविषयी, नाकर्तेपणाविषयी ओरड करायची. आकडेवारीचा आधार दोन्ही बाजूने घ्यायचा. सामान्य माणसाचा जीव जातोय, आणि तुम्ही कसले राजकारण करता? असा प्रश्न सगळ्या राजकीय पक्षांना विचारण्याची वेळ आली आहे. सरकार कुणाचे, केंद्र - राज्य सरकारचा वाद याविषयी सामान्य माणसाला काहीही देणेघेणे नाही. त्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, एवढीच त्याची कळकळ आहे.सूडनाट्याचे प्रयोग सुरूराजकारणातील सूडनाट्याने विकासात्मक कामावर परिणाम होतो, याचा अनुभव संपूर्ण खान्देश घेतोय. राज्याचे इतर भाग प्रगती करीत असताना खान्देशात मात्र विकासाचा अनुशेष कायम आहे. पाच वर्षांतील भाजप -शिवसेनेचे सरकार गेल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाने महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. भाजप व शिवसेनेतील कलगीतुरा दीड वर्ष लोटले तरी थांबायचे नाव घेत नाही. केंद्र सरकारकडून राज्य सरकारची कोंडी केली जात असल्याची तक्रार शिवसेना करीत आहे, तर दोन मंत्र्यांना आरोपांमुळे राजीनामे द्यावे लागल्याने भाजप रोज आरोपांची राळ उठवत आहे. याची बाधा खान्देशलादेखील झाली. भाजपच्या नगरसेवकांना फोडून शिवसेनेने अडीच वर्षापूर्वी ताब्यातून गेलेली महापालिका परत मिळवली. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेविषयी चाचपणी सुरू झाली. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू झाला आहे. महाजन यांच्या मतदारसंघात जामनेरला जिल्हा परिषदेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्याच्या कामाची ग्रामविकास विभागाने चौकशी लावली आहे. महाजन यांचे निकटवर्तीय श्रीराम व श्रीकांत खटोड बंधू हे या कामात भागीदार ठेकेदार होते. त्यांच्याच नेतृत्वाखालील सुभाष चौक अर्बन पतपेढीचे विशेष लेखापरीक्षणाचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत. मविप्र या शतकोत्तरी शिक्षणसंस्थेतील वादात महाजन यांच्या नावाची चर्चा आहेच. एकंदरीत सूडनाट्याचे नवीन प्रयोग सुरू झाले आहेत, असे म्हणावे लागेल.महासाथीच्या काळातही दंगलीजग महासाथीचा मुकाबला करीत असताना दंगलीसारखे प्रकार घडतात, याला काय म्हणावे? गेल्यावर्षी रावेरला अशीच दंगल झाली होती. यंदा दोंडाईचाला घडली. मुलीच्या छेडखानीवरून झालेल्या दंगलीत आरोपींना पळवून नेण्यासाठी पोलीस स्टेशनवर हल्ला झाला. जमावाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबार केला. जगण्याची शाश्वती नसल्याच्या काळात माणूस एकमेकाला मारायला उठला आहे, हे कसले लक्षण आहे? कुठे गेला आमचा सुसंस्कृत समाज?महाराष्ट्र व मुंबई पोलिसांच्या नावलौकिकाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक? सचिन वाझे प्रकरण उजेडात आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक अशोक सादरे अनेकांना आठवले. आता १०० कोटी तर तेव्हा सोन्याची अंगठी असा घटनाक्रम होता. सादरे यांनी आत्महत्या केली. त्यावेळी उठलेल्या वावटळीत कुणाची नावे गुंतली होती, हे तर जगजाहीर आहे. मुंबईतील पोलीस दलाचे रोज वाभाडे निघत असताना दोंडाईचामध्ये वर्षभरात पोलीस दलाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. फेब्रुवारी २०२० मध्ये पोलिसांच्या ताब्यातील मोहन मराठे या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, कर्मचारी वासुदेव जगदाळे, सीताराम निकम, नंदलाल सोनवणे यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला. ३१ मार्च २०२१ रोजी झालेल्या दंगलीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या अधिपत्याखालील पोलीस स्टेशनमधून २०० लोकांच्या जमावाने दोन आरोपींना पळवून नेले. वारेंनी गोळीबार केला. पोलीस दलाचा गुप्तवार्ता विभाग, त्यांची शहराची रपेट, रात्रीची फिरस्ती हे सगळे कागदावर असल्याचे या घटनेने उघड झाले. या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार आहे. वारेंची बदली झाली आहे. पोलीस दलाचे असे वाभाडे निघणे वाईट आहे.(लेखक जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)