उत्तर भारतातील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर देशभर उद्भवलेली परिस्थिती खरोखरच भयानक होती. राम रहीम या नावात संत कबीर यांच्या कल्पनेतला हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा संदर्भ असला तरी त्याच्या आचरणातून राम काय अन् रहीम काय, या सगळ्यालाच तिलांजली दिलेली दिसते. या धार्मिक अधिष्ठानाच्या ठिकाणी भेट देणाºया महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर चीड ही स्वाभाविक असली तरी बाबाच्या पाठीशी असलेला समूह पाहता नैतिक मूल्ये कुठे शोधायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. सोशल मीडियावर तर यापुढे बुवा महाराज म्हणजे नको रे बाबा हेच सूत्र अंगीकारण्याचे संदेश पसरले गेले. ‘बुवा तेथे बाया’ या नाटकामधून आचार्य अत्रे यांनी या अनिष्ट हितसंबंधावर प्रकाश टाकला होता. पण हे संबंध तोडण्याचे गांभीर्य कुणीच मनापासून घेतले नाही. आज देश विदेशात भारतीय साधू-संत, प्रवचनकार, विद्वान सद्विचाराची पेरणी करत आहेत. भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सन्मार्गाला वळवत आहेत. त्यांच्या भाषाप्रभुत्वावर आणि रसाळ वाणीवर फिदा होऊन अनेकजण त्यांचे चाहते व शिष्यगण होऊन जातात. पण या ठिकाणी लैंगिक शोषण झाल्याचे उघड झाल्याने अशा रसाळ वाणीवर आणि ठासून भरलेल्या वक्तृत्वावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न पडला आहे. जगाची वाटचाल ही ताणतणावाकडे चालली आहे. युवा पिढी व्यसनाकडे वळू लागली आहे. वृध्दांची वाटचाल वृध्दाश्रमाकडे सुरू आहे. नीतिमूल्ये घसरली आहेत. अशा वेळी सदविचाराची पेरणी करणारी माणसे आणायची कुठून. जगाचा श्रध्देवरचा विश्वास उडाला तर जग हे नकरात्मक विचार करू लागेल. आजही जगात साधू, संत, महंत, मुल्ला मौलवी, धर्मगुरू यांचे विचारच माणसाला माणसात आणून सोडू शकतात. ही मंडळी म्हणजे भोंदूच आहेत असा एकांगी विचार जनतेत रुजला तर यातून सावरायला पिढ्यान् पिढ्या घालवाव्या लागतात. मात्र भोंदूना रोखण्यासाठी भक्तांनीच डोळसपणे आपल्या श्रध्दास्थानाची निवड करावी. जगात तणावाचा रोग पसरू लागल्याने त्यामध्ये व्यावसायिक संधी शोधणारे अनेकजण आहेत. आचार, विचार, व्यायाम, योगासने, चांगली प्रवचने, व्याख्याने ऐकल्याने अनेकांचे तणाव दूर होतात. त्यामुळे असे लोक त्या त्या प्रवचनकार व धर्मगुरूच्या अधीन जातात. पण तो भोंदू आहे की सज्जन हे कुणीच पाहात नाही. आपला गुरू बोलतो तसा वागतो का? एवढ्या एकाच गोष्टीचा पडताळा केला तरी पुरेसे आहे.
तोची साधू ओळखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:40 AM