- प्रशांत दीक्षित
भारत व पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांतील वायूदलांमध्ये बुधवारी सकाळी हवाई चकमक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारताने याला पुष्टी दिली. त्याआधी भारतीय वैमानिकाला पकडल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे.आजच्या चकमकीत भारताने एक मिग-21 विमान गमावले आहे व आपला एक वैमानिक पाकच्या ताब्यात आहे. हे जुने विमान आहे. हवाई हल्ल्यामध्ये वापरलेले विमान नाही. पाकिस्ताननेही एक विमान गमावल्याचे भारताच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. हे एफ-16 नावाचे अत्याधुनिक विमान आहे असे म्हणतात. पाकिस्तानने याला पुष्टी दिलेली नाही.अशा चकमकी यापुढे होत राहणार व त्यामध्ये थोडेबहुत नुकसान होणार हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. वायूदलातील तज्ज्ञांच्या मते भारताची सतर्कता व ताकद अजमावून पाहण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असावा. दोन विमाने भारतीय हद्दीत मुद्दाम घुसवून भारत काय करतो हे पाकिस्तानी वायूदलाने तपासून पाहिले.या पाकिस्तानी विमानांना भारतीय वायूदलाच्या मिराज विमानांनी अटकाव केला असावा आणि त्यानंतर पाक विमानांचा पाठलाग केला असावा. असा पाठलाग करायला लावून शत्रूराष्ट्राच्या विमानांना स्वतःच्या देशात आणून त्या विमानावर अन्य विमानांतून वा जमिनीवरून मारा करून पाडण्याचे डावपेच नेहमी खेळले जातात. पूर्वी हा प्रकार अधिक होत असे. मात्र आता अत्याधुनिक रडार यंत्रणा असल्याने असे पाठलाग कमी झाले आहेत.माजी हवाई दल प्रमुख कृष्णस्वामी यांच्या मते आजची चकमक हा पाठलागाचाच प्रकार असावा. भारताचे मिग आणि पाकिस्तानचे एफ १६ यांच्यात पाठलाग चालू असताना हवाई चकमक झाली असावी. चकमक सुरू असताना दोन्ही विमाने पाक हद्दीत गेली किंवा भारतीय विमानाला पाकिस्तानी एफ-१६ने सफाईने पाक हद्दीत ओढून घेतले. या चकमकीत ही दोन्ही विमाने कोसळली व भारताचा वैमानिक पाकिस्तानच्या कैदेत गेला. पाकिस्तानच्या कोसळलेल्या विमानातील वैमानिकाचे काय झाले हे अद्याप कळलेले नाही.कुमारस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६५ व १९७१च्या युद्धात असे पाठलाग अनेकदा केले गेले. पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हद्दीत खेचून आणण्यासाठी पाकच्या प्रदेशात खोलवर मुसंडी मारली जात असे. भारतीय विमाने तेथे घुसताच पाकिस्तानची विमाने हवेत झेपावत. मग त्यांना चकवत भारतीय विमाने भारताच्या हद्दीकडे येत. त्या पाठलागात पाकिस्तानी विमाने अनेकदा भारतीय हद्दीत घुसत. मग त्यांच्यावर जमिनीवरील तोफांतून प्रखर मारा करण्यात येई. हाच प्रकार पाकिस्तानी वायूदलही करीत असे.यातील मुख्य भाग म्हणजे असे प्रकार यापुढे सुरू राहतील. हवाई चकमकीत भारताचा एक वैमानिक हाती आल्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला हायेसे वाटले असेल. तेथील जनतेमधील रोष कमी होण्यास यामुळे थोडी मदत होईल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्यास व भारताविरुद्ध कांगावा करण्यास पाकिस्तानला बळ येईल. पाकिस्तानला तेच करायचे आहे, कारण युद्ध करण्याइतका पैसा सध्या पाकिस्तानजवळ नाही. म्हणून या चकमकीनंतर इम्रान खान यांनी लगेच चर्चा करण्याची तयारी दर्शविली.अशा चकमकीमधील विमानाचे कोसळणे वा वैमानिक शत्रूच्या हाती लागणे या गोष्टी युद्धमान परिस्थितीत नेहमी होतात हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानचे लष्करही सक्षम व अतिशय व्यावसायिक आहे. तसेच ते धर्मांध असल्यामुळे कोणत्याही थराला जाण्याची लष्कराची तयारी असते. भारताचे तसे नाही. कोणताही प्रतिहल्ला न करता पाकिस्तान शरण येईल असे समजणे वेडेपणाचे होईल.भारताने केलेल्या दाव्यानुसार खरोखर पाकिस्तानचे विमान पाडले गेले असेल, ते एफ १६ सारखे अत्याधुनिक असेल आणि भारताच्या मिग २१सारख्या जुन्या विमानाने ही कामगिरी केली असेल तर तीही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. आपले सैन्यदल सक्षम व सतर्क असल्याचा हा पुरावा ठरेल.