प्रा. डॉ. संदीप ताटेवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीप्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 'सामाईक प्रवेश परीक्षा’ कक्षामार्फत महाराष्ट्रात सुरू झाली आहे व प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने पालकांची प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड डिझाईन या शाखांसाठी विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल असून, याच शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी जीवापाड प्रयत्न करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात या शाखांचा कट-ऑफ सर्वाधिक (९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल) असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनला असणारे प्राधान्य लक्षात घेता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण किंवा कमी गुण आहेत त्यांचे पालक आता आपल्या मुलांचे कसे होईल? - अशा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहेत. काही पालकांनी सीईटीचा निकाल लागण्याआधीच विनाअनुदानित महाविद्यालयात संपर्क साधून मॅनेजमेंट कोट्यात आपला प्रवेश याच शाखेत निश्चित केल्याचे कळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण जवळपास ४४० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयात जवळपास कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी प्रक्रियेमध्ये प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये आपल्या पसंतीची शाखा व महाविद्यालय मिळण्याची शक्यता बरीच वाढत जाणार आहे. आजच्या घडीला जरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेला जास्त मागणी असली तरी भविष्यात काय स्थिती राहील याची भविष्यवाणी आज आपण करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, यंत्र कारखाने, विद्युत निर्मिती व संचारण या सारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे.लॉकडाऊन नंतर ही क्षेत्रे म्हणावी तितकी स्थिरावलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरी भरतीत आज सातत्य नसल्याचे दिसून येत आहे; पण हीच परिस्थिती भविष्यात राहणार नाही. या क्षेत्रातील अभियंत्यांना काही विशेष फायदे आहेत. स्वत:चा व्यवसाय कमी भांडवलात व छोट्या गावात चालू करता येऊ शकतो, परदेशातच किंवा महानगरातच नोकरी अथवा व्यवसायासाठी स्थायिक होण्याची गरज नसते, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक अभियांत्रिकी परीक्षा देऊन सरळ भरतीने उच्च पदे मिळविण्याची संधीही असते. आजकाल या शाखेतील विद्यार्थ्यांनासुद्धा महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे संगणक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. या शाखेतील विद्यार्थीसुद्धा संगणक क्षेत्रातील कमी कालावधीचे आवश्यक अभ्यासक्रम करून संगणक क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवताना दिसतात.त्यामुळे फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतच प्रवेश मिळाला नाही तर आभाळ कोसळणार आहे ही धारणा ठेवून निराश होण्यात काहीही अर्थ नाही. यावर्षी कमी पर्सेंटाईल असले तरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखेच्या तुलनेत इतर शाखेत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.sandiptatewar123@gmail.com
‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ नाही मिळाले, तर आभाळ कोसळेल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 6:58 AM