डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
मी माझ्या कार्यालयात प्रवेश करतो तेव्हा सुप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे एक पेंटिंग वारंवार माझे लक्ष वेधून घेते. त्यावर लिहिलेले वाक्य अनमोल आहे ‘बिन्दु : अतल शून्यकी अनंत संभावनाए’. हे पेंटिंग मला रझा साहेबांची आठवण तर करून देतेच पण माझ्यातला कलावंतही जागा होतो. कॅनव्हासवर कुंचल्याने खेळणे आणि कवितेच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती मला आनंद देते. तुम्ही म्हणाल, आज अचानक चित्र आणि कवितांच्या आठवणी का? - त्याचे एक कारण म्हणजे आज जागतिक कला दिवस आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या ठायी वेगवेगळ्या स्वरूपात कला असते. कोणी ती प्रकट करू शकतो, कोणी नाही! गावाकडे शेणाने नक्षीदार सारवणे असो किंवा दिवाळीमध्ये काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या; ही कलाच तर आहे! मी स्वतः जेव्हा चित्र काढायला बसतो किंवा कोऱ्या कागदावर कविता लिहू लागतो, तेव्हा सर्जनशीलता कशाप्रकारे उमलून येते याचे भानच उरत नाही.
मी अनेक कलाकारांना जवळून पाहिले, अनुभवले, जाणलेही आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या कवितांमध्ये बुडून जायला होते. कला कसलीच बंधने जाणत नसते, म्हणून तर चित्रकार मकबूल फिदा हुसेन पांडुरंगाच्या भक्तिरंगात रंगून जातात. अगोचराला गोचर करण्याच्या अनंत शक्यता कलेमध्ये असतात. शून्याच्या उजव्या बाजूला एखादा आकडा लिहीत गेले, की लगेच त्याचे मूल्य वाढू लागते. म्हणूनच तर ‘बिन्दु : अतल शून्यकी अनंत संभावनाए’ हे रझा साहेबांचे वाक्य महत्त्वाचे! राजा रविवर्मा यांनी आपल्या कल्पनेच्या आधारे देवीदेवतांची चित्रे काढली. परंतु आपल्या देवादिकांना त्यांच्या चित्रातलेच चेहरे मिळाले आहेत! कलेच्या अमर्याद शक्यता मी कोविड काळात अनुभवल्या. कोविडने सगळ्यांना भयावहपणाने घरात कैद केले. मीही अपवाद नव्हतो. असे लादलेले एकटेपण व्यक्तीला पोखरू शकते. म्हणून त्या काळात मी चित्र आणि कवितेला मित्र केले. एरवीही मी कितीही व्यग्र असलो, तरी चित्रकलेशी कोणत्या ना कोणत्याप्रकारे जोडलेला असतो. कोविड सुरू होण्याच्या तीन महिने आधी देशातील नामवंत चित्रकारांना मी ताडोबाच्या अभयारण्यात एका आठवड्यासाठी एकत्र केले होते. निसर्गातला हरेक रंग त्या काळात सर्वांच्या कुंचल्यांतून साकार झाला.
... आणि हो, कलेचा थेट संबंध असतो प्रेमाशी! प्रेमाचा स्पर्श झालेला नसेल तर नुसते रंग काहीच सांगू, व्यक्त करू शकत नाहीत! मनाची शुद्धता, निर्मळता, दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि क्षमा हे सारे कलावंतापाशी असले पाहिजे. मंदिरात जाण्यापूर्वी पूजेची तयारी करावी, तसेच आहे हे! कला ही पूजा आहे, ध्यान आहे. एखादा कलावंत तुम्हाला स्वत:चे चित्र दाखवत असेल, तर तिच्या/त्याच्या डोळ्यात पहा, तिथे पूजेचा भाव दिसेल! विज्ञानाने अनेक शोध लावले तरीही आपण आपल्या सृष्टीतील वाळूच्या एका कणाएवढेही रहस्य जाणू शकलेलो नाही. कलेच्या क्षेत्रातही हेच खरे आहे. एकाचे चित्र दुसऱ्याच्या चित्रासारखे नसते. प्रत्येकाजवळ त्याची त्याची दृष्टी आणि दृष्टिकोन असतो.
कलावंताच्या कल्पनेतून अवतरलेले एखादे दृश्य १०० वर्षांनंतर प्रत्यक्षात साकार झाल्याची उदाहरणे आहेत. ज्याच्या जन्मदिवशी आजचा कला दिवस साजरा केला जातो तो लिओनार्दो दा विंची. जिच्या अलौकिक स्मितहास्याची नक्कल आजवर कोणालाही करता आली नाही अशा मोनालिसाच्या चित्रासाठी लिओनार्दो प्रसिद्ध आहे. पॅरिसच्या लुव्र संग्रहालयात ५०० वर्षांपेक्षा जास्त जुने असे हे चित्र मी जवळून पाहिले आहे. ‘मोनालिसा’च्या समोर उभा असताना मला विंचीच्या इतर चित्रांचीही आठवण होत होती. १९०३ मध्ये पहिले प्रायोगिक विमान उडवणाऱ्या विल्बर आणि ऑरवेल या राइट बंधूंच्या किमान ४०० वर्षे आधी लिओनार्दो दा विंचीने विमानाचे एक रेखाचित्र तयार केले होते. एखादे यंत्र हवेमध्ये उडू शकेल ही शक्यताही त्यावेळी कुणाच्या डोक्यात आलेली नव्हती.
परंतु कलेच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरलेले ते कालांतराने स्वप्न पूर्ण झाले. लिओनार्दो विंचीने १५११ मध्ये गर्भावस्थेतील अर्भकाचे एक चित्र काढले होते. त्यानंतर सुमारे ४४० वर्षांनंतर जेव्हा शरीर विज्ञानाने गर्भातील अर्भकाच्या स्थितीचा शोध लावला, तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. विंचीने हुबेहूब चित्र काढले होते! सन १५०० मध्ये त्याने ऑटोमन साम्राज्यासाठी एका पुलाचे रेखाचित्र काढले. त्यावेळी असा पूल बांधणे शक्य नाही म्हणून ते नाकारले गेले. पण आता आधुनिक विज्ञान तसेच पूल बांधत आहे. ही आहे कलेची व्यापकता.
हल्ली मला चिंता याची आहे, की आपण आपल्या मुलांना या कलेच्या जगात फारसे भटकू देत नाही. त्याबद्दल त्यांना काही सांगत नाही. संगणकाचे म्हणून काही फायदे जरूर आहेत; परंतु नैसर्गिक कलेचा तो पर्याय होऊ शकत नाही. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असलेल्या या काळात तर माझी चिंता आणखीच वाढली आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या मनाचा, अस्तित्वाचा धागा कलेशी जुळलेला राहील का? कला हा त्यांच्या जीवनाचा भाग असेल का?... ही चिंता फार खोल आहे. आपली मुले कलेशी कशी जोडलेली राहतील याचा विचार आपण केला पाहिजे. कलेचे बी बालपणातच पेरायला हवे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढे नक्की करा!