- वसंत भोसलेसांगली जिल्ह्यातील जुन्या जमान्याचे कार्यकर्ते विश्वासराव रामराव ऊर्फ दाजी पाटील यांचे गुरुवारी निधन झाले. प्रारंभी कॉँग्रेसचे आणि नंतर जनता पक्षाचे नेते राजारामबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या फळीतील विश्वासदाजी पाटील हे आघाडीवरचे कार्यकर्ते होते.सार्वजनिक जीवनातील कार्यकर्ता घडला पाहिजे आणि टिकलादेखील पाहिजे, अशी नेत्यांची धारणा असायची. परिणामी सार्वजनिक काम करीत तयार झालेले कार्यकर्ते मूर्तिमंत नेत्यांचे कान-नाक-डोळे असायचे. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी असे कार्यकर्ते घडविले. किंबहुना नेत्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवूनच कार्यकर्ते तयार होत असायचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका किंवा सहकारी संस्थांमधून असे असंख्य कार्यकर्ते तयार झाले. याला विचारांचा अपवाद नव्हता. कॉँग्रेसपासून समाजवाद्यांपर्यंत आणि कम्युनिस्टांपासून जनसंघवाल्यांपर्यंत सार्वजनिक कार्याला वाहून घेतलेले हे कार्यकर्ते त्या त्या गावच्या पंचक्रोशीत रोल मॉडेल असायचे. महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा राहण्यात या कार्यकर्त्यांचे मोहोळ महत्त्वाचे होते. त्यांच्यांच जिवावर नेतेमंडळी राज्याचे तसेच देशाचे नेतृत्व करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरायचे. केवळ निरोप दिला की, शब्दातील काना-मात्राही न बदलता त्या निरोपाचा अंमल करायचा, इतकी पराकोटीची निष्ठा होती.अशाच कार्यकर्त्यांच्या पहिल्या फळीतील सांगली जिल्ह्यातील जुन्या जमान्याचे कार्यकर्ते विश्वासराव रामराव ऊर्फ दाजी पाटील यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वावर आयुष्यभर श्रद्धा ठेवून काम करणारे दाजी खासदार झाले; पण त्यांच्यातील कार्यकर्ता कधीच बाजूला काढता आला नाही. साखर कारखाना, दूध संघ किंवा विविध संस्थांवर त्यांनी निष्ठेने काम केले. स्वत:ला विश्वस्त समजून वागत राहिले. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या दूध संघाचे ते काही काळ अध्यक्ष होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळवे तालुक्यातील येडेमच्छिंद्र गावचे ते सुपुत्र होते. दूध संघात अध्यक्ष म्हणून येताना घरातून जेवणाचा डबा घेऊनच यायचे. चहाऐवजी दूध प्यायचे. दूध संघातील दूध पिल्यानंतर त्याचे पैसे चुकते करायचे. आपण सहकारी संस्थांचे मालक नव्हे विश्वस्त आहोत, अशी भावना ठेवून काम करणारे कार्यकर्ते होते. अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच नेतेमंडळी बाहेर राहून मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत असत. सांगली जिल्ह्याचे राजकारण अनेक वर्षे वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या प्रभावाने भारावून गेलेले होते. या दोन नेत्यांमध्ये चांदोली धरणाच्या प्रश्नावरून मतभेद झाले आणि त्यांच्या निधनापर्यंत संघर्ष चालू राहिला. या संघर्षात नेत्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या विश्वासदाजी पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या राजकीय जीवनाची आहुती दिली. याच संघर्षातून त्यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरुद्ध सांगली लोकसभा मतदारसंघातून १९८० मध्ये निवडणूक लढविली. दादा १९८३मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. त्यांच्या पत्नी शालिनीताई यांच्या विरोधात पुन्हा एकदा निकराची लढत विश्वासदाजी पाटील यांनी राजारामबापू यांच्या नेतृत्वाखाली दिली. एक वर्षांनी (१९८४) लोकसभेची निवडणूक झाली. तीसुद्धा विश्वासदाजी यांनी लढविली. या तिन्ही निवडणुका ते हरले; पण आपल्या नेत्याच्या राजकीय संघर्षासाठी निकराने लढत राहण्याचे व्रत त्यांनी घेतले होते.जनता दलाचे केंद्रात सरकार आले तेव्हा राजारामबापू आणि वसंतदादा दोघेही हयात नव्हते. तेव्हा विश्वासदाजी यांना राज्यसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. एका सच्च्या कार्यकर्त्याचा तो सन्मानच होता. चंद्रशेखर चौधरी, देवीलाल, प्रा. मधु दंडवते, मृणाल गोरे, विश्वनाथ प्रतापसिंह आदी दिग्गज नेत्यांशी संबंध असणारा हा कार्यकर्ता खासदार झाला तरी कार्यकर्त्यासारखे सामान्य माणसांची कामे करीत राहिला. महाराष्ट्राचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावाच्या या सुपुत्राने त्यांचे गावात स्मारक व्हावे, ते शासनाने करावे यासाठी नेहमी आग्रह धरला. ते त्यांच्या प्रयत्नानेच पूर्णत्वास आले. राजारामबापू यांच्या तालमीतील हा कार्यकर्ता त्यांच्या विचाराने माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीही काम करत राहिला. अशा तळागाळातील कार्यकर्त्यांनीच महाराष्ट्र घडला आहे, हेच त्यांचे स्मरण होय !