गाडगेबाबांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली?
माझ नाव भाऊराव काळे, वय ९३, गाव मलकापूर, जि. अमरावती. माझे खरे आडनाव 'अब्रू' काळे हे टोपण आडनाव. माझा जन्म १९३० चा. माझी आई माझ्या नकळत्या वयातच कॉलराने वारली. त्यावेळी कॉलऱ्याची एवढी दहशत होती की तिच्या मौतीला कुणीच आले नाही. वडिलांनी एक भाड्याची बैलगाडी केली आणि तिच्यातच आईला नेऊन अंत्यसंस्कार केले. मी आणि वडील असे दोघेच होतो मौतीला. आई गेल्यावर वडील खूप निराश झाले. त्यांनी मला आजीकडे ठेवले. आजीबरोबर मी पालखीत पंढरपूरला गेलो. तिने मला शंकरराव हंडाळकरांकडे सोपविले. ते पैठणचे. यात्रेसाठी पंढरपूरला आले होते. ते गाडगेबाबांचे शिष्य माझ्यासारखी आणखी ५-६ मुले त्यांच्याजवळ होती. या हंडाळकरांचा पैठणला आश्रम होता. तिथे ते मुलांना सांभाळत. गाडगेबाबाही त्यावेळी यात्रेनिमित्त पंढरपुरात आलेले होते. बाबांना भेटण्यासाठी ते आम्हाला घेऊन गेले. डोक्यावर रुमाल बांधलेला. चिंध्यांचा शर्ट आणि खाली लुंगी. गळ्यात घोंगडीचा तुकडा आणि कवडी. पायात जुने बूट; पण स्वच्छ. तेजस्वी चेहरा. ही बाबांशी झालेली माझी पहिली भेट. त्यावेळी मी ९-१० वर्षाचा असेन.
मग बाबांच्या सहवासात कसे आलात?
हंडाळकरांनी पैठणला नेले; पण मला तिथे करमेना. मी तेथून पळालो. पंढरपूरला आल्यावर मग मात्र बाबांची आठवण झाली. विचारपूस करीत धर्मशाळेत आलो. तिथे मारोतराव गव्हाणे नावाचे अंध गृहस्थ वीणा वाजवीत होते. मी त्यांच्या पाया पडलो. त्यांनी विचारपूस केली आणि इथे राहतोस का विचारले. मला गरज होतीच. दरम्यान, कार्तिकीच्या निमित्ताने गाडगेबाबाही आले. संध्याकाळी बाबा सगळ्यांची चौकशी करायचे. मी सर्वांत लहान. 'हा झाडलोट करतो. बांधकामाला पाट्या देतो. बैलघाणी चालवतो. गव्हाणेंनी दिलाय, असे मॅनेजरने सांगितल्यावर बाबा म्हणाले, 'याला नाशिकला पाठवा. पंढरपूरला ठेवू नका. मग मी नाशिकला आलो. पडतील ती कामे करू लागलो. तिथे अमरावतीचे अच्युतराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी होत्या. दोघेही प्रेमळ. मग नाशकातच रमलो.
तुम्ही बाबांच्या गाडीचे ड्रायव्हर कसे झालात?प्रत्येक जण आपापल्या पायावर उभा राहावा, असे बाबांना वाटे. एकदा बाबांनी आम्हाला प्रत्येकाची इच्छा विचारली. 'मला ड्रायव्हिंग शिकावेसे वाटते असे सांगितल्यावर त्यांनी मला पुण्याच्या आपटे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पाठविले. त्याचदरम्यान बाळासाहेब खेरांनी बाबांना मुंबई सरकारमार्फत एक गाडी दिली. 'बीएमझेड ५३४१' ही ती गाडी. बाबा म्हणाले, 'तुम्ही ही गाडी चालवाल काय?" मी तर हरखूनच गेलो.त्या काळातले बाबांचे काही अनुभव सांगा...
बाबा पंढरपूरच्या वारीला नेहमी जात; पण ते मंदिरात गेले नाहीत. ते खराटा घेऊन घाण साफ करीत आणि रात्री कीर्तनातून माणसांची डोकी साफ करीत. त्यांच्यासाठी विठोबा देवळात नव्हता, तर तो दीन-दुबळ्यांत होता. त्यांची सेवा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. कर्मवीर अण्णांच्या रयत संस्थेची बंद केलेली ग्रँट बाबांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री खेरांना चालू करण्यास भाग पाडले. पंढरपूरची धर्मशाळा बांधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपुर्द केली. एकदा तुकडोजी महाराजांनी वारकरी संमेलन घेतले. बाबांनाही येण्याचा आग्रह केला. बाबा दारातच चपलांजवळ बसले. बाबांना बोलण्याचा आग्रह झाला. ते म्हणाले, 'आपण तुकोबा-ज्ञानोबा- नामदेवांचे नाव घेतो; पण दीन-दुबळ्यांसाठी काय करतो? तुम्ही कुणी हरिजनांची वस्ती साफ केली, त्यांच्याबरोबर भाकरी खाल्ली, त्यांची सुख-दुःखे जाणून घेतली? मग या मोठमोठ्या संतांचे नुसते दाखले देऊन उपयोग काय?"
बाबांची तुकोबांवर अपरंपार भक्ती. एकदा ते देहूला गेले. देहूची दुरवस्था पाहून व्यथित झाले. त्यांनी बाळासाहेब खेरांना आग्रह करून देहूत सुधारणा करायल्या लावल्या. पुलाचा आग्रह धरला आणि भंडारा डोंगरावर पत्र्याचे मोठे शेड उभे केले. बाबांनी शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू केल्या. लोकांकडून देणग्या घेतल्या; पण स्वतःसाठी एक पै सुद्धा कधी घेतली नाही.
आजच्या परिस्थितीबाबत काय सांगाल?काय सांगू? शिकलेली माणसेच जास्त मतलबी झालीत. बाबांच्या विचारापासून सगळेच दूर चाललेले दिसतात. धर्मशाळांचे ट्रस्टी आणि मिशन एकजिवाने काम करीत नाहीत. जे घडताना दिसते ते पाहून वाईट वाटते. दुसरे मी काय सांगणार?
(मुलाखत आणि शब्दांकन प्रा. विठ्ठल म. शेवाळे)