-डॉ. सुरेश सरवडेकर, माजी सहायक संचालक,वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्रभारतातील १५ ते १८ वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी तब्बल सुमारे ४१ लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली. याबाबतीत एक महत्त्वाचा वाद उभा झाला : कोव्हॅक्सिनची लस नोव्हेंबर २०२१ मध्येच मुदतबाह्य झालेली (एक्स्पायर्ड) होती, तरीही ती मुलांना दिली गेली, अशा बातम्या आल्या. मुळात यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात. मुदतबाह्य लस देणे योग्य आहे का? त्याचा काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? मुदत संपल्यानंतरही कोव्हॅक्सिनला ती वाढवून का देण्यात आली? मुळात या लसींचे आयुर्मान (सेल्फ व्हॅल्यू) किती असते?..याबाबत सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले. आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्यानंतर कोव्हॅक्सिनची मुदत (नोव्हेंबर २०२१ मध्ये संपण्यापूर्वीच) मूळ नऊ महिन्यांऐवजी बारा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली होती असा खुलासा सरकारने केला. हेच कोविशिल्डच्या बाबतीतही केले गेले.
आता दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, लसीची मुदत वाढवून देण्यात आली असली तरी तसे रिलेबलिंग या लसींच्या पॅकेजिंगवर करण्यात आले होते का? समजा, अत्यंत कमी कालावधीत ही गोष्ट व्यावहारिकदृष्ट्या अशक्य, कठीण असेल, तर मग निदान ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (डीसीजीआय) यांनी त्यासंदर्भात किमान परिपत्रक तरी जारी केले होते का? यासंदर्भात स्पष्टीकरण मिळत नाही. या दोहोपैकी एखादी जरी गोष्ट केली गेली असती किंवा लोकांपर्यंत आधीच पोहोचली असती, तर लोकांच्या मनात लसीबाबत संभ्रम निर्माण झाला नसता आणि त्यावरून गदारोळही झाला नसता. आता मुदत संपलेल्या लसींच्या उपयोगाबाबत, परिणामकारकतेबाबत, त्याची मुदत वाढविण्याबाबत आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का, याबाबत.. जेव्हा कोणतेही नवीन औषध बाजारात आणले जाते, त्यावेळी दोन मुख्य अभ्यास केले जातात. पहिला म्हणजे जास्तीत जास्त किती तापमानापर्यंत हे औषध टिकाव धरू शकते आणि व्यवस्थित राहू शकते. दुसरा अभ्यास म्हणजे एखादे औषध नव्याने बाजारात आणण्यापूर्वी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अभ्यास केला जातो, त्याचबरोबर औषधाची रोग बरे करण्याची क्षमता किती काळपर्यंत टिकून राहते यासाठी निरिक्षणे केली जातात. त्यावरून औषधाला शेल्फ लाईफ दिले जाते. अशा शेल्फ लाईफला मग मुदतबाह्य दिनांक दिला जातो. त्या तारखेनंतर ते औषध वापरण्यास योग्य ठरत नाही.
कोरोनासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत विकसित करण्यात आलेली औषधे, लसी, आदी बाबतीत मात्र काही प्रमाणात अपवाद केला जातो. या औषधांच्या साऱ्या कठोर तपासण्या केल्या जात असल्या तरी काही गोष्टींबाबत अपवाद केला जातो. ती लोकांवर किती परिणामकारक ठरतात, याबाबत दीर्घकाळ अभ्यासाचे पुरावे शक्य नसतात. कारण, ती लस लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यानुसार जगभरात उत्पादित झालेल्या साऱ्याच लसी तुलनेने लवकर बाजारात आणल्या गेल्या. आता या लसी मुदत संपल्यावर तातडीने कालबाह्य होतात का? - तर नाही. पण हेही उत्तर नेमके नाही.
आफ्रिकेतील अनेक गरीब देश स्वत: अशावेळी तातडीनं औषधे विकसित करू शकत नाहीत. त्यांना ती आयातच करावी लागतात. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुरवलेल्या नऊ लाख २५ हजार लस-कुप्या आफ्रिकन देशांच्या संघटनेने मार्च महिन्यात विविध आफ्रिकन देशांना पुरवल्या. त्यातल्या अनेक लसी वापरण्यात आल्या; पण १३ एप्रिल २०२१ ही एक्स्पायरी डेट असलेल्या यातील काही कुप्या वापरल्या न गेल्यामुळे १३ देशांमध्ये त्या उरल्या. या लसींचे आता काय करावे अशी विचारणा जागतिक आरोग्य संघटनेकडे केली गेली. त्यांनी सांगितले, एक्स्पायरी डेट संपली किंवा ती जवळ आली म्हणून औषधे लगेच निरुपयोगी ठरत नसली, तरीही ज्या औषधांवर, लसींवर अजून लेबलिंग केलेले नसेल आणि ती वितरित करण्यात आलेली नसतील तरच त्यांच्या पुन्हा चाचण्या घेऊनच त्यांची मुदत वाढवली जाऊ शकते. ‘सीरमकडून ॲडिशनल स्टॅबिलिटी डाटा’ मिळाल्यानंतर आणि त्याची कठोर तपासणी केल्यानंतरच याबाबत ठामपणे सांगता येईल.
यासंदर्भात काही मुद्दे महत्त्वाचे आहेत.१. लसींसारख्या गोष्टी आणीबाणीच्या काळात वापरल्या जातात, लोकांच्या जीवन-मरणाचा तो प्रश्न असतो. त्यामुळे व्यवस्थित चाचण्या घेऊन लसींची मुदत वाढवली जाऊ शकते. २. आपल्याकडे ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (सीडीएससीओ)च्या नियामकाद्वारे हा निर्णय घेतला जातो. १५ ते १८ वयोगटातील सुमारे दहा कोटी मुलांसाठी आपल्याला वीस कोटी लसींची गरज आहे. अशावेळी लस वाया जाणे परवडणारे नाही.३. लस आणि औषधांसंदर्भात ‘स्टॅबिलिटी’ आणि ‘शेल्फ व्हॅल्यू’ हे दोन शब्दप्रयोग नेहेमी केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ‘स्टॅबिलिटी (स्थिरता) म्हणजे विशिष्ट मर्यादेत लसीची रासायनिक, भौतिक, सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्याची क्षमता.४. लसीचे शेल्फ लाइफ म्हणजे अनेक बॅचवरील स्थिरता अभ्यासाद्वारे निर्धारित केलेली, अत्यावश्यक अटींचे पालन केलेली आणि योग्यरीत्या निर्धारित कालावधीसाठी योग्य पद्धतीने (तापमान, वाहतूक इ.संदर्भात) संग्रहित केलेली लस. औषधाच्या प्रत्येक ‘बॅच’चे आयुष्य ठरविण्यासाठी शेल्फ लाइफचा वापर केला जातो. त्या कालावधीसाठी ती शंभर टक्के सुरक्षित मानली जाते. प्रत्येक बॅचची कालबाह्यता तारीख स्थापित करण्यासाठी वापरली जाते.५. सर्वसाधारण औषधांमध्ये रसायनांचा वापर केलेला असतो, त्यामुळे त्यांचे आयुष्यही तुलनेने अधिक असते; पण लसींमध्ये जैविक घटक वापरलेले असल्याने त्यांचे आयुष्य कमी असते. ६. यामध्ये मुख्यत्वे उत्पादकाची जबाबदारी जास्त आहे. कारण कुठल्या एक्सपायरी डेटचा माल कुठे- कुठे सप्लाय केला याचा तपशील फक्त उत्पादकाकडेच असल्यामुळे उत्पादक त्या- त्या हॉस्पिटल्सना एक्सपायरीमध्ये झालेल्या वाढीच्या बदलाबद्दल डीसीजीआयचे परिपत्रक पाठवून कळवू शकतो किंवा रिबलेबलिंग करून परत पाठवू शकतो. तसे ते कळविणे त्याला बंधनकारक आहे. डीसीजीआयनेही सर्व हॉस्पिटल्सना तसे कळविणे जरूरी आहे.औषधे असो नाहीतर लस, त्याबद्दलची विश्वासार्हता जपणे ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. याबाबतची काळजी अत्यंत संवेदनशीलतेने घेतली गेली पाहिजे.