समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता तर काय झाले असते? आज हिरो ठरवला गेलेला हार्दिक पंड्या किती बोगस गोलंदाज आहे, धोनीच्या नेतृत्वात कसा कस राहिलेला नाही, भारतीय क्रिकेट संघ कसा गल्ली क्रिकेट खेळण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही आणि सरतेशेवटी ‘खात्रीने सांगतो, मॅच फिक्स झाली होती हो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊन धोनीसकट त्याच्या संपूर्ण संघाची बंगळुरुबाहेर पडणारी वाट रोखली गेली असती की नाही? १८ चेंडूत २७ धावा हे सतराव्या षटकानंतरचे समीकरण अखेरच्या षटकात १२ चेंडूत ११ आणि अखेरच्या तीन चेंडूत तर अवघ्या दोन धावा इतके सोपे आणि सहजसाध्य झाले होते. मर्यादित वीस षटकांच्या विश्व करंडक सामन्यातील ‘अ’ गटात न्यूझीलंडकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभूत करुन भारत बुधवारी बांगलादेशविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नाप्पा स्टेडियममध्ये उतरला होता. आधी फलंदाजी करताना भारताचे फलंदाज तसे ढेपाळलेच. पण हा सामना कमी धावांचा राहील असे समीक्षक सांगत होते. तरीही आशियाई करंडकात पाकिस्तानला लोळवणारा बांगलादेशचा संघ लेचापेचा नसल्याचे त्याने अगोदरच दाखवून दिल्यामुळे विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य त्याच्या दृष्टीने असाध्य नव्हते. प्रत्यक्षात झालेही तसेच. सामना खरे तर त्या संघाने हाणतच आणला होता. भारतीय कर्णधार धोनी याची देहबोली त्याच्यातील अस्वस्थता दाखवून देत होती. सामना बरोबरीत सुटला तरी मिळवली अशीच प्रेक्षकांचीही प्रतिक्रिया होती. पण म्हणतात ना विजयासारखा विजयच. तरीही या सामन्याने आणि आशिया करंडकातील अंतिम सामन्याने एक बाब ठळकपणे दाखवून दिली आहे की क्रिकेटच्या मैदानावर भारत खेळतो तेव्हां आजवर केवळ पाकिस्तान समोर असतानाच ते धर्मयुद्ध होत असते आता पाकच्या जोडीला बांगलादेशदेखील धर्मयोद्धा ठरतो आहे!
तसे न होते तर?
By admin | Published: March 25, 2016 3:23 AM