आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याचा अनुभव तसा त्या दोघींजवळही. पण, एकीजवळ असलेला अनुभव आणि दुसरीचा पॉवर गेम. त्यामुळे या चित्तथरारक लढतीत कोण जिंकणार याबद्दल सा-यांनाच उत्सुकता होती. पण, या दोन फुलराणींमध्ये नागपुरात झालेल्या अंतिम सामन्यात सायना नेहवालने बाजी मारत ८२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की अनुभवी किदाम्बी श्रीकांतवर मात करीत एच. एच. प्रणोयने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या क्रीडाविश्वाच्या इतिहासात गौरवाने नोंद केली जाईल, अशा या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू सहभागी होत असल्याने नागपूरकडे साºया देशाचे लक्ष लागले होते. पण, तेवढेच दर्जेदार आयोजन करून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठे केले आहे. या स्पर्धेला मिळालेला क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद वाखाणण्यासारखा होता. या स्पर्धेमुळे विदर्भातील नवोदित बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन मिळणार आहे. स्पर्धेच्या दर्जेदार आयोजनामुळेही भविष्यात नागपुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सामने मोठ्या प्रमाणावर घेण्याबद्दलचा सर्वसंबंधितांचा आत्मविश्वास उंचावला आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी हे सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत. त्यांना या क्रीडा प्रकाराचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासह या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच बॅडमिंटनपटूंचा खेळ नागपुरातील तरुण खेळाडूंना जवळून बघता आला. नागपूरकरांचा प्रतिसाद पाहून हे सर्वच खेळाडू भारावले. ‘स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे हा विजय साकार होऊ शकला, आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखी गर्दी येथे होती’ हे सायनाचे उद्गार नागपूरकरांच्या दिलदार स्वभावाचे प्रत्यंतर आणून देणारे आहे. नागपूर आणि विदर्भातील पालक आपल्या मुलांना खेळांच्याबाबतीत आवर्जून प्रोत्साहन देत असतात. परंतु क्रिकेट वगळता इथे इतर क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाच्याबाबतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसवलती उपलब्ध नाहीत. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य सरकारने या बाबींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन, फुटबॉल अकादमी नागपुरात सुरू व्हायला हवी. नागपूरशिवाय अकोल्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरचे फुटबॉल खेळाडू आहेत. पण, त्यांनाही एका मर्यादेनंतर निराश व्हावे लागते. सरकारने जर या प्रश्नांकडे लक्ष दिले तर विदर्भात अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू तयार होतील.
...तर दर्जेदार खेळाडू घडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:46 AM